म्हणून सरकारी नोकरीत टॅटू चालत नाही…

टॅटू हा जगभरातल्या तरण्या पोरांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. WWE सुपरस्टार, रॅपर, क्रिकेटर पासुन ते कॉमन माणसांपर्यंत टॅटूची क्रेझ आहे. आता ज्यांनी प्रेयसीच्या नावाने टॅटू काढून नंतर खोडायचा प्रयत्न केला त्यांचं सोडा तो वेगळा विषय त्याबद्दल नंतर कधीतरी.

पूर्वी गावाकडच्या जत्रेमध्ये गोंदणाऱ्या लोकांचा व्यवसाय असायचा अजुनही आहे पण तो जरा अपडेट झालाय पर्मनंट वरून टेंम्पररी इतकाच काय तो बदल. तुळस, नाग, नवरा- बायकोचं नाव असं काहीतरी ग्रामीण भागातले लोक गोंदून घ्यायचे.

पण जेव्हा गावाकडचे खंडेराव शहरात आले, दुनियादारी पाहू लागले तेव्हा हे टॅटू प्रकरण जास्तच फॅशनेबल आणि कूल असण्याच लक्षण वाटू लागलं.

टॅटू बद्दलच्या हजार गोष्टी सांगता येतील पण एक गोष्ट कायम वडीलधाऱ्या माणसांकडून किंवा शिक्षकांकडून ऐकायला मिळते की टॅटू नको काढू तुला नोकरी मिळणार नाही. या भीतीने कितीतरी लोकांचे हात कोरेच राहिले.

हा प्रश्न स्वाभाविकच आहे की खरच सरकारी नोकरीत टॅटू चालतो की नाही ?

सगळयात आधी कुठल्या नोकरीत टॅटू चालतो तर 

त्यामधे बँक, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, रेल्वे, पीडब्लूडी विभाग या सरकारी नोकऱ्या येतात. अशा ठिकाणी जर तुम्ही क्लर्क किंवा प्रोबेशनरी ऑफिसरच्या नोकरीसाठी अप्लाय करत असाल तर टॅटू असला नसला विशेष काही फरक पडत नाही.

पण जर तुम्ही भूदल, नौदल, वायुदल अशा क्षेत्रात करिअर करणार असाल तर टॅटू तिथं अलाउड नाही. पोलिसांच्या नोकरीतही टॅटू चालत नाही. 

आता मागच्या काही काळात भारतीय सेनेने अंगावर टॅटू किंवा इतर तत्सम कलाकृती गोंदवून घेतलेली असेल तर भरती संबंधी त्याबद्दल सुद्धा आदेश काढण्यात आलेले आहेत.

 मनगट ते कोपरापर्यंत टॅटू असेल आणि तो आतल्या बाजूला असेल तर एकवेळ चालून जातं पण तुम्हाला डॉक्टरांकडून परमिशन घ्यावी लागते किंवा डॉक्टरी सर्टिफिकेट दाखवाव लागतं.

एवढं सगळं करूनही टॅटू गोंदवून घेतलेल्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा की नाही हे कमिटीच्या हातात असतं.

मुळात सरकारी नोकरीत टॅटू चालतच नाही. किरकोळ वैगरे चालतो पण चेहऱ्यावर किंवा मानेवर टॅटू असेल तर तुम्हाला नोकरीत स्वीकारलं जात नाही.

काही लोकांचे परंपरेनुसार चालत आलेले गोंदण असतात त्यामुळे अशा लोकांना यात सुट मिळते. पण जर भरती व्हायचं असेल तर या टॅटू वैगरेच्या भानगडीत पडू नका असाच सल्ला सगळे देतात.

भारत सरकार सरकारी नोकरीत टॅटू का टाळतात त्यालाही काही कारणं आहेत.

त्यात खतरनाक त्वचा विकार, रक्ता संबंधी आजार होऊ शकतात. सोबतच टॅटू मुळे एचआयव्ही, हेपेटायटीस ए आणि बी टेटनस, ॲलर्जी होण्याचे धोके सांगितले जातात. या सगळ्या चिकित्सा परीक्षण खर्चिक असतात आणि भरती होणाऱ्या टॅटू धारक उमेदवारांसाठी एवढा मोठा घाट घालणं परवडणारं नसतं. टॅटू हे शरीरासाठी हानिकारक असतात असं सांगितल जातं. त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीत जाणार असाल तर तुम्ही निरोगी राहणं जास्त गरजेचं असतं.

आता हे सगळे स्वाभाविक कारण झाले पण टॅटू का चालत नाही तर त्याच उत्तर एकाला विचारलं तर तो म्हणलेला की,

जे लोकं टॅटू काढतात ते स्वतःचेच कामं सिरीयसली करत नाही तर सरकारी काम कधी सिरीयसली करणार. मनमौजी वागण्यामुळे अशी टॅटू वाली लोकं सरकारी नोकरीत घेतली जात नाही. त्यामूळे टॅटू गोंदवून घेतलेली लोकं ही कायम आर्ट क्षेत्रात दिसून येतात.

आता त्याच्या बोलण्यात किती तथ्य आहे, हे त्यालाच माहीत. पण टॅटू काढणारी कित्येक लोकं आज भारी कामं करतायत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सरकारी नोकरीत जाणार असाल तर टॅटू प्रकरण पूर्ण समजून घ्या आणि मगच अप्लाय करा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.