१० पैकी ९ पोरांनी शाळा सोडली अन् शिक्षकाने स्वत:ला संपवल

कोणत्याही व्यक्तीला घडवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकांच्या बद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतानाच काही घटना खरोखरच आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करत असतात हे समोर येतं. आपलं आयुष्य झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक तसे दुर्मिळ असतात.

उन्हाळ्याच्या सुट्टया संपल्या आणि जून महिना सुरू झाला की शाळेत जायची लगबग सुरू होते. पण, गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रची माध्यमाचं फॅड शहरातून गावाकडेही आलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये फारसे विद्यार्थी येताना दिसत नाहीत. त्यामुळे पट संख्याही कमी झाली आहे. गावाकडच्या वस्तीवरच्या शाळेची परिस्थिती तर त्याहूनही बिकट आहे. एक किंवा दोन शिक्षक असलेल्या वस्तीवरच्या शाळेत जेमतेम १० ते १५ विद्यार्थी असतात.

अशाच एका वस्तीतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० विद्यार्थी असलेल्या या शाळेत फक्त १ विद्यार्थी येत असल्याने त्या शाळेच्या शिक्षकाने विष पिऊन आत्महत्या केलीय.

त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एकून संपुर्ण प्रकरण काय आहे. त्या शिक्षकाच्या आत्महत्येला जबाबदार कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात जावजीबूवा नावाचं गाव आहे. जावजीबूवा गावाच्या हद्दीत येणाऱ्या होलेवस्ती इथे एक प्राथमिक शाळा आहे. या प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिकत होते आणि या विद्यार्थांनां शिकवण्यासाठी अरविंद देवकर नावाचे शिक्षक होते. काही दिवसांपासून दहा विद्यार्थांपैकी फक्त एकच विद्यार्थी शाळेत हजर राहायचा.

काही दिवस हेच घडलं आणि शिक्षक आसणाऱ्या अरविंद देवकर यांनां आपल्या शाळेतील ९ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला असं समजलं.

जसं त्यांना कळलं की, आपल्या काही चुकीच्या धोरणांमुळे  विद्यार्थी आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जातायत. तसं त्यांनी फवारणीसाठी वापरलं जाणारं तणनाशक औषध पिऊन शाळेतंच आत्महत्या केली आणि जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक धक्कादायक सुसाईड नोट लिहली होती त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आणि आत्महत्या करण्याचं कारण समजलं.

अरविंद देवकर हे ३० मे २०२३ रोजी हालेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाले होते. होलेवस्तीवर एकच शिक्षक आसल्याने काही दिवस ते इतर कामांमुळे गोंधळून गेले. जून महिन्याच्या सुरवातीला १३ दिवस ते विद्यार्थ्यांना शिकवू शकले नाहीत. कारण, सुरवातीला शाळेच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळेची साफसफाई आणि इतर कामात त्यांचा वेळ गेला. शाळेची साफ सफाई करत आसताना, त्यातच त्यांनी विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतलं आणि ही गोष्ट पालकांना खटकली. त्यानंतर झालेल्या शालेय समितीची मिटींगमध्ये काही गोष्टी घडल्या.

शिक्षक अरविंद देवकर यांना मिटींग झाल्यानंतर बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी गोळी घेऊन २० मिनिटं आराम केला. त्यातच एका मुलाला स्वच्छता करताना दुखापत झाली. या सगळ्या चुकांमुळे पालकांनी नाराज होत १० पैकी ९विद्यार्थ्यांना त्या शाळेतून काढलं आणि दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. या घटनेनंतर त्यांनी पालकांची माफी मागून विनंती केली की, मला एक संधी द्या, अशी विनवणी वारंवार केली.

पण, त्यांनां कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपण अपराधी आहोत अशी भावना त्यांच्या मनात तयार झाली. याला केवळ आपणंच जबाबदार असून समाजाला आपल्याकडून नुकसान झालंय, याचा सर्वस्वी मीच जबाबदार आहे अशी त्यांची भावना झाली होती.

अरविंद देवकर यांची आत्महत्या पालकांमुळे की, शालेय शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे झाली असा प्रश्न या निम्मिताने उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागात आजही आशा काही शाळा आहेत. ज्यामध्ये बेसीक सोयी सुविधा नाहीत. कुठे शाळेची व्यवस्थित इमारत नसते, तर कुठे विद्यार्थ्यांना खेळायला स्वच्छ मैदान आणि प्यायला पाणी नसतं. शिवाय जिथे शिक्षकांची गरज आहे तिथे शिक्षक भरले जात नाहीत. अरविंद देवकर यांच्या आत्महत्येचं कारणही हेच आहे. हे त्यांच्या सुसाईड नोटमधून समोर येतं. शिक्षण विभाग स्वच्छतेसाठी काही पाऊल का उचलत नाही असा प्रश्न पडतो. शाळेतील दैनंदिन कामाची सुरवात ही स्वच्छेतापासूनच होत असते. शाळेतील टॉयलेट आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावंच लागत.

मग प्रश्न उपस्थिती होतो हे स्वच्छतेची कामं करायची कोणी?  शिपाई, शिक्षक की विद्यार्थी.

राज्यात ९० हजार प्राथमिक शाळा आहेत. पण, या प्राथमिक शाळेला शिपाई, सफाई आणि लिपिक पदं भरली जात नाहीत. या सर्व शाळेची सफाई शाळेमधील शिक्षक पैसे गोळा करून ग्रामपंचायतमधल्या सफाई कामगाराला देतात आणि काम करून घेतात. जर सफाई कामगारांनी नकार दिला तर स्वत:च झाडू घेऊन स्वच्छ करतात किंवा मग विद्यार्थांकडून स्वच्छ करून घेतात. गेल्या १२ वर्षांपासून माध्यमिक शाळेतलेही शिपाई, सफाई कामगारांची पदं रिक्त आहेत. राज्य सरकारकडून प्राथमिक शाळेला स्वच्छतेसाठी व साहित्यासाठी कुठलाही निधी उपलब्ध करून दिला जात नाही.  त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेने निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित असतं. मात्र, स्वच्छतेची जबाबदारी कोणीच घेत नाही. निधीही देत नाहीत.

बोल भिडूने एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता ते  म्हणाले की,

“वारंवार या संदर्भातील विनंती करूनही कुठल्याही पध्दतीचा स्वच्छतेसाठी निधी किंवा मग शिपाई दिला जात नाही. आजही शाळेतील स्वच्छता ही शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी करतात. अस्वच्छेतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होतो.”

अरविंद देवकर हे गेल्या १९ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या कुटुंबातील आरध्या पेक्षा जास्त सदस्य शिक्षक होते.

वडील माजी सैनीक होते तर पत्नी, भाऊ, भावजया देखील शिक्षका होत्या. शिक्षक कुटूंब म्हणून परिसरात त्यांच्या कुटुंबाची ओळख होती. अरविंद देवकर हे एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना माहित होते.  त्यांच्या कामामुळे आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांचा विद्यार्थ्यांकडून काम करून घेण्याचा हेतू नव्हता असंच समजतंय.

शिक्षक विभागाने ग्रामिण भागातील शाळांना सोयी सुविधा पुरवल्या नसल्यामुळेच अरविंद देवकर यांना आत्महत्या करावी लागली असं म्हटलं जातंय. ‘महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक महासंघानं’ या संदर्भात सखोल चौकशी तसेच शाळेसाठी लागणाऱ्या सुविधा न पुरवणाऱ्या आधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हटलं आहे.

अरविंद देवकर यांनी आत्महत्या तर केलीच आहे. पण, जर शिक्षक विभागाने गांभीर्याने घेत जिल्हा परिषद शाळेला सोयी सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित आज अरविंद देवकर यांना आत्महत्या करण्याची पाळी आली नसती. अरविंद देवकर यांची आत्महत्या झाली ती शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळेच.

हे ही वाच भिडू,

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.