एक काळ होता, अमित शहा हे गडकरींना भेटण्यासाठी तासन्-तास बसून रहायचे

राजकारणात एक शब्द आहे दिर्घद्वेषी.. म्हणजेच एखाद्याचा द्वेष बाळगून राजकारणात मोठ्ठं होणं. प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाचा टाईम येतो. टाईम आला की हा द्वेष बाहेर काढणं. राजकारण पाहणारी लोकं अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्यात हा गुण असल्याचं सांगतात.

एखादा माणूस भुतकाळात मदतीला धावून आला होता म्हणून त्याची जाणीव ठेवणं हे जितकं महत्वाचं असतं तसच एखाद्या माणसाने भूतकाळात मदत केली नसेल, तो आडवं गेला असेल तर वेळेकडे ती जबाबदारी सोपवून काम करत राहणं, पण डोक्यात ठेवणं देखील महत्वाचं असतं. 

आत्ता हे सांगण्याचा किस्सा म्हणजे गडकरींचे पंख छाटण्याचा होत असलेला कार्यक्रम. गडकरींना संसदीय समितीतून बाहेर ठेवण्यात आलं. 2014 साली त्यांच्याकडे असणारी मंत्रालयांची जबाबदारी आणि आज असणारी जबाबदारी यातही प्रचंड फरक असल्याचं जाणवतं.. 

अशा वेळी अमित शहा आणि गडकरींचा तो जूना किस्सा सांगावा वाटतो.. 

साल होतं 2010 चं.. चार वर्षांपासून देशाच्या राजकारणात सोहराबुद्दीन एन्काऊंटरच्या बातम्या चालू होत्या. केंद्रीय तपासयंत्रणा CBI ने सोबराबुद्दीन केसचा तपास आपल्या हाती घेतला होता. या गोष्टीचा फायदा घेवून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर टिका सुरू होत्या.. 

याच दरम्यान म्हणजेच 2009 साली भाजपच्या दिल्लीच्या राजकारणात एक धक्कातंत्र वापरण्यात आलं होतं. केंद्रातील तुल्यबळ नेत्यांमध्ये कुठेच नसणाऱ्या नितीन गडकरींची निवड भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झाली होती. असं म्हणतात की संघाने पुर्ण प्रयत्न करून भाजपवर वरचष्मा ठेवण्यासाठी नितीन गडकरींची निवड केली होती. 

महाराष्ट्रातील राजकारणापुरते मर्यादित असणारे नितीन गडकरी एका क्षणात भाजपचा केंद्रबिंदू झाले होते.

त्यांच्या दिल्लीतल्या कार्यालयाबाहेर भाजपचे मुख्यमंत्री, नेते वेटिंगला बसत असत. गडकरी देखील दिल्लीच्या राजकारणात वर्षभरातच मुरले होते.. 

अशात इकडे गुजरातमध्ये सोहराबुद्दीन केसचा फास आवळत चाचला होता. आरोपांच्या केंद्रबिंदूवर अमित शहा यांच नाव आलं होतं. अखेर हायप्रोफाईल केसमध्ये अमित शहांच्या अटकेचे आदेश सुटले. तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहांना अटक करण्यात आली. तो महिना होता जूलै 2010.

सुमारे तीन महिने अमित शहा कौलारू कारागृहात बंद होते. या काळात एकमेव माणूस त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा होता तो म्हणजे नरेंद्र मोदी. कालपर्यन्त अमित शहांच नेतृत्व मान्य करणारे अमित शहांच्या सावलीला देखील उभा रहात नव्हते. 

तीन महिन्यानंतर अमित शहांना जामीन मिळाला, मात्र ते गुजरातमध्ये राहिले तर केसवर प्रभाव टाकतील अस कोर्टात म्हणणं मांडण्यात आलं आणि तोच सुप्रसिद्ध आदेश काढण्यात आला.. 

अमित शहांना गुजरातमधून तडीपार करण्यात आलं.

2010 च्या शेवटाकडे अमित शहा दिल्लीत आले. गुजरातमध्ये प्रवेश नव्हता. या काळात दिल्लीतली त्यांची हक्काची वास्तू होती गुजरात भवन. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 7 रेसकोर्स या घरापूसन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कौटिल्य मार्गावर गुजरात भवन होते. इथे असणाऱ्या दोन छोट्या खोल्यामध्ये अमित शहा आपल्या पत्नीसह राहू लागले. 

तेव्हा अमित शहा गडकरींना भेटण्यासाठी तासन् तास बसून रहायचे. आजही ल्यूटियन्स दिल्लीमध्ये हा किस्सा सांगितला जातो. जेष्ठ पत्रकार प्रताप सिंह यांनी देखील या घटनेचं वर्णन केलं आहे. तेव्हा अमित शहांचे वाईट दिवस चालू होते तर नितीन गडकरी अचानकपणे दिल्लीच्या केंद्रबिंदूवर विराजमान झाले होते. पण हे प्रकरण इतक्यावर थांबल नाही.. 

अमित शहा यांच्यानंतर गडकरींना मोदींचे पंख छाटण्याचा कार्यक्रम देखील केल्याचा इतिहास सांगतो. संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यातून विस्तव देखील जात नसे. 2009 साली आलेल्या तथाकथित सिडी प्रकरणानंतर संजय जोशी पक्षातून बाहेर फेकले गेले. मात्र 2012 सालच्या उत्तरप्रदेशच्या निवडणूकांच्या निमित्ताने संजय जोशींना बळ देण्याचं काम गडकरींनी केलं. 

2012 साली गडकरींनी थेट संजय जोशींनी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकांची जबाबदारी दिली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली व संजय जोशींची जबाबदारी काढून घेण्याची मागणी गडकरींकडे केली. पण गडकरी बधले नाही, शेवटी आपलं गुजराती अस्त्र बाहेर काढत राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचं धोरण मोदींनी स्वीकारला. अखेर गडकरींना मोदींच ऐकावं लागलं.. 

त्यानंतरचा छोटा प्रसंग म्हणजे, 2014 च्या निवडणूकपुर्वी.. 

अडवाणी नसतील तर भाजपसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल या चर्चा चालू होत्या. तेव्हा सुषमा स्वराज्य, नितीन गडकरी व नरेंद्र मोदी अशी नावे चर्चेत होती. भाजपला एकहाती सत्तेत येण्याची खात्री नसल्यानेच समविचारी पक्षांना मान्य असेल असा उमेदवार निवडण्यात येणार होता. त्यावेळी मोदींच नाव समोर येवू लागलं. नितीश कुमारांनी त्यावर हरकत घेण्यास सुरवात केली… 

नितीश कुमारांनी तेव्हा थेट राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरींना विचारलं होतं, तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींचं नाव समोर आणणार आहात का? 

अशा वेळी गडकरींनी उत्तर दिलेलं. मी तुम्हाला खात्री देतो, निकालापुर्वीं भाजपकडून कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषीत केले जाणार नाही.. 

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नितीन गडकरी देखील होते, पण अशातच पुर्ती घोटाळ्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासोबतच पंतप्रधान पदाच्या उमेदवारांच्या रेसमधून देखील गडकरी बाहेर फेकले गेले.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.