अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते का ?

२४ जानेवारी १९६६ ,सकाळचे ७ वाजले होते तेव्हा रेडियोवर बातमी आली,  एयर इंडिया १०१ विमान ‘कांचनजंगा’  हे मुंबईवरून लंडन ला जात असताना आल्प्स पर्वतरांगेत कोसळले. या विमानात ११७ प्रवासी होते, यातील कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही.

यामध्ये होते भारताचे जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा.

ही बातमी ऐकल्यावर भारत सरकारवर मोठा अणुबॉम्ब पडल्यापेक्षा मोठा आघात होता. त्यांच्या जाण्याने भारतीयअणुसंशोधनाला मोठा सेटबक बसला होता. काही महिन्यापूर्वीच होमी भाभा रेडियो वर बोलताना म्हणाले होते की

“मला परवानगी दिली तर अठरा महिन्यामध्ये मी भारतासाठी अणुबॉम्ब बनवू शकतो.”

होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये मुंबईच्या एका गर्भश्रीमंत पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोठे वकील होते. टाटा उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा यांच्याशी नाते लागायचे. मुंबईच्या पारसी सर्कल मध्ये होमी भाभा यांच्या बुद्धिमत्तेची चर्चा ते लहान असताना पासूनच होती.

पुढे भाभानां जगातल्या सर्वोत्तम अशा केब्रिज विद्यापीठात शिकण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांच्या वडिलांची आणि तेव्हाचे टाटा कंपनीचे मालक दोराबजी टाटा यांची इच्छा होती की होमीनी तिथे मेकनिकल इंजिनियरिंग करावे आणि टाटा स्टील मध्ये नोकरी पकडावी. पण होमी भाभाना गणिताची आवड होती.

अखेर त्यांचे वडील त्यांच्या केंब्रिजच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करण्यास तयार झाले फक्त एका अटीवर आधी इंजिनियरिंग पूर्ण करायचे आणि मग गणिताचे संशोधन . होमी भाभा यांनी पॉल डेरेक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचे ट्रायपोज कोर्स पूर्ण केला. याच काळात त्यांना अणुभौतिकशास्त्रात इंटरेस्ट निर्माण झाला. 

सुप्रसिद्ध कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. नील्स बोहरसारख्या दिग्गज वैज्ञानिकाच्या बरोबर त्यांनी काम केले. त्यांना मानाचा अॅडम्स पुरस्कार ही मिळाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते भारतात आले. नोबेल पुरस्कार विजेते सीव्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली ते संशोधन करू लागले. याच काळात त्यांनी भारतीय नेत्यांच्या विशेषतः त्यांचे मित्र जवाहरलाल नेहरुंना अणुप्रकल्पाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची स्थापना केली.

पुढे जेव्हा भारताला  स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरूंनी त्यांना अणुउर्जा प्रकल्पाची जबाबदारी दिली. होमी भाभा यांनी महागड्या युरेनियमच्या ऐवजी भारतात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या थोरियमचा वापर अणुप्रकल्पासाठी करता येते का या दिशेने संशोधन सुरु केले. तीनस्तरीय अणुउर्जा कार्यक्रम सुरु झाला. 

FL21 BHABHA 2493615g

नेहरूंच्या मृत्यूनंतर या कार्यक्रमाला काहीसा खीळ बसेल असं सर्वाना वाटलं पण लालबहादूर शास्त्रींनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरूच ठेवला. गांधीच्या अहिंसा हे तत्व मानणाऱ्या देशात अणुप्रकल्प कशाला अशी ओरड काहींनी केली मात्र शास्त्रीजींनी याला भिक घातली नाही.

भाभा अणुबॉम्ब हा देशाच्या स्वसंरक्षणासाठी गरजेचा आहे आणि त्याचा वापर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केला गेला पाहिजे याच मताचे होते.

जगामध्ये शीतयुद्धामुळे  तिसऱ्या महायुद्धाची नांदी निर्माण झाली होती. अणुबॉम्ब तयार करण्याची स्पर्धा सुद्धा जोमात होती. १९४५मध्ये अमेरिकेने अणुबॉम्ब बनवल्यानंतर साठच्या दशकात रशिया आणि चिं यांनी सुद्धा अणुचाचणी घेतली. या महासत्तांच्या स्पर्धेत एकच विकसनशील देश असा होता जो अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता राखून होता तो म्हणजे भारत आणि त्याचे कारण म्हणजे होमी भाभा.

१९६६ साली डॉ. भाभा व्हिएन्ना इथल्या एका परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहुन निघाले. एयरइंडियाचे बोईंग ७०७ विमान होते.

विमान आल्प्स पर्वतरांगा वरून जात असताना वैमानिकाला वाटले की आपण माँट ब्लांक शिखर पार केले आहे. त्याचे आणि कंट्रोल रूममध्ये काही मिस कम्युनिकेशन झाले .याच गोंधळात हे विमान फ्रान्स हद्दीत माँट ब्लांकवर कोसळले.

अनेकांनी हा अपघात नसून या मागे परकीय शक्तीचा हात असल्याचा दावा केला. या पूर्वी १९५० साली याच ठिकाणी एयर इंडियाच्या आणखी एका विमानाचा अपघात झाला होता. होमी भाभा यांच्यासारखा भारताचा अणुविज्ञाना मधला हुकमी एक्का अशा अपघातामुळे गेला हे सत्य पचवणे अवघड होते.

काही वर्षंपूर्वी एका डनियल रोषे नावाच्या एका गिर्यारोहकाला या शिखरावर भारतीय विमानाचे काही अवशेष सापडले. यावरून परत घातपाताच्या शक्यतेची चर्चा सुरु झाली. 

सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संघटना आपल्या इतर देशाच्या अंतर्गत घडामोडीमध्ये नाक खुपसण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद करारावेळी झालेल्या अनपेक्षित मृत्यूमागेही सीआयएच हात असण्याची शक्यता बोलून दाखवली जाते.

२००८साली प्रसिद्ध झालेल्या “कन्व्हरसेशन विथ क्रो” या पुस्तकात सीआयएचे माजी अधिकारी रोबर्ट क्रावली यांच्या आणि पत्रकार ग्रेगरी डग्लस यांच्या संभाषणामध्ये भाभांच्या अपघाताचा उल्लेख आहे.

सीआयएच्या या माजी अधिकाऱ्याच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा झाला तर हे अमेरिकेने भारताचा अणुप्रकल्प हाणून पडण्याचे मोठे षडयंत्र होते. तो म्हणतो,

“आम्हाला माहित होते हा एकच माणूस जगात असा होता की तो कोणत्याही महासत्तेच्या मदतीशिवाय अणुबॉम्ब बनवू शकत होता. म्हणूनच त्यांच्या विमानात बॉम्ब ठेवून त्यांचा अपघात घडवून आणला गेला.”

डॉ. भाभांना जाऊन पन्नासच्या वर वर्षे झाली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भारताने दोनवेळा अणुचाचणी घेतली. भारताच्या अणुप्रकल्पाला खोडा घालणाऱ्या अमेरिकेला अखेर आपल्याशी अणुकरार सुद्धा करावा लागला. पण इतक्या वर्षात भाभांच्या मृत्यूचे गूढ शेवटपर्यंत कायमच राहिले आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Vinesh Gondane says

    Nice information about Bhabha sir

Leave A Reply

Your email address will not be published.