बॅन वैगेरे सोडाच..रशियाने मेटाला दहशतवादी संघटना ठरवलं त्यामागे भलं मोठं राजकारण आहे

काही महिन्यांपूर्वी अचानक वॉट्स ॲप बंद झालं होतं तेव्हा अनेकांची भंबेरी उडाली होती. पण भिडूंनो व्हाट्स पमुळे काही तासांसाठी असं झालंय मग जर फेसबुक आणि इंस्टाग्राम कायमचेच बंद झाले तर काय अवस्था होईल. 

टेन्शन घेऊ नका आपल्या देशात असं काही झालं नाहीय. पण रशियाने मात्र फेसबुकला आणि इंस्टाग्रामला पूर्णपणे बॅन केलंय. तर आता फेसबुकच्या मेटा कंपनीला थेट दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांच्या यादीत समाविष्ट केलंय.

रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर फायनॅन्शिअल मॉनिटरिंग संस्थेच्या अहवालामुळे रशियाने ही कारवाई केलीय.  

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला सुरुवात झाली तेव्हा युक्रेनच्या नागरिकांमध्ये रशियाबद्दल प्रचंड रोष होता. तेव्हा १० मार्च २०२२ रोजी मेटा कंपनीने स्वतःच्या व्यासपीठावर ‘रशियन हल्लेखोरांचा मृत्यू’ असं मत मांडण्याची मुभा दिली होती. 

मेटाचं हे पाऊल रशियन लोकांच्या विरोधात असल्यामुळे रुसोफोबियाला म्हणजेच रशियाबद्दलच्या फोबीयाला खतपाणी दिलं जात आहे. असा हवाला देऊन मार्च २०२२ मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामला रशियात बॅन करण्यात आलं होतं. 

तेव्हा मेटा कंपनीने रशिया सरकारच्या या कारवाईच्या विरोधात रशियन कोर्टात धाव घेतली होती.

कोर्टात मेटाने युक्तिवाद केला होता की, “असं बोलण्याची मुभा केवळ युक्रेनच्या लोकांनाच दिली होती. इतरत्र कुठेही अशी मुभा नाही. मेटा कोणत्याही प्रकारे रूसोफोबियाला पाठिंबा देत नाही”

पण रशियन कोर्टाने मेटाची याचिका फेटाळून लावली आणि रशियन सरकारचा मेटावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळेच आता रशियाने मेटाला दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केलंय.

पण रशियाने मेटावर ज्या रूसोफोबियाचा हवाला देऊन कारवाई केलीय तो रूसोफोबिया म्हणजे काय भानगड आहे?

तर रशिया, रशियन लोकं आणि रशियन संस्कृती याबद्दल नकारात्मक मत असणे म्हणजे रूसोफोबिया होय. सध्या जगातील बहुतांश लोकशाही आणि पाश्चिमात्य देशांचं मत रशियाबद्दल नकारात्मक आहे. पण आज जरी रशियाबद्दल लोकांमध्ये नकारात्मकता असली तरी पूर्वी असं नव्हतं. कारण पूर्वी रशियामध्ये सुद्धा इतर देशांप्रमाणे राजेशाहीच होती.

पण १९ व्या शतकापासून रूसोफोबियाचा प्रसार होतोय. तसेच रशियात कम्युनिस्ट राजवट आल्यापासून लोकशाही देशांमध्ये हे विचार मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत.  

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने रशियाच्या विरोधात लढतांना रूसोफोबियाचा प्रसार केला होता. जर्मनांनी रशियन लोकांना हीन वंशाचे समजून हिणवलं होतं. तसेच युद्धात बंदी बनवण्यात आलेल्या लाखो रशियन सैनिकांची आणि नागरिकांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून पश्चिम युरोपातील देश आणि अमेरिकन देश रशियाबद्दल नकारात्मक विचार करतात.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या काळात रूसोफोबियात काही प्रमाणात घसरण झाली होती. तसेच रशियामध्ये व्यवस्था सुधारत आहे असा आशावाद निर्माण झाला होता. मात्र गोर्बाचेव्ह यांची सत्ता गेली आणि रशियाबद्दल पाश्चिमात्य नागरिकांचं मत पुन्हा जैसे थे झालं.

पुतीन जेव्हापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून यात आणखी वाढ झालेली आहे. पुतीन हे हुकूमशाही पद्धतीचे आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. तसेच पुतीन पत्रकारांची हत्या, विरोधकांचं दमण, मानवहक्कांची पायमल्ली होत असल्याने पुतीन आणि रशिया यांच्याबद्दल नाकारात्मकतेत वाढ झाली.

प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, १८ देशांमधील रशियाबद्दल नकारात्मक भावना ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

यात अमेरिका, युके, कॅनडा, जर्मनी, फ्रांस, स्वीडन या पाश्चिमात्य देशांचा आणि जपान, सिंगापूर या एशियन देशांचा सुद्धा समावेश होतो. मात्र भारताबरोबर रशियाचे कायम मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे भारतीय लोक रशियाबद्दल नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचारच जास्त करतात.

पण जेव्हापासून रशियाने युक्रेनवर आक्रमण केलंय तेव्हापासून रूसोफोबियात वाढ होत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे पुतीन यांना जगात सगळ्यात जास्त नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं. त्यांच्यापासून जगाला धोका आहे असा मतप्रवाह तयार होता आहे असं संशोधक सांगतात.

याच रूसोफोबियाला मेटाच्या ॲप्सच्या माध्यमातून खतपाणी मिळत आहे असा हवाल देऊन रशियाने मेटाला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलंय. 

रशियाच्या या कारवाईमुळे मेटा कंपनीला बराच फटका बसलाय. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, रशियात वॉट्स ॲपंचे ८० लाख युजर्स आहेत, फेसबुकचे ७० लाख युजर्स होते तर इंस्टाग्रामचे ६८ लाख युजर्स होते. इंस्टाग्रामच्या युजर्सपैकी ३० लाख युजर्स एकट्या लॉकडाउनच्या काळात वाढले होते.

मेटाच्या एकूण जाहिरात क्षेत्रापैकी १.५ टक्के जाहिराती या रशियात दिल्या जात होत्या. पण फेसबुक आणि इंस्टाग्रामला बॅन केल्यानंतर युजर्स यु-ट्यूब आणि टिक-टॉक कडे वळले होते. म्हणूनच या बंदीमुळे मेटाला वार्षिक १.७ अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल १४ हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. 

फेसबुक आणि इंस्टाग्रामला बॅन केल्यानंतर मे २०२२ मध्ये रशियाने अमेरिकेतील ९६३ लोकांना देशात प्रवेश बंदी केली होती.

रशियाने प्रवेशबंदी केलेल्या लोकांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या नावाचं सुद्धा समावेश होता. तसेच या निर्णयापाठोपाठ रशियाने गुगल, लिंक्डइन, मायक्रोसॉफ्ट, यु ट्यूब यांच्या सेवांवर सुद्धा निर्बंध लादले होते. गुगल न्यूजच्या बातम्या, यु-ट्यूबचे व्हिडीओ यांवर काही बंधन आली होती  

पण आता निर्बंध लादणे आणि बॅन करण्याच्या पलीकडे जाऊन रशियाने मेटा कंपनीला थेट दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकण्यात आलंय. रशियाचं हे पाऊल अनपेक्षित नाही मात्र रशियाने केलेली ही  कारवाई व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अयोग्य आहे असं विश्लेषक सांगतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.