देवीला “बोकड” का कापला जातो

सप्तशृंगी गडाच्या पायऱ्यांवर दऱ्याच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याच्या परंपरेवर जी बंदी घालण्यात आली होती. ती बंदी उठवून परंपरा पुन्हा सुरु करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिलीय. 

त्यामुळे आता पुन्हा एकदा सप्तशृंगी देवीला बोकडांचा बळी देण्याची परंपरा सुरु होणार आहे.

देवीला बोकडांचा बळी देतांना मंदिर न्यासाच्या वतीने फायरिंग करून मानवंदना देण्याची परंपरा होती. मात्र पाच वर्षांपूर्वी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी फॅक्चरिंग केली जात असतांना त्यातली एक गोळी भिंतीवर लागली आणि त्याचे छर्रे तुटले. ते छर्रे आजूबाजूच्या लोकांना लागल्यामुळे त्यात केलेली १२ जण जखमी झाले होते.

या घटनेनंतर नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी मंदिराच्या परिसरात बळी देण्यावर बंदी घातली होती. 

मात्र या निर्णयाला आव्हान देत नाशिकमधल्या आदिवासी विकास संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्यावरच निर्णय देतांना हाय कोर्टाने बोकडाच्या बळीवर असलेली बंदी उठवली आणि परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी दिलीय. 

कोर्टाच्या या निर्णयाचं लोकांनी स्वागत केलं आहे. पण देवीला देवीला बोकडाचाच बळी देण्यामागे काय कारण असेल? ज्यासाठी लोकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. 

काहींच्या मते बळी देणे ही श्रद्धा आहे तर काहींच्या मते अंधश्रद्धा आहे. त्यामुळे यावरून अनेकदा वादविवाद होत असतात. हा वाद न सुटणार असला तरी देवीला दिल्या जाणाऱ्या बोकडाच्या बळीमागे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

यात पहिली आख्यायिका अशी सांगितली जाते की, देवी ही महिषासुरमर्दिनी आहे. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला होता. त्या महिषासुराचं प्रतीक समजून दसऱ्याच्या दिवशी देवीला बोकडाचा बळी दिला जातो. अनेक जण परंपरेनुसार दसऱ्याला बोकडाचा बळी देतात. 

तर दुसरी आख्यायिका लोकपरंपरेशी जुळलेली आहे. लोकं त्यांच्या पूर्वजांनी सुरु केलेल्या बोकडाच्या बळीच्या परंपरेला श्रद्धेचा भाग मानतात. पूर्वजांनी जी परंपरा सुरु केली केलेली आहे त्यामुळे याचं पालन केलं पाहिजे. नाही केल्यास देवीचा कोप होईल आणि कुटुंबावर काहीतरी विघ्न येईल अशी त्यांची मान्यता असते. त्यामुळे ते देवीला बोकडाचा बळी देण्याची परंपरा चालू ठेवतात.     

पशुबळीच्या लोकपरंपरेबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने दरवर्षी नवरात्रीत देवीला बोकडाचा बळी देणारे संकेत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले की, “माझ्या कुटुंबाची भवानी देवी आणि मरी आईवर श्रद्धा आहे. मी दरवर्षी नवरात्रीच्या पहिल्या मंगळवारी देवीला बोकडाचा बळी देतो. यात बोकडाच्या रक्ताची धार देवीला वाहिली जाते. पूर्वजांनी ही परंपरा सुरु केली होती. त्यामुळे आम्ही या परंपरेचं पालन करत आहोत. आमच्या भागात बहुतांश घरांमध्ये ही परंपरा पाळली जाते.” 

ते पुढे सांगतात की, “जर देवीला रक्ताची धार देण्यात आली नाही तर घरात बिमारी सुरु होतात, लहान बाळांची तब्येत बिघडते. त्यामुळे आमच्याकडे दरवर्षी तीनदा बोकडाचा बळी देण्यात येतो. जर कार्यक्रम रात्रीचा असेल असेल तर बोकडाचाच बळी दिला जातो आणि दिवसाचा कार्यक्रम असेल तर शेळी किंवा कोंबडा कापला जातो. परंतु बोकडाचा बळी हा महत्वाचा मानला जात असल्याचे संकेत चव्हाण याने सांगितले.

अनेक ठिकाणी जरी देवीला बोकडाचा बळी देण्याची परंपरा असली तरी इतर प्राण्यांचा सुद्धा बळीसाठी वापर केला जातो. तसेच त्याची कारण सुद्धा वेगळी असतात.

जसे वणीच्या सप्तशृंगी मंदिराच्या पायऱ्यावर दिले जाणारे बळी हे देवीला दिले जातात. तर तुळजापुरात दिले जाणारे बळी हे महिषासुराला दिले जातात असं सांगितलं जातं. स्थळ आणि काळानुसार वेगवेगळ्या ठिकाणी देवीला वेगवगेळ्या प्राण्यांचे बळी दिले जातात. 

नेपाळमध्ये बरियारपूर जिल्ह्यात असलेल्या गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी बळी देण्याची परंपरा आहे. यात रेड्यापासून उंदरापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची बळी दिली जाते. अनेक दिवस चालणाऱ्या या यात्रेत हजारो रेडे आणि त्याच्या दुप्पट संख्येने बोकड, कोंबडे, मेंढ्या, पोपट, उंदीर या प्राण्यांचा बळी दिला जातो.

हे झालं पशुबळीचं पण काही ठिकाणी नरबळी सुद्धा दिला जात असल्याचा उल्लेख आहे.

त्रिपुरा राज्यातल्या त्रिपुराश्वरी आणि चतुरदास देवता मंदिरात अनेक प्राण्यांचा बळी देण्याची परंपरा आहे. तिथे रेडे, मेंढ्या, कबुतरासारख्या हजारो पशु पक्षांचा बळी दिला जात होता. या पशुबळीपूर्वी इसवी सन १४०७ पर्यंत वर्षभरात १००० माणसांचा बळी दिला जात होता. तसेच अलीकडे २०० वर्षांपूर्वीपर्यंत नरबळीचा परंपरा चालू होती असं सांगितलं जातं.

वेगवेगळ्या पद्धती असलेली ही बळीची परंपरा कशी सुरु झाली याबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने सामाजिक कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांच्याशी संपर्क साधला.

ते सांगतात, “मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक संकटांची माहिती समाजाला माहित नव्हती. या गोष्टी आकाशातील देवाच्या कोपामुळे होतात असं ते मानायचे. त्यामुळे ते देवाला प्रसन्न करण्यासाठी बळी द्यायचे. बहुतांश वेळा नरबळी दिले जायचे मात्र हळूहळू त्याची जागा पशूबळीची सुरुवात झाली. संकट टाळावे आणि अतृप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी ही बळी दिली जायची.”

ते पुढे सांगतात की, “मानव हा मिश्र आहारी प्राणी आहे, त्यामुळे त्याने काय खावे आणि काय खाऊ नये हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण ही गोष्ट देवा-धर्माच्या नावाने करणे हे देव आणि धर्माची प्रतिमा खालावणारं आहे. त्यामुळे ते टाळावे अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आहे. यासाठीच समिती लोकप्रबोधनाचे काम करत आहे.” असे हमीद दाभोलकर म्हणाले.

पण बळीची परंपरा वेगवगेळ्या कारणाने सुरु झालेली असली, तरी देवीला मात्र प्रामुख्याने बोकडाचाच बळी दिलं जातं असल्याचं दिसतं. 

देवीला बळी देण्यासाठी वेगवगेळ्या भागात वेगवगेळ्या प्राण्यांचा वापर केला जातो. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने बोकडाचा बळी दिला जातो. कारण देवीने महिषासुराचा वध केला ही आख्यायिका सगळ्यात जास्त प्रचलित आहे आणि बोकडाला महिषासुर मानलं जातं. असं सांगितलं जातं. त्यामुळे मांढरदेवी, काळूबाई, महाकाली या देवींना मोठ्या प्रमाणावर बोकडांचा बळी दिला जातो.

तर काही जण सांगतात की, ‘पूर्वीपासून बोकडाचा बळी देण्याची परंपरा चालत आलेली आहे त्यामुळे तीच परंपरा कायम ठेवण्यात आलीय. यात बदल करणे योग्य नाही असं वाटतं.’ 

आता बळी बोकडाचा असो की इतर प्राण्याचा शेवटी ती पशुबळीचं आहे. ही पशुबळी काहींच्या मते श्रद्धेचा भाग आहे तर काहींच्या मते ही अंधश्रद्धा आहे. पण यावर कायद्याने बंदी नसल्यामुळे हा सगळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.