भारतात लाखो फॉरेनर्स येतात पण टार्गेटवर नेहमी नायजेरियन नागरिकच असतात

हरियाणाच्या गुरुग्राम मधील डी जी गोएंका या खासगी विद्यापीठात काही भारतीयांनी नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यामुळे विद्यापीठात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात भारतीय विद्यार्थी आणि नायजेरियन विद्यार्थी एकमेकांवर हल्ला केल्याचे आरोप करत आहेत.

या प्रकरणानंतर ५० नायजेरियन विद्यार्थी विद्यापीठ कॅंपस सोडून दिल्लीमध्ये असलेल्या नायजेरियाच्या राजदूत कार्यालयात गेलं.

या प्रकरणात राजदूतांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर नायजेरियन राजदूत कार्यालयाची एक टीम विद्यापीठात आली आणि त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या घटनेमुळे पुन्हा एकदा नायजेरियन राजदूत कार्यालयाने हल्ल्याच्या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ फुटबॉल टीममध्ये एका विद्यार्थ्याला बदलण्यात आलं होतं त्यावरून हा वाद सुरु झाला होता. मात्र या प्रकरणात ८ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

पण नायजेरियन विद्यार्थी आणि नागरिकांवर भारतात झालेला हा एकमेव हल्ला नाही. 

यापूर्वी सुद्धा भारताच्या वेगवगेळ्या शहरांमध्ये नायजेरियन लोकांवर हल्ले करण्यात आले होते. २०१७ सालात हैद्राबाद शहरामध्ये एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्यामुळे त्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. तसेच एका नायजेरियन विद्यार्थ्यांच्या कारमध्ये भारतीय व्यक्तीने डोकं घालून हुज्जत घातली होती. अशाप्रकारे अनेकदा नायजेरियन विद्यार्थी आणि नागरिकांवर भारतात हल्ले करण्यात आले आहेत.

२०१७ मध्ये नोएडामध्ये एका विद्यार्थ्याचा नशेच्या अवस्थेत मृत्यू झाला होता. त्याला नायजेरियन लोकांनी ड्रॅग दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप होता. या प्रकरणात आरोपी नायजेरियन लोकांना अटक करण्यासाठी एक आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनादरम्यान ८ नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. 

त्या हल्ल्यामुळे नायजेरिया आणि भारताचे संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले गेले होते.

हल्ल्यानंतर नायजेरिया सरकारने भारतीय राजदूताला बोलावून त्यांच्याकडे या घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवला होता. 

नायजेरियन सरकारने म्हटलं होतं की,

”दोन्ही देशांमध्ये चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परंतु नोएडात नायजेरियन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्यात जे दोषी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. दोन्ही देशांमध्ये संबंध चांगले राहावेत यासाठी अशा घटना पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात यावं.”

भारतात झालेल्या त्या हल्ल्यानंतर नायजेरियामध्ये असलेल्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

“नायजेरियामध्ये कापड कारखान्यात काम करणाऱ्या आणि शिक्षकाची नोकरी करणाऱ्या भारतीयांवर असलेला स्थानिक लोकांचा विश्वास कमी झाला होता.”

असं नायजेरियात राहणाऱ्या भारतीयांनी सांगितलं होतं.  

तेव्हा देशभरात नायजेरियन आणि आफ्रिकन लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर कडक कारवाई करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कडक पाऊल उचलण्याचे आदेश दिले होते. 

या घटनेसोबतच अनेकदा नायजेरियाचं राजदूत कार्यालय आणि आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या संघटनांनी भारत सरकारला कारवाई करण्याबद्दल मागण्या केल्या होत्या.

पण जगातील अनेक देशांमधून फॉरेनर्स भारतात येत असतांना निव्वळ नायजेरियन विद्यार्थी आणि नागरिकांवर हल्ले का केले जातात?

तर नायजेरियन लोकांवर भारतात हल्ले होण्यामागे अनेक कारणं जबादार मानली जातात. यात वर्णद्वेष, नायजेरियन लोक नरमांस खातात अशी अफवा, नायजेरियन लोकांकडून केले जाणारे गुन्हे आणि  नायजेरियन लोकांकडून भारतात केला जाणारा ड्रग्सचा व्यापार या घटकांना कारणीभूत मानलं जातं.

यात नायजेरियन लोकांकडून केल्या जाणाऱ्या ड्रग्सच्या व्यापाराला सगळ्यात मोठं कारण मानलं जातं. 

डिसेंबर २०१८ मध्ये मुंबई शहरातून १८ नायजेरियन लोकांना ड्रग्सचा व्यापार करण्याच्या केसमध्ये अटक केली होती. २०२१ मध्ये द्वारका शहरात नशेची औषध विकतांना २ नायजेरियन लोकांना अटक करण्यात आली होती. सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईत ड्रग्सचा व्यापार करणाऱ्या २ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती.

तर जानेवारी २०२२ मध्ये हैद्राबाद पोलिसांनी मुंबईतून नायजेरियन ड्रॅग माफियाला अटक केली होती. तो नायजेरियन व्यक्ती भारतात ड्रगचा व्यापार करणाऱ्या मोस्ट वाँटेड माफियांपैकी एक होता.  

यासारखी अनेक प्रकरण आहेत ज्यामध्ये नायजेरियन लोकांकडून भारतात ड्रग्सचा व्यापार होत असल्याचे सिद्ध झालेलं आहे. २०१७ मध्ये नोएडा शहरात १२ वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू सुद्धा ड्रग्समुळेच झाला होता. तेव्हा झालेला हल्ला सुद्धा ड्रग्स विकणाऱ्या नायजेरियन लोकांवर असलेल्या रागातूनच करण्यात आला होता.

नायजेरियन लोकांच्या दिसण्यामुळे आणि गैरसमजांमुळे सुद्धा त्यांच्यावर हल्ले केले जातात.

इतर आफ्रिकन लोकांसोबतच नायजेरियन लोकांची उंची आणि त्यांच्या शरीरयष्टीमुळे लोकांच्या मनात नायजेरियन लोकांबद्दल अनेक गैसमज आहेत. अनेक फिल्म्समध्ये आफ्रिकन लोकांना क्रिमिनल म्हणून दाखवलं जातं. त्यामुळे लोकांच्या मनात नायजेरियन लोकांची क्रिमिनल अशीच ओळख बनलीय.

यासोबतच नायजेरियन लोक मानवी मांस खातात असा गैरसमज सुद्धा भारतीयांच्या मनात आहे. 

मार्च २०१७ मध्ये दिल्लीत एक मुलगा बेपत्ता झाला होता. तेव्हा स्थानिक लोकांनी जवळच राहणाऱ्या नायजेरियन विद्यार्थ्यांच्या फ्रिजची तपासणी करण्याची मागणी केली होती. लोकांनी नायजेरियन विद्यार्थ्यांनी खाण्यासाठी विद्यार्थ्याला मारलं आहे असा आरोप करून लोकं फ्रिज तपासण्यासाठी घरात शिरले होते. 

या हल्ल्यांमागे नायजेरियन लोकांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारीचा सुद्धा संदर्भ दिला जातो.

सप्टेंबर २०२० मध्ये नायजेरियन लोकांकडून करण्यात आलेली ५६० कोटीची केस समोर आली होती. मे २०२२ मध्ये नायजेरियन नागरिकांकडून सायबर फ्रॉड करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. अशा गुन्हेगारी घटनांमुळे सुद्धा भारतीयांचा नायजेरियन लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पण हे मत निव्वळ सामान्य भारतीयांच्याच मनात नाहीय.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री राम नाईक यांनी नायजेरियन लोकांवर भारतात बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती.  

राम नाईक म्हणाले होते की, नायजेरियन लोकं जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांना भारतात येण्याचं कारण विचारायला हवं. ते शिक्षणासाठी भारतात आलेत, पर्यटनासाठी आलेत की ड्रग्ज विकण्यासाठी आलेत याची चौकशी केली पाहिजे. नायजेरियन लोकं गोव्यातील शहरांमध्ये समस्या निर्माण करत आहेत. नायजेरियन पर्यटकांची गोव्यात काहीच गरज नाही असं ते म्हणाले होते.”

पुढे ते म्हणाले होते की, नायजेरियन लोकं भारतात गुंडगिरी करण्यासाठी आले आहेत, दिल्ली, बंगलोर या सगळ्या शहरातून त्यांना पळवून लावण्यात आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. 

राम नायकांसोबत गोव्याच्या आणखी नेत्यांनी अशी विधान केली होती. त्याच वर्षी रिपब्लिक ऑफ कांगोमधील एका नागरिकाला दिल्लीत मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर आफ्रिकन देशांच्या अनेक राजदूतांनी भारत सरकारकडे नाराजी व्यक्त केली होती.

गोव्यासोबतच दिल्लीतील मोहन गार्डन परिसरात आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणावर राहत असल्यामुळे त्याला मिनी आफ्रिका असं म्हटलं जातंय.

दिल्लीच्या मोहन गार्डन परिसरात इतर भागाच्या तुलनेत भाडं कमी असल्यामुळे आफ्रिकन लोकं या भागात राहायला येत होते. परंतु दिल्लीतील इतर भागात आफ्रिकन लोकांवर हल्ले वाढत वाढायला लागले, तेव्हा संपूर्ण दिल्ली एनसीआर मधील आफ्रिकन वंशाच्या लोकांनी मोहन गार्डन परिसरात एकत्र राहायला सुरुवात केली. आता मोहन गार्डन परिसरात आफ्रिकन लोक मोठ्या संख्येने राहत आहेत.परंतु मोहन गार्डन परिसरातील नागरिकांना सुद्धा अशाच प्रकारचा भेदभाव सहन करावा लागतो. 

पण आता डी जी गोएंका विद्यापीठात नायजेरियन विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा नायजेरियन राजदूत कार्यालयाने भारत सरकारकडे याबद्दल नाराजी व्यक्त केलीय तसेच नायजेरियन विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना सुद्धा यावर कारवाईची मागणी करत आहेत. त्यामुळे भारत आणि नायजेरियाच्या संबंधात पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.