हंगेरी देशातील रोमानी लोकांना बाबासाहेब का आपलेसे वाटतात ?

बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जातिअंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अमेरिकेत चालणारा आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल किंवा जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन मध्ये ते राहत असलेल्या जागांमध्ये त्यांची तयार झालेली स्मारके एवढीच त्यांच्या कार्याची व्याप्ती नाही.

जगभरातील समाजांमध्ये असणारे शोषित वंचित घटक व बहुसंख्यांक लोकांकडून पिडले जाणारे अल्पसंख्यांक या सगळ्यांनाच आपल्या अन्याया वरती वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं मुक्तीचं तत्वज्ञान आपलंसं वाटतं.

रोमानी किंवा रोमा या नावाने ओळखले जाणारे हे लोक म्हणजे युरोपातील गरीब भावडी दलित जनताच म्हणता येईल.

खरं म्हणजे हे लोक भारतातील राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि नैऋत्येकडील काही भागांमधून प्रवास करत करत युरोपात आलेले. त्यांना ‘रोमा’ हे नाव कदाचित संस्कृतमधील किंवा इतरही भारतीय भाषांमधील ‘डोम’ या एका दलित जातीच्या नावावरून पडलं असावं असा तज्ञांचा अंदाज आहे. त्या लोकांना युरोपात सर्वजण भटके किंवा जिप्सी म्हणून ओळखतात.

जगातील विविध देशांमध्ये मिळून जवळपास दोन कोटींपर्यंत यांची लोकसंख्या आहे.

अगदी दक्षिण युरोप पासून रशिया, सर्बिया, इंग्लंड, हंगेरी अमेरिकेत राहणारे जवळपास दहा लाखाच्या वर रोमा लोक व त्यासोबतच दक्षिण अमेरिका राहणारे ब्राझील, अर्जेंटिना आणि चिली मधील स्पॅनिश भाषा बोलणारे रोमा लोक अशी प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता या लोकांमध्ये आढळते.

अर्जेंटिना चे जग प्रसिद्ध कादंबरीकार लेखक व पत्रकार गेब्रियल गार्सिया मार्केझ यांच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड’ या कादंबरीत या जिप्सी लोकांचे मनोवेधक वर्णन येते.

या लोकांनीच जगभरात प्रवास करून एका खंडातील वस्तू दुसऱ्या खंडात नेऊन त्यांचा व्यापार सुरू केला.

हे लोक नेहमी एका गावातून दुसऱ्या गावात भटकत जात आणि सोबत तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू घेऊन हिंडत.

आता हे लोक दुसरीकडून युरोपात आले त्यामुळे येथल्या वंश श्रेष्ठत्वाच्या आणि रंगावरून वर्णभेद करण्याच्या परंपरेनुसार या समाजालाही अडचणींचा आणि भेदभावाचा सामना करावा लागला; व अजूनही करावा लागतो.

वेगळ्या रंगामुळे आणि संस्कृतीमुळे हे लोक युरोपियन समाजात एक दबलेले जीवन घेऊन जगत असतात.

जिप्सी हा शब्द खरंतर नवनवे शोध घेऊन येणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो मात्र युरोपात याचा वापर यांच्यासाठी एखादी शिवी म्हणून केला जात आहे.

या समुहासाठी कोणतीही सामाजिक सुरक्षा व योजना सरकारांकडून राबवली जात नाही. त्यामुळंच या समूहातील दारिद्र्याचे व गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

हा समाज हंगेरी मधील सर्वात मोठा अल्पसंख्यांक समाज आहे मात्र तरीही या समाजाकडे असणारे संपत्ती आणि शिक्षणाचे प्रमाण इतर समाजांच्या मानाने फारच नगण्य आहे.

एखाद्या भटक्या-विमुक्त जमाती सारखे सर्व सामाजिक गुणविशेष या लोकांना जखडून ठेवत असताना त्यांना जगातील पीडित वंचित लोकांसोबत आपले साधर्म्य जाणवले नाही तरच नवल!

डेरेक टिबोर आणि ओरसोस जॅनोज ह्या दोन माणसांनी आपलं जीवन ह्या समाजाच्या सेवेला वाहिलं आहे. टिबोर हे जगभरातील मानवी हक्कांच्या आणि दलित जनतेच्या एकूण अनुभवांवरती अभ्यास करतात त्यासोबतच ते हंगेरीतल्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य देखील होते.

ह्या दोघांचाही एकदिवस अचानक आंबेडकरांच्या चळवळीशी त्यांनी दलितांसाठी केलेल्या कामाची आणि त्यांच्या क्रांतिकारी जातिनिर्मूलक विचारांशी आला.

टिबोर यांना पॅरिसमधील एका रात्री अचानक आंबेडकरांवरचे पुस्तक सापडले.

परक्या मुलखात कुणी आपला माणूस भेटावा आपल्याला वाटल्याचं ते सांगतात. विसाव्या शतकात आंबेडकरांनी दलितांच्या हक्कांसाठी लढलेली लढाई आणि ते सध्या रोमा समाजासाठी लढत असणाऱ्या लढाईत त्यांना विलक्षण साधर्म्य आढळले.

हा समाजही दलितांप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत फार मागे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना श्वेतवर्णीय पांढऱ्या कातडीच्या विद्यार्थ्यांसोबत एका वर्गात शिकू दिले जात नाही.

एक तर त्यांच्यासाठी शाळा किंवा मग वर्ग वेगळे भरवले जातात आणि अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा – नळाचे पाणी देखील उपलब्ध नसतं.

दहा वर्षांपूर्वी तर त्यांना हॉटेलमध्ये खाण्यासाठी वेगळे कप आणि ताटे दिली जायची.

या समाजातील मुले म्हणूनच समाजात एक दूषण घेऊन वावरत असतात. त्यांना वेळोवेळी अपमानित केलं जातं. अनेक देशांमध्ये रोमा हा शब्दच चोर म्हणून वापरला जातो. अनेक पर्यटन वेबसाईट वरती आजूबाजूच्या ‘रोमा समाजाच्या मुलांपासून सावध राहा, ते तुम्हाला लुटू शकतात’ अशा अर्थाचा मजकूर लिहिलेला आढळतो.

शहरात कुठेही चोरी झाल्यास बेदिक्कतपणे रोमा समाजातील लोकांवर त्याचा आळ ठेवला जातो. इतकंच काय तर हॉस्पिटलमध्येही रोमान्स समाजातील गर्भवती महिलांना वेगळे ठेवले जाते. 2003 साली 44 हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारे जिप्सी लोकांसाठी वेगळ्या प्रसूतिगृहाची तरतूद केलेली एका युरोपीय संस्थेला अभ्यासात आढळली.

आंबेडकरांविषयी अजून माहिती मिळताच त्यांनी फ्रेंड्स ऑफ वर्ल्ड बुद्धिस्ट ऑर्डर या संघटनेतील काही मित्रांशी संपर्क केला.

ही संघटना भारतातील नवबौद्ध लोकांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. यातूनच टिबोर आणि जॅनोज यांनी जाणू यांच्यासमवेत 2005 आणि 2007 साली महाराष्ट्राला भेट दिली.

येथील दलित जनतेशी त्यांना खूप आपुलकीचे नाते असल्याचे जाणवले हंगेरीत परतताच त्यांनी हा भावबंध अजून घट्ट विणायला सुरुवात केली आणि हंगेरीत जय-भीम नेटवर्क या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत त्यांनी रोमा समाजाला बुद्ध तत्त्वज्ञानाची व धम्माची दीक्षा दिली.

तसेच रोमा समाजातील लहान मुलांसाठी डॉ. आंबेडकरांच्या नावाने हंगेेरीतील संयोक्झा, ओझ्ड, हेगिम्येग शहरांमध्ये शाळा सुरू केल्या.

जय-भीम नेटवर्क आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर पूर्ण श्रद्धा ठेवते त्यांच्या मताने समाजातील एक लहानसा घटक तरी विचारपूर्वक वागला तरी जग बदलण्याचा का मी खूप मोठी मदत होऊ शकते या नेटवर्कच्या माध्यमातून भारतात दलित समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हंगेरीमध्ये बोलवले जाते, त्यांना रोमा समाजाशी संवाद साधायला लावून हे बंध विणण्याचा सदोदित प्रयत्न केला जातो.

जय-भीम नेटवर्कचे सध्याचे अध्यक्ष असणारे जॅनोस म्हणतात, आम्ही धर्मांतर करूनही अजूनही भरपूर लोक आमचा तिरस्कार करतात. युरोपात बुद्धिझम म्हणजे खाऊन-पिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय लोकांच्या चंगळवादाचं नाव आहे. मग ‘हे भटके रोमा लोक बुद्धिस्ट कसे काय असू शकतील’ असा सवाल आम्हाला केला जातो.

आमच्याकडे याचं साधं उत्तर आहे

आमचा आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धर्म आम्हाला सांगतो- शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा!

जे शिक्षण हंगेरीतल्या इतर शाळा आमच्या मुलांना देत नाहीत ते शिक्षण आम्ही या मुलांना देतो म्हणूनच आम्ही खरे बुद्धिस्ट आहोत.”

  • वैभव वाळुंज

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Balasaheb Patil says

    Nice Article, this type of article gives more energy and incouragement .

Leave A Reply

Your email address will not be published.