कॉंग्रेसचं माहित नाही पण रॉबर्ट वाड्रांची निवडणूक लढायची इच्छा आहे

राष्ट्रीय स्तरावर सध्या काँग्रेस पक्षाची नामुष्कीचा होताना दिसतेय. त्यांचा एकही सिक्का खणखणताना दिसत नाहीये. फक्त ‘फ्लॉप शो’च त्यांच्या पक्षाच्या हाती लागत असल्याचं दिसतंय. नुकतंच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये तर हे प्रत्येकानेच बघितलं. तेव्हा काँग्रेसला नवीन चेहऱ्याची गरज असल्याचं देखील अनेकांनी बोललं आहे.

अशात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती बिजनेसमॅन रॉबर्ट वाड्रा यांच्या ताज्या विधानामुळे ‘काँग्रेसने नवीन चेहऱ्यांच्या पक्षात आगमनाचं मनावर तर घेतलं नाहीये ना?’ असा प्रश्न पडतोय.

रॉबर्ट वाड्रा मध्यप्रदेशातील उज्जैन इथे महाकाल मंदिरात पूजेसाठी गेले होते, तेव्हा त्यांनी “मला राजकारण कळतं. जर लोकांना मी त्यांचं प्रतिनिधीत्व करावं, असं वाटत असेल आणि मी त्यांच्यासाठी काही बदल घडवून आणू शकलो, तर मी नक्कीच ते हे पाऊल उचलत राजकारणात उतरेन” असं म्हटलं आहे.

रॉबर्ट वाड्रा यांच्या या वातव्यामुळे देशभरात चर्चेला उधाण आलं आहे. अनेक जण त्यांच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चा करत आहेत. म्हणूनच कोण आहेत रॉबर्ट वाड्रा आणि नक्की ते काय म्हणालेत? जाणून घेऊया…

रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म १८ एप्रिल १९६९ चा. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात ते जन्माला आले. मुरादाबाद हे भारतातील ब्रास वर्कसाठी प्रसिद्ध आहे. रॉबर्ट यांचे वडील राजेंद्र वाड्रा हे पितळ व्यापारी होते. त्यांची आई मूळची स्कॉटलंडची. तसं बघितलं तर त्यांचं कुटुंब हे मूळचं पाकिस्तानच्या सियालकोट इथलं आहे. भारताच्या फाळणीच्या वेळी रॉबर्ट वाड्रा यांचे आजोबा भारतात आले आणि तेव्हापासून वाड्रा कुटुंब इथेच आहे. 

रॉबर्ट वाड्रा हे हैंडीक्राफ्ट आइटम्स आणि कस्टम ज्वेलरी व्यवसाय करतात. त्यांच्या कंपनीचं नाव आर्टेक्स एक्सपोर्ट्स आहे. याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये रॉबर्ट वाड्रा यांची हिस्सेदारी आहे.

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधी यांची भेट १९९१ मध्ये दिल्लीतील एका कॉमन फ्रेंडच्या घरी झाली होती. नंतर त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि दोघांनी १८ फेब्रुवारी १९९७ ला लग्न केलं. असं सांगतात की, रॉबर्ट यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता आणि त्यामुळे पिता-पुत्राच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. 

तेव्हापासून रॉबर्ट वाड्रा प्रकाश झोतात यायला लागले. रॉबर्ट यांच्या वडिलांवर उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होता. 

राजकीय घटनेतून चर्चांमध्ये येण्याला सुरुवात…

२००१ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान रॉबर्ट यांनी बाइक रॅली आयोजित केली होती. तेव्हा एका आयएएस अधिकाऱ्याने ती रोखली होती. या घटनेनंतर त्या आयएएस अधिकाऱ्याची बदली झाली तेव्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकून रॉबर्ट वादात सापडले होते. 

यानंतर राहुल गांधी यांच्यासहित देखील त्यांनी उत्तर प्रदेशात प्रचार केला. परत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पत्नी प्रियंका यांच्यासह अमेठी आणि रायबरेली इथल्या निवडणूक प्रचारातही भाग घेतला होता.

अशा रॉबर्ट वाड्रा यांना राजकारणाची आवड नक्कीच असल्याचं दिसतं. एक तर गांधी घराण्याशी जोडलेले असणं आणि दुसरं त्यांचं सतत राजकीय गोष्टींनी चर्चेत राहणं. गेल्या मार्च महिन्यात देखील त्यांनी अशी इच्छा बोलून दाखवली होती. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आपले मत मांडताना त्यांनी सांगितलं होतं की, “राजकीयदृष्ट्या बाहेर पडण्यासाठी आणि संसदेत जाण्यासाठी मी मुरादाबाद किंवा उत्तर प्रदेशातील कोणतंही शहर निवडावं, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.

सहभाग घ्यायचा की नाही हे बघूच, पण सध्या मी दररोज जनतेची सेवा करत आहे. निवडणुका असो वा नसो, मी देशभरातील मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अगदी गुरुद्वारांमध्ये जातो. इतके दिवस अथक परिश्रम करतोय तेव्हा ज्या ठिकाणाहून मी राजकारणात प्रवेश करेल तिथे नक्कीच परिवर्तन होईल आणि तिथल्या लोकांचीही प्रगती होईल”, असं ते म्हणाले होते.

आता देखील त्यांनी असंच वक्तव्य केलंय…

“लोकांच्या इच्छेनुसार ते राजकारणात येण्यास तयार असल्याचं त्यांनी मीडियासमोर सांगितलंय. प्रियांका गांधी घरी आल्या की आम्ही राजकारणावर चर्चा करतो. देशातील बदलत्या वातावरणाबद्दल बोलतो. यासोबतच गावा-गावात त्रासलेले लोकांबद्दल आम्ही बोलतो. मी चॅरिटीचं काम करतो आणि हे कार्य यापुढेही चालू राहील, पण राजकारणात आलो तर हे काम मला मोठ्या प्रमाणावर करता येईल. जनतेच्या आशीर्वादानेच राजकारणात येण्याची ऊर्जा मिळेल, असं म्हणत त्यांनी त्यांच्या इंट्रीची हिंट दिल्याचं दिसतंय. 

देशात जे घडत आहे ते पाहणं भीतीदायक आहे, परंतु समस्या ही आहे की माध्यमे देखील योग्य गोष्ट करण्यास घाबरतात, ही लोकशाही नाही”, अशा शब्दांत त्यांनी राजकीय बोली आत्मसाद केलीये, अशा चर्चा आहेत.

मात्र आजवर त्यांनी जितक्या वेळेस असे विधान केले आहेत तेव्हा त्यांनी उघड आपली इच्छा प्रकट केली नाही. आता मात्र त्यांनी तस केल्याने  त्यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चाना जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात काँग्रेसची सध्याची परिस्थिती बघता ‘रॉबर्ट वाड्रा’ आता तारणहार ठरणार का? असे प्रश्न देखील विचारले जाताय. 

आता काँग्रेसचं तर आपल्याला माहित नाही… मात्र हो, ताज्या वक्तव्याने रॉबर्ट वाड्रांची निवडणूक लढायची इच्छा आहे, हे  होतंय. तेव्हा पुढे काय घडणार हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.