विद्यार्थ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून, या संस्थेनं छतावरचे पंखे काढायचं ठरवलंय

दुर्दैवानं सध्या आपल्या कानावर सातत्यानं आत्महत्यांच्या बातम्या पडत आहेत. नुकतीच गेल्या काही महिन्यांत भारताच्या चार नेमबाजांनी अपयशामुळं आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमीही तुम्ही वाचली असेलच. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर एमपीएससीच्या दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांचा विषयही ताजाच आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित संस्थेत झालेल्या घटनांबाबत बोलणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

बंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची सुरुवात झाली १९०९ मध्ये. दोनच वर्षांनी म्हणजेच १९११ पासून इथं प्रत्यक्ष अभ्यासक्रमांना सुरुवात झाली. गेल्या जवळपास ११० वर्षांत या संस्थेनं अनेक स्थित्यंतरं अनुभवली. आजही ही संस्था वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीत देशात अग्रगण्य मानली जाते. मात्र सध्या ही संस्था चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि संस्थेनं त्यासाठी काढलेले उपाय.

गेल्या वर्षभरात संस्थेतल्या तीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, आणि त्याचा गंभीर परिणाम विद्यार्थ्यांवर झाला.

द प्रिंट या वृत्तसंस्थेला आयआयएससीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सायन्सच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत प्रयोग करणं आवश्यक असतं. ते काही ऑनलाईन होऊ शकत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी कॉलेजमध्येच थांबले. या विद्यार्थ्यांना फक्त वर्गात जाण्याची आणि हॉस्टेलमध्ये परत येण्याची परवानगी होती. या दरम्यान कोविड-19 चे नियम पाळण्याची दक्षता घेण्यासाठी कॉलेजने कोविड ब्रिगेडची स्थापना केली होती.’

‘आम्ही विद्यार्थी कॅन्टीन मधून आमचे टिफिन्स घ्यायचो आणि रूममध्ये जाऊन खायचो. विद्यार्थी काय करताय यावर कोविड ब्रिगेडचं लक्ष होतं. विद्यार्थ्यांना खुल्या मैदानात एकमेकांशी बोलण्याची परवानगीही नव्हती. त्यामुळं बाहेर इतकी भीषण परिस्थिति असताना एका जागी कोंडून राहण्याचा फटका आम्हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाला,’ अशी माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.

त्यातच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संस्थेनं हॉस्टेलमध्ये लावलेले ‘सिलिंग फॅन’ काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या निर्णयावर प्रचंड टीका झाली. ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हॉस्टेलच्या रुममध्ये लावण्यात आलेले सिलिंग फॅन्स काढले जातील आणि टेबल फॅन्स, भिंतीला बसवलेले फॅन्स उपलब्ध करण्यात येतील. मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार पाऊल उचलण्यात आलं आहे,’ असं आयआयएससकडून सांगण्यात आलं आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फॅन काढून टाकणं हा एकमेव उपाय त्यांच्याकडून योजला जात नाहीये.आम्ही कोविडच्या काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेलनेस सेंटरही उभारलं होतं. २४ तास कॉलिंग हेल्पलाईन आणि २४ तास ऑनलाईन समुपदेशनाची सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिली होती. आम्ही बाहेरुनही काही समुपदेशकांना बोलवायचो. विद्यार्थी त्यांना भेटून आपली समस्या सांगू शकतील असा आमचा यामागे विचार होता. सोबतच आम्ही वेगवेगळे वर्कशॉप्स आणि सेमिनार आयोजित करुन मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला,’ अशी माहिती संस्थेनं दिली.

विद्यार्थी मात्र या दाव्याशी सहमत नाहीत. त्यांच्यामते, ‘समुपदेशक कायम उपलब्ध असायचेच असं नाही. ते आठवड्यातून काही दिवस, काही तासांसाठीच यायचे. त्यांची संख्याही अपुरी होती, त्यामुळं मोठ्या संख्येनं असलेल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं त्यांना शक्य होत होतंच असं नाही.’

साहजिकच नुसते पंखे काढून टाकल्यानं आत्महत्या रोखता येतील, असा विचार करणंही चुकीचं आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत उपयुक्त उपाययोजना सुरु करणं आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.