हेच ते महाराज ज्यांनी भारतातले शेवटचे तीन चित्ते मारले होते..

मोदींच्या बड्डेच्या दिवशीच भारतात चित्ते आले. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं. या काळानंतर भारतात कुठेच चित्ते दिसले नाहीत. 

मात्र आपण जेव्हा जेव्हा भारतीय संस्थानांचे, राजांचे फोटो पाहतो तेव्हा तेव्हा कुत्र्याप्रमाणे गळ्याला पट्टा बांधलेले चित्ते आपणाला दिसतात. भारतात पुर्वी प्रचंड प्रमाणात चित्ते होते. मात्र संस्थानिकांनी या चित्त्यांचा वापर शिकारीसाठी केला.

अगदी अकबराच्या काळापासून चित्ते पाळले जात असत. पण या पाळीव चित्त्यांमध्ये कधीही प्रजनन होत नसे. दूसरीकडे जे चित्ते भारतीय कुरणांमध्ये होते ते कुरणांची संख्या झपाट्याने कमी होत गेल्याने शिकार झाल्याने संपूष्टात आले. 

1947 साली भारतात शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार करण्यात आली.

त्यानंतर मात्र कधीही चित्ता दिसला नाही. आणि अखेर 1952 साली भारताने अधिकृतरित्या भारतीय चित्ते नामशेष झाल्याचे घोषीत केले.. 

या अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार करणाऱ्या राजांच नाव होतं महाराज रामानुज प्रताप सिंहदेव. आणि त्याचं राज्य होतं मध्यप्रदेशातील कोरिया संस्थान. जे आज छत्तीसगडचा भाग आहे.. 

नक्की हे चित्ते कसे मारण्यात आले याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये लिखित स्वरूपात नोंद करण्यात आलेलं आहे. नेमके हे चित्ते कधी मारण्यात आले तर डिसेंबर 1947 म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. 

आजच्या छत्तीसगड राज्यात सरगुजा संस्थाना शेजारी कोरिया संस्थान होते, या संस्थानच्या महाराजांच नाव होतं रामानुज प्रताप सिंहदेव. जुन्या काळात रानटी प्राण्याचा उपद्रव शेतीला होत असल्यास गावकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जंगली प्राण्याची शिकार करत. बऱ्याचदा यामागचं खरं कारण शिकारीचच असे. 

आपल्या राज्यात वाढत जाणाऱ्या वन्य प्राण्यांच्या त्रासाला घेवून जनतेनं महाराजांकडे तक्रार केली होती व त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराज शिकारीसाठी गेले होते. अस सांगण्यात येत की हे चित्ते चुकून मारले गेले, पण एकामागून एक सुटलेल्या दोन गोळ्या कधीही चुकून असू शकत नाहीत. त्या काळात चित्त्यांची शिकार सामान्य गोष्ट होती शिवाय आपण शिकार करत असलेले हे चित्ते भारतातले शेवटचे तीन चित्ते आहेत याची जाणीव देखील महाराजांना नव्हती.. 

रात्रीच्या वेळी गवताळ प्रदेशाच्या आसपास महाराजांना एकाशेजारी एक बसलेले तीन चित्ते दिसले.

हे चित्ते एकाला खेटून एक अशाप्रकारे झोपले होते. झोपलेल्या एका चित्त्यावर महाराजांनी गोळी मारली. तो चित्ता जागीच मेला. त्यानंतरच्या दूसऱ्या गोळीने एका गोळीत दोन चित्ते मारले होते. एकाला खेटून एक चित्ते असल्याने दूसऱ्या चित्त्याला मारलेली गोळी थेट दूसऱ्या चित्त्याच्या पोटातून आरपार जात तिसऱ्या चित्त्याला लागली व यात तो देखील मेला.. 

मारण्यात आलेले तीनही चित्ते नर होते, साधारण या चित्त्यांची लांब 6 फूट होती.

त्यानंतर या चित्याचे डोके कापून तिनही चित्यांची ट्रॉफी बनवून ते भिंतीवर टांगण्यात आले. आजही कोरियाच्या राजमहल मध्ये भारताच्या या शेवटच्या चित्त्यांची ट्राफी लटकवण्यात आलेली आहे. तर तिसरा चित्त्यांची ट्रॉफी या महाराजांनी बस्तरच्या महाराजांना भेट म्हणून दिली. ती आजही बस्तरच्या राजवाड्यात भिंतीवर टांगण्यात आलेली आहे..

या शिकारीचा दस्तावेज खुद्द महाराजांच्या सचिवांनी पत्राने बॉम्बे नॅचरल सोसायटीला कळवला होता. त्या काळात शिकार हा आत्मप्रौढीचा विषय असल्याने आपल्या शिकारीची गाथा बॉम्बे नॅचरल सोसायटीने प्रकाशित करावी यासाठी रामानुज प्रताप सिंह यांच्या खाजगी सचिवांनी 9 जानेवारी 1948 रोजी पत्र पाठवलं होत, या पत्रातच चित्त्यांची शिकार कशी करण्यात आली हे सांगण्यात आलं होतं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.