अदानी आणि NDTV मध्ये व्यवहार तर झाला, आता अदानी NDTV चे मालक होणार काय ?

अदानी समुहानं NDTV विकत घेतल्याची बातमी आली, लागलीच यावर चर्चा सुरू झाल्या. कारण NDTV चॅनेल बऱ्याचदा नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचा विरोध करत असताना दिसतो. याला कारण असतात रविश कुमार. पण आता थेट अदानींच्याच ताब्यात हा चॅनेल आल्यानं चर्चा सुरू झाल्या, तर दूसरीकडे कोणतीही नोटीस, डिस्कशन न करता अदानी समुहानं NDTV ताब्यात घेतल्याच्या बातम्याही आल्या.

खरंच अदानी आता NDTV चे मालक असणार आहेत का? कोणतीही पुर्वसुचना न देता त्यांनी हे चॅनेल ताब्यात घेतलंय का? आणि NDTV विकत घेतलं आहे म्हणजे नेमकं काय केलंय?

तर पहिला मुद्दा असा की, 

अदानी समूह NDTV खरेदी करतायेत ही बातमी आणि त्यावरून होत असलेली चर्चा ही काही पहिल्यांदाच होत नाहीये. बरोबर 11 महिन्यांपूर्वी अशीच बातमी आली होती आणि सोशल मीडियावर तर्क-वितर्कांचा, रवीश कुमारांवर मिम्सचा पाऊस पडला होता. पण यात NDTV च्या शेअर होल्डर्सला जब्बर फायदा झालेला.

कारण जशी बातमी पसरली की अदानी NDTV खरेदी करणार आहेत तसे NDTV चे शेअर अचानक वाढलेपण. नंतर NDTV ने पुढे येऊन या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं होतं. मात्र मार्केटमध्ये अदानी NDTV विकत घेणार याच्या चर्च्या सुरूच होत्या.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांत NDTV चा शेअर तुफान फॉर्मात होता. 6 जुलैला 164 रुपयांवर असणारा NDTV चा शेअर आज 388 रुपयांपर्यन्त गेलेला दिसतो.

पण आता मात्र अदानी समुहाने NDTV चे 29.18 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. त्यांनी हे शेअर्स कसे घेतले, तर यात तीन कंपन्यांचा महत्वाचा रोल आहे.

  • पहिली अदानी समुहाची कंपनी आहे, AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड अर्थात AMNL
  • दुसरी याच AMNL ची अर्थात अदानींचीच कंपनी आहे, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड VCPL
  • तिसरी कंपनी NDTV चे राधिका रॉय आणि प्रणॉय रॉय यांची RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड

या तीन कंपन्यांमध्ये जे व्यवहार झाले त्यामुळेच अदानींना NDTV चे 29.18 टक्के शेअर्स घेता आले.

कसे तर अदानींच्या VCPL कंपनीनं रॉय यांच्या RRPR कंपनीचे 99.5 टक्के शेअर्स घेतले आहेत. याच RRPR कंपनीकडे NDTV चे 29.18 टक्के शेअर्स होते. त्यामुळे अदानींच्या कंपनीला NDTV चे 29.18 टक्के शेअर्स मिळाले.

आता समजून घेवू हा व्यवहार झाला कसा…

ज्या पद्धतीने अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने नेटवर्क 18 विकत घेतलं तीच स्क्रिप्ट NDTV आणि अदानी यांच्या व्यवहारात रिपीट झाल्याचं दिसतं. म्हणजे कसं तर बऱ्याचदा कंपन्या कर्ज घेत असतात. विशेषत: मिडीया क्षेत्रातल्या कंपन्या कर्ज घेतात, कारण त्या तोट्यात असतात. हे कर्ज डिबेंन्चर्स देऊन घेतलं जातं. म्हणजे कर्ज देणारा कंपनीचे डिबेंन्चर्स घेतो आणि कर्ज देतो.

आता यात कर्ज देणाऱ्याचा काय फायदा? 

तर तो जितकं कर्ज समोरच्या कंपनीला दिलं आहे तितक्याच रकमेचे डिबेंन्चर्स शेअर्समध्ये कन्व्हर्ट करू शकतो. अर्थात कर्जाचं शेअर्समध्ये रुपांतर. NDTV च्या बाबतीतही हेच झालं. कंपनीचे प्रमोटर असणारी कंपनी RRPR नं 2009 मध्ये अदानी समुहाच्या VCPL कंपनीकडून 400 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. आता ही RRPR कंपनी राधिका रॉय आणि प्रणॉय रॉय यांची. 400 कोटींच्या कर्जाचे डिबेंन्चर्स VCPL नं शेअर्समध्ये कन्व्हर्ट केले जे कायदेशीररित्या योग्य आहे.

आता ही कर्जाची रक्कम शेअर्समध्ये कन्वर्ट झाल्यानं RRPR वर संपूर्ण मालकीहक्क अदानी समुहाच्या VCPL चा झाला.

समजलं नसेल तर सोप्या शब्दात सांगतो…

NDTV च्या मालकांनी आपल्या कंपनीच्या मार्फत अदानींकडून 400 कोटींचं कर्ज घेतलं. ते फेडलं नाही म्हणून अदानींकडून NDTV च्या मालकांच्या त्या कंपनीतले 99.5 टक्के शेअर्स आपल्याकडे घेतले. NDTV च्या मालकांच्या त्या कंपनीकडे NDTV चे 29.18 टक्के शेअर्स होते, जे आपोआप अदानींकडे आले.

थोडक्यात सावकारानं जमीनीवर जप्ती आणली. आता शेतकरी म्हणतोय ऊस माझाय तर सावकार म्हणतोय शेत माझंय. असा हा कार्यक्रम झालेलाय. पण थांबा इथं शेतकऱ्यांचा सगळा ऊस गेलेला नाही. त्यांच्याकडं असणाऱ्या एकूण 100 एकरातला फक्त 29.18 एकर ऊस गेलाय. सावकाराला किमान 51 टक्के ऊस मिळाला तरच तो बहुमतात जाणार आहे.

म्हणजेच अदानी यांच्याकडे आता NDTV ची मालकी नाही, तर 29.18 टक्क्यांची भागीदारी आहे. त्यांना अजून 26 टक्के शेअर्स स्वत:कडे घेता आले तर ते 55.18 टक्क्यांच्या भागीदारीसहित मालक म्हणले जाऊ शकतात.

आता 26 टक्केच का ? तर ओपन मार्केटमधून 26 टक्के शेअर्स 294 रुपये दर निश्चित झाल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. तसं झालं तर मात्र अदानी हेच NDTV चे मालक होतील हे नक्की.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.