फोटो असणारे मतदान कार्ड बनवायला घेतले आणि त्यांना भारताचा पहिला मतदार सापडला…

हिमाचल प्रदेशच्या निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतांना आज देशाचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते यामुळे हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी त्यांनी टपाल पद्धतीने मतदान केलं. यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी स्वतः मतपेटी घेऊन त्यांच्या घरी गेले होते.

२ नोव्हेंबर रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी त्यांनी शेवटचं मतदान केलं आणि आज त्यांचं निधन झालं.

नेगी यांच्या निधनावर हिमाचल प्रदेश सरकार आणि निवडणूक आयोगाने शोक व्यक्त केलाय, तसेच शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

श्याम सरण नेगी यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिलं मतदान केलं होतं. त्यांनी हे ऐतिहासिक काम केलं असलं तरी त्यांच्या कामाची माहिती देशातील कोणालाच नव्हती.

परंतु निवडणूक आयोगाच्या एका ध्येयवेड्या अधिकाऱ्याच्या शोधामुळे हा इतिहास जगासमोर आला.

१५ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग कामाला लागलं होतं. निवडणुकीसाठी राज्यातल्या सर्व मतदारांची योग्य नोंद करून त्यांच्या फोटोसह मतदान कार्ड बनवले जात होते. या प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत होता.

यात देशात सगळ्यात प्रथम निवडणूक घेण्यात आलेल्या किन्नौर-सिलोन भागातील मतदारांचे ओळखपत्र बनवण्याचं काम सुरु होतं. किन्नौर जिल्हा हिमालयाच्या अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे इथलं काम युद्ध पातळीवर केलं जात होतं. 

काम करत असतांनाच हिमाचल प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी मनीषा नंदा आणि किन्नौरच्या जिल्हाधिकारी सुधा देवी यांना ९० वर्षाच्या एका मतदारचं ओळखपत्र सापडलं. एवढ्या वयस्कर व्यक्तीचे ओळखपत्र बघितल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी या व्यक्तीबरोबर बोलून त्यांची माहिती घेण्याचं ठरवलं. लागलीच सुधा देवी किन्नौरला पोहोचल्या आणि श्याम सरण नेगी यांची भेट घेतली. 

या भेटीमध्ये नेगी यांनी आपण स्वतः देशातलं पहिलं मतदान केलं असल्याच्या आठवणी सुधा देवी यांना सांगितल्या. 

नेगी हे किन्नौरच्या परिसरातले प्रतिष्ठित शिक्षक होते आणि त्यांनी लोकांना मतदान करण्यासाठी जागृत करण्यासाठी अनेक काम केले होते. यामुळे सुधा देवी यांनी ही गोष्ट मनीषा नंदा यांना कळवली. ही माहिती कळल्यानंतर मनीषा नंदा यांनी ही गोष्ट खरी आहे की नाही याचा शोध घ्यायला सुरुवात केली. 

नंदा यांनी निवडणूक आयोगाचे जुने रेकॉर्ड तपासण्यासाठी चार महिने मेहनत केली. हिमाचल प्रदेश चे जुने निवडणूक अभिलेख आणि दिल्ली मध्ये असलेले देशाच्या निवडणुकीचे अभिलेख शोधण्यात आले. या सगळ्या नोंदी शोधून त्यातून पहिल्या निवडणुकीची आणि आजवरच्या सर्व निवडणुकांची माहिती काढण्यात आली. 

या तपासामध्ये देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ शोधण्यात आला. 

देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूक आयोगाने १९५१-५२ मध्ये देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक घेतली होती. या पहिल्या निवडणुकीसाठी आयोगाने देशभरात तयारी सुद्धा केली होती. जगप्रसिद्ध निळी शाई, बॅलेट पेपर, मतपेट्या या सगळ्यांची वापर करण्यात आला.

पण देशाच्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळं वातावरण आणि वेगवेगळ्याअडचणी होत्या. म्हणून निवडणूक आयोगाने मतदानासाठी एकूण ६८ टप्पे ठरवले होते. या सगळ्यांमध्ये हिमाचल प्रदेश आणि जम्मू मध्ये सार्वधिक अडचणी होत्या. हिवाळ्यामध्ये या भागात प्रचंड बर्फ पडतो आणि सगळे रस्ते उन्हाळा येईपर्यंत बंद राहत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च १९५२ या नियोजित वेळेत भागात निवडणूक घेणे शक्य नव्हते.

यावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑक्टोबर १९५१ मध्येच हिमाचल प्रदेशमध्ये मतदान घेण्याचं ठरवलं.

या निवडणुकीसाठी सरकारी शाळेत शिक्षक असलेल्या नेगी यांच्याकडे किन्नौरच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे लोकांना याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने आधी प्रायोगिक निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीचे उमेदवार घोषित झालेले नसताना सुद्धा हे मतदान घेण्यात आलं. या मतदानासाठी एक मोठी मतपेटी टेबलवर ठेवण्यात आली आणि सरकारी अधिकाऱ्यांना मतदान करण्यासाठी सांगण्यात आलं. 

२५ ऑक्टोबर १९५१ रोजी सगळ्यात अगोदर श्याम सरण नेगी यांनी बॅलेट पेपरवर स्वतःच नाव लिहून पेपर मतपेटीत टाकलं आणि भारताच्या लोकशातलं पहिलं मतदान पार पडलं. मनीषा नंदा यांनी सलग ४ महिने प्रयत्न करून याचेच संदर्भ शोधून काढले होते.

अखेर मनीषा नंदा यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि नेगी यांना देशातील पहिले मतदार असल्याचं प्रमाणपत्र मिळालं. 

जुलै महिन्यात सुरु झालेला हा शोध नोव्हेंबर महिन्यात संपला आणि नेगी यांना निवडणूक आयोगाने देशातील पहिला मतदार म्हणून घोषित केलं. जेव्हा त्यांना प्रमाणपत्र मिळालं तेव्हा ही बातमी अनेक माध्यमांनी प्रसारित केली. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती २००७ च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये. 

२००७ च्या निवडणुकीत जेव्हा नेगी यांनी ९० व्या वर्षी मतदानासाठी रांगेत उभं राहून मतदान केलं, तेव्हा संपूर्ण भारतातील लोकांना त्यांची माहिती कळली. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये पहिलं मत देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागल्यामुळे निवडणूक आयोगाकडून सुद्धा नेगी यांना विशेष सन्मान देण्यात आला. 

२०१० मध्ये देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी नेगी यांच्या गावाला भेट दिली. त्या भेटीत चावला यांनी नेगींना मतदानाच्या प्रचाराचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केलं. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत नेगी हे लोकांना मतदान करण्यासाठी जागृत करत होते. आज त्यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एखाद्या विद्यार्थ्याने पीएचडीचा अभ्यास करावा अगदी त्याचप्रमाणे मेहनत करून मनीषा नंदा यांनी देशाच्या पहिल्या मतदाराचा शोध पूर्ण केला होता. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.