लखीमपूर घटनेमुळे चर्चेत आलेले अजय मिश्रा १८ वर्षांपूर्वी एक हत्येच्या आरोपांमुळे गाजले होते..

उत्तरप्रदेशमधील लखीमपुर खेरी इथं रविवारी सकाळी शांततेत सुरु असलेली शेतकऱ्यांची निदर्शन संध्याकाळ होईपर्यंत हिंसक बनली. याला कारणं ठरलं ते कथित रित्या स्थानिक खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि त्यांचा मुलगा आशीष मिश्रा यांच्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचे झालेले आरोप.

त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमावात दोन गाड्या घुसल्याच सांगण्यात येत असून त्यानंतरच हिंसाचार घडला असा दावा करण्यात येत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या आरोपानुसार यातील एका गाडीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा बसला होता.

त्यामुळे सध्या पोलिसांकडून आशीष मिश्रासह इतरांवर कलम – ३०२ अंतर्गत तिकोनिया पोलीस स्थानकामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण दोन दशकांपूर्वी असाच हत्येचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर देखील झाला होता. आणि विशेष म्हणजे याच आरोपांनंतर त्यांची राजकारणात एंट्री झाली होती…

अजय मिश्रा यांना त्या भागात ‘महाराज’ म्हणून ओळखलं जातं. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिलीच्या व्यवसायात होते. सोबतच पहिलवान असल्यामुळे अंगाने धष्टपुष्ट असे ‘दबंग’ दिसायचे. एकदा त्यांच्यावर तस्करीचा देखील आरोप झाला होता. पण ज्या वेगाने हे प्रकरण चर्चेत आलं होत, त्याच वेगाने ते शांत देखील झालं होतं.

मात्र २००३ मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपांनी बराच काळ त्यांची पाठ सोडली नव्हती. त्यावर्षी तिकोनिया इथं राहणाऱ्या २४ वर्षीय प्रभात गुप्ता या युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये अजय मिश्रा यांच्यावर आरोप आणि गुन्हा देखील नोंद झाला. याच खटल्याची सुनावणी सुरु असताना त्यांच्यावर न्यायालयातच हल्ला करण्यात आला होता. बंदुकीची गोळी चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी देखील झाले होते.

मात्र २००४ साली स्थानिक न्यायालयाने अजय मिश्रा यांची या हत्याकांड आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली होती. मात्र हा आरोपांमुळे जवळपास वर्षभर ते कायम चर्चेत होते. यानंतरच त्यांनी राजकारणात एंट्री केली.

अजय मिश्रा यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा करायची म्हंटली तर अवघ्या १२ वर्षांच्या आतमध्येच त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय गृहराज्य मंत्री पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. २००९ मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. अवघ्या २ वर्षातच म्हणजे २०१२ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते निघासन मतदारसंघातून आमदार झाले. 

२०१४ मध्ये भाजपने त्यांना खेरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. त्यावेळी त्यांनी जवळपास १ लाख १० हजार मतांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या अरविंद गिरी यांना हरवलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी समाजवादी पक्षाच्या पूर्वी वर्मा यांना रेकॉर्ड २ लाख २५ हजार मतांनी हरवलं होतं.

त्यानंतर अलीकडेच झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजय मिश्रा यांचा समावेश करण्यात आला आणि त्यांच्याकडे केंद्रीय गृह राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. सोबतच त्यांचा मुलगा जो सध्या वादात सापडला आहे त्या अजय मिश्रा यांना निघासन मतदारसंघामधून उमेदवार देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

खरंतर कृषी कायद्यांना करत असलेल्या शेतकऱ्यांनी अजय मिश्रा यांना काळे झेंडे देखील दाखवले होते. यामुळे नाराज असलेल्या मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी भाषण देताना शेतकऱ्यांना एक प्रकारे धमकी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येत आहे.

यात कथित रित्या अजय मिश्रा म्हणत आहेत कि,

गाड़ी से उतर जाते तो उन्हें (काले झंडे दिखाने वालों को) भागने का रास्ता नहीं मिलता। कृषि कानून को लेकर केवल 10-15 लोग शोर मचा रहे हैं। सुधर जाओ, नहीं तो सामना करो, वरना हम सुधार देंगे दो मिनट लगेंगे। विधायक-सांसद से बनने से पहले से लोग मेरे विषय में जानते होंगे कि मैं चुनौती से भागता नहीं हूं

मिश्रा यांच्या या व्हिडीओनंतर शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. ठिकठिकाणी छोटी मोठी आंदोलन सुरु होती.

रविवारी मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. त्यांचं हेलिकॉप्टर जिथं उतरणार होतं, तिथचं सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरलं होतं.

अनेकदा समजूत काढूनही ते तिथून जाण्यास तयार नव्हते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमावात दोन गाड्या घुसल्याच सांगण्यात येत असून त्यानंतरच हिंसाचार घडला असा दावा करण्यात येत आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.