बोर्डिंग स्कुलमध्ये गोवरची साथ आली, त्यातूनच जॉन फ्रॅंकलिन अँडरसनने लस शोधून काढली

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात गोवरचे रुग्ण आढळत आहेत. मुंबईच्या काही भागांमध्ये झपाट्याने गोवरचे रुग्ण आढळत आहेत. सध्या शहरात गोवरचे १०९ रुग्ण असून ६०७ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य आयंत्रणेने केली आहे.

गोवरच्या या साथीत आतापर्यंत ३ बालकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात दरवर्षी गोवरचं लसीकरण होत असतांना सुद्धा हा आजार का पसरतोय याचं उत्तर अजूनही प्रशासनाने दिलं नाही. गोवरच्या या साथीमुळे शहरातील पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय. भीतीचं कारण म्हणजे गोवरच्या लसीचा शोध लागण्यापूर्वी गोवर हा जगातील घातक आजारांपैकी एक आजार होता.

जगभरात दरवर्षी गोवरच्या साथी येत होत्या, त्यामध्ये लाखो बालकं मृत्युमुखी पडत होती. 

अशीच एक साथ अमेरिकेत आली होती. १९५४ मध्ये मॅसॅच्युएट्सची राजधानी बोस्टनमध्ये गोवरची साथ आली. तिथल्या एका बोर्डिंग स्कूल मध्ये असलेल्या मुलांना गोवरची लागण झाली होती. तेव्हा बोस्टनमधील चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बोर्डिंग स्कूल मध्ये जाऊन संक्रमित विद्यार्थ्यांच्या सुजलेल्या गळ्याचे आणि रक्ताचे नमुने घेतले. 

या नमुन्यापासूनच गोवरच्या संशोधनाला सुरुवात झाली. त्या काळातले सगळ्यात प्रसिद्ध बायोमेडिकल संशोधक जॉन फ्रॅंकलिन अँडरसन यांनी डेव्हिड एडमॉन्स्टन या ११ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शरीरातून व्हायरसचे नमुने घेतले. त्याच नमुन्यातील व्हायरसची पैदास सुरु करण्यात आली. 

डेव्हिड एडमॉन्स्टन याच्या शरीरातून व्हायरस घेतल्यामुळे या लशीला एडमॉन्स्टन-बी असं नाव आलं. औषध संशोधनात नोबेल मिळवणाऱ्या जॉन फ्रॅंकलिन अँडरसन यांनी हे संशोधन मनावर घेतलं. 

संशोधन सुरु झाल्यानंतर ४ वर्षाच्या आता १९५८ मध्ये लस तयार झाली. मात्र त्याच व्हायचं बाकी होतं. सुरुवातीला अँडरसन आणि त्यांच्या टीमने अमेरिकेतील काही मुलांच्या लहान-लहान गटावर परीक्षण केलं. त्यानंतर १९५८-६० दरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि आफ्रिकेतील नायजेरियामध्ये हजारो मुलांवर या लशींच्या चाचण्या घेण्यात आल्या. 

या चाचण्यांमध्ये १९६१ मध्ये गोवरची लस १०० टक्के खरी उतरली आणि १९६३ मध्ये लशीला परवानगी देण्यात आली. 

यातूनच १०६० च्या दशकात अमेरिका आणि जगातील इतर देशांमध्ये गोवरचं लसीकरण सुरु करण्यात आलं. १९६६ मध्ये आफ्रिकेत गोवरचं पहिलं लसीकरण करण्यात आलं. जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस एजेन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलेपमेंट आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संघटनांनी मिळून आफ्रिकेतील २० देशांमध्ये गोवरच्या निर्मूलनाची मोहीम हातात घेण्यात आली.

गोवरची लास ही थंड वातावरणात ठेवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. आफ्रिकेमध्ये असलेल्या उष्ण वातावरणामुळे आणि कमी सुविधांमुळे ही समस्या आणखीनच मोठी होती, पण आफ्रिकेत गांबियामध्ये उष्ण वातावरणात सुद्धा हे लस यशस्वी ठरली आणि १९६७ मध्ये गांबिया आफ्रिकेतील लसीकरण झालेला पहिला देश ठरला.

त्यानंतर १९६८ मध्ये या लशीवर आणखी संशोधन करण्यात आलं आणि आणखी एडव्हान्स लस तयार करण्यात आली.

डॉ. मॉरिस हिलमॅन यांनी व्हायरसला आणखी कमजोर करण्यासाठी व्हायरसवर ४० वेळ प्रक्रिया केल्या. यातून तयार झालेल्या लशीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नव्हते. त्यामुळे या नवीन लशीला मान्यता देण्यात आली. एडमॉन्स्टन-अँडरसन स्ट्रोनच्या नावाने विकसित करण्यात आलेली ही लस आजही गोवरवर वापरली जाते.  

डॉ. मॉरिस हिलमॅन यांनी गोवरसोबतच कंठमाला आणि रुबेला या दोन रोगांवर सुद्धा लस शोधून काढली आणि या तिन्ही रोगांवर एकच लस तयार केली. या तिन्ही लशींच्या  एकत्रित स्वरूपाला आज एमएमआर लस म्हटलं जातं.

१९७४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या तिन्ही रोगांवर लसीकरण करण्याचं धोरण आखलं आणि जागतिक स्तरावर लसीकरण हातात घेण्यात आलं. 

आजच्या घडीला ज्या भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळून येतात त्या भागामध्ये ९ महिन्यांच्या बालकांपासून ५ वर्षाच्या बालकांच लसीकरण केलं जातं. तर ज्या भागात गोवरचे रुग्ण नाहीत त्या भागात परिस्थिती बघून १२ किंवा १५ महिन्यांच्या बालकांचं लसीकरण केलं जातं.

गोवरच्या पहिल्या लसीमुळे ८५ टक्के बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. तर १५ टक्के बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी २ डोज द्यावे लागतात. त्यामुळे सर्व बालकांना सामान्यपणे २ डोज दिले जातात.

गेल्या ६० वर्षांपासून गोवरची ही लस लाखो बालकांचं लसीकरण करून त्यांचा जीव वाचवत आहे. एकेकाळी गोवरच्या साथीत लाखोंच्या संख्येने मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांना या लशीने संजीवनी दिलीय.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.