अमेरिकेच्या ४ महिला डिप्लोमॅट्स भारतात बुलेटप्रूफ कार सोडून रिक्षा चालवत आहेत…!! पण का ?

हल्ली शहरापासून गाव खेड्यापर्यंत प्रत्येक पैसेवाल्याकडे फोर व्हीलर असणे स्टेटसचं सिम्बॉल बनली आहे. साध्या नॅनो-सुझुकीपासून करोडोच्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यूपर्यंत एकापेक्षा एक भारीतली आणि महागडी गाडी आपल्याकडे असावी यासाठी लोकांची धडपड चालली असते.

कार ही जितकी कामासाठी गरजेची आहे त्यापेक्षा, घरासमोर चारचाकी उभी आहे हे दाखवण्यात एक वेगळाच स्वॅग असतो. महागातली गाडी घेऊन ऑफिसला जाणे हा तर शहरातील प्रत्येक चाकरमान्यांचा आणि श्रीमंतांचा रुटीन झालाय. अनेक जण यासाठी महागड्यात महागडी गाडी घेण्याचा प्रयत्न करत असतो.

पण दिल्लीमध्ये चार अमेरिकन महिला आहेत, ज्यांच्याकडे सरकारने दिलेल्या बुलेटप्रूफ गाड्या सोडून त्या रिक्षा चालवत ऑफिसमध्ये जातात.

कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. दिल्लीमध्ये असलेल्या अमेरिकन राजदूत कार्यालयातील चार डिप्लोमॅट्स या स्वतःच्या बुलेटप्रूफ गाड्या सोडून रिक्षा चालवत आहेत. या महिला रिक्षा चालवत ऑफिसला जातात, रिक्षावरून दिल्लीत फिरतात आणि लोकांबरोबर संवाद साधतात. अगदी सामान्य रिक्षाड्रॉयव्हरने या महिला वागत आहेत.

पण अमेरिकेसारख्या इतक्या शक्तिशाली आणि श्रीमंत देशातील या महिला असं का करत आहेत?

तर यामागचं कारण आहे या महिलांचे डिप्लोमेसीचे जगावेगळे विचार आणि त्यांची आवड….

एन. एल. मेसन, रुथ होल्म्बर्ग, जेनिफर बायवाटर्स आणि शरीन जे. किटरमॅन या चार महिला अमेरिकन डिप्लोमॅट्स म्हणून भारतात काम करतात. यातील शरीन जे. किटरमॅन या भारतीय वंशाच्या आहेत, त्यांचा जन्म कर्नाटकातला असून सध्या त्या अमेरिकन नागरिक आहेत. तर बाकी तीन महिला या मूळच्या अमेरिकन आहेत. 

या चारही महिलांनी स्वतःच्या चार रिक्षा खरेदी केल्या आहेत, चौघी जणींमध्ये रिक्षा चालवणे एकसारखे असले तरी प्रत्येकीच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, त्यांच्या रिक्षा चालवण्यामागील कथा सुद्धा वेगवगेळ्या आहेत. 

भारतीय वंशाच्या शरीन किटरमॅन यांच्याकडे सर्वात अनोखी गुलाबी रिक्षा आहे. 

जेव्हा शरीन कामानिमित्त दिल्लीत रुजू झाल्या तेव्हा त्यांना कळलं की, १० वर्षांपूर्वी एक मेक्सिकन राजदूत मेल्बा प्रिया यांच्याकडे एक रिक्षा आणि ड्रायव्हर होता. त्या नेहमी रिक्षानेच प्रवास करायच्या. त्यांच्यावरूनच प्रेरणा घेऊन शरीन यांनी रिक्षा चालवत सामान्य दिल्लीकरांमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला. 

शरीन यांच्या गुलाबी रिक्षावर रंगेबीरेंगी लटकन बांधले आहेत तर खिडकीच्या आरशांजवळ भारत आणि अमेरिकेचे झंडे लावलेले आहेत. शरीन मुळात भारतीय वंशाच्या असल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृती आणि भारतातील सार्वजनिक वाहतुकीची जाणीव आहे. जेव्हा शरीन यांना भारतात पाठवण्यात आलं तेव्हा येतानाच त्यांनी रिक्षा खरेदी करण्याचं ठरवलं होतं. 

भारतातून अमेरिकेत जाणे आणि परत अमेरिकन नागरिक होऊन भारतात परत येणे. असा फार महत्वाचा प्रवास शरीन यांनी केला आहे. त्यामुळेच भारत आणि अमेरिकेच्या संस्कृतीला जोडण्यासाठी त्यांना रिक्षा महत्वाची वाटते. कार चालवणाऱ्या शरीन यांनी आवडीने रिक्षा चालवणं शिकून घेतलं आणि त्या आता रोज रिक्षा चालवतात. 

१९८० च्या दशकातील प्रसिद्ध शो नाईट रायडरच्या स्मरणार्थ एन. एल. मेसन यांनी स्वतःच्या रिक्षाचं नाव KITT असं ठेवलंय. 

मेसन या भारतात रुजू होण्यापूर्वी पाकिस्तानात काम करत होत्या. जेव्हा त्या बुलेटप्रूफ गाडीमधून प्रवास करायच्या तेव्हा बाहेर चालवल्या जाणाऱ्या रिक्षांकडे बघायच्या. त्यांना सुद्धा रिक्षा चालवण्याची आवड व्हायची परंतु परिस्थितीमुळे नाईलाज होता. मात्र जेव्हा त्यांची बदली भारतात झाली तेव्हा त्यांनी ही हौस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

मेसन यांच्या आईने जगातील बऱ्याच देशांमध्ये प्रवास केला होता. अनेक अडचणी आणि जोखीमांचा सामना केला होता. त्यांनी व्हिएतनाम युद्धात सुद्धा सहभाग घेतला होता. त्यामुळे आईच्या पावलावर पाऊल ठेवत मेसन यांनी रिक्षा चालवायला शिकून घेतलं आणि लायसन्स मिळवलं. हे काम त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त कठीण होतं, कारण त्यांनी ऑटोमॅटिक कारशिवाय कोणताही वाहन चालवलेलं नव्हतं. रिक्षा चालवणे ही त्यांच्यासाठी फार अवघड गोष्ट होती, पण त्यांनी ती पूर्ण केली.

मेसन यांना आज कार पेक्षा रिक्षाच भारी वाटतेय. त्या सांगतात की जगात सगळ्यात भारी काय असेल तर रिक्षा चालवणे. मेसन यांच्यापाठोपाठ त्यांची मुलगी सुद्धा आता रिक्षा चालवायला शिकत आहे. 

चारही रिक्षांमध्ये रूथ होल्म्बर्ग यांच्या ब्लॅक ब्युटीचा वेगळाच रुबाब आहे.

बाकी सहकारी रिक्षा घेऊन ऑफिसमध्ये जातात आणि इतरत्र प्रवास करतात. परंतु रूथ मात्र बाजारात सुद्धा रिक्षा घेऊनच जातात. बाजारात रथाला रिक्षा चालवतांना बघून सामान्य नागरिकांना सुद्धा त्यांच्यात आपलेपणा दिसतो. रूथ यांच्यामुळे अमेरिकेतील नागरिक सुद्धा आपल्यासारखेच सामान्य जीवन जगतात असं भारतीय लोकांना वाटतं. रूथ यांच्यासाठी रिक्षा चालवणे ही आवड आणि काम दोन्ही आहेत. 

रूथ सांगतात की, “डिप्लोमसीसाठी कार्यालयात बसूनच मोठं मोठ्या लोकांबरोबर बैठक घेणे पुरेसे नाही. तर बाहेर निघून लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी आपलेपणाने वागून डिप्लोमसी केली पाहिजे. यातून दोन्ही देशांमधील नाते सुधारतात, जेव्हा मी बाजारात जाते तेव्हा स्थानिक लोक मला बघायला उत्सुक असतात. मी सुद्धा बाजारातील अनेकांना ओळखते, असं त्या म्हणाल्या.

जेनिफर बायवाटर्स यांच्यासाठी रिक्षा चालवणे हे चौकटीबाहेर जाऊन जगणे आहे.

जेनिफर यांना वाटतं की प्रत्येकाने चौकटीच्या बाहेर जाऊन जगायला हवं. जेव्हा जेनिफर दिल्लीत आल्या तेव्हा त्यांनी दिल्लीतील एका रिक्षामध्ये प्रवास केला होता. त्या प्रवासात त्यांना रिक्षा चालवण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सुद्धा एक रिक्षा खरेदी केली. 

जेनिफर यांना क्लचच्या गाड्या चालवण्याची सवय आहे त्यामुळे त्यांनी लवकरच रिक्षा शिकून घेतली. मात्र दिल्लीतील जनावरं, सायकीली आणि बाकी रिकाशांमधून ड्रायव्हिंग करणे कठीण असते. जेव्हा त्या रिक्षा शिकत होत्या तेव्हा स्थानिक लोकांनी सुद्धा त्यांना मदत केली होती, त्यामुळे भारतीयांच्या चांगुलपणाची सुद्धा त्यांना प्रचिती आली.

परंतु त्या म्हणतात की, माझा करा आणि शूरवीर व्हा. जीवनात जरा हटके विचार करा आणि जगावेगळ्या गोष्टी करा म्हणजे जग एका वेगळ्या दृष्टीकोनातून तुम्हाला दिसेल. 

अशाप्रकारे या चार जगावेगळ्या अमेरिकन महिला स्वतःचे स्टेटस आणि प्रतिष्ठेचे लेबल काढून दिल्लीत रिक्षा चालवत आहेत. रिक्षा चालवत भारत बघणे आणि भारतीयांसारखं जगणे या दोन्ही गोष्टींकडे त्या लक्ष देतात. या चौघी जणी जरी अमेरिकन असल्या तरी त्यांची चौकटीच्या बाहेर जाऊन जगण्याची स्टोरी मात्र हटके आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.