बॉर्डर सिनेमातील खऱ्याखुऱ्या भैरव सिंग यांची सुनिल शेट्टीला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली

दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला गाणी वाजवली जातात त्यात बॉर्डर सिनेमातील गाणी हमखास ठरलेली असतातच. कारण हा सिनेमाचं त्या तोडीचा होता, यात दाखवलेली भारत पाकिस्तान युद्धाची कथा, वापरण्यात आलेल्या वस्तू अगदी खऱ्याखुऱ्या होत्या. दिगदर्शक जे. पी. दत्ता यांनी बनवलेला हा सिनेमा अजूनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो.

बॉर्डर सीएनमातील एक सिन आठवतो का?

जेव्हा बीएसएफचा जवान स्वतःच्या टीम लीडरला शोधण्यासाठी वाळवंटात जातो आणि वाळूकडे बघून हाक मारतो. तेव्हा बराच काळ स्वतःचं शरीर वाळूत गाडून बसलेला सुनील शेट्टी बाहेर येतो. सुनिल शेट्टीने बॉर्डरमध्ये ज्या भैरव सिंग राठोड यांची भूमिका साकारली होती, त्याच खऱ्या खुऱ्या भैरव सिंग राठोड यांचं आज निधन झालं आहे. 

सुनिल शेट्टी यांनी देखील बीएसएफचं ट्विट रिट्वीट करून नाईक भैरव सिंग राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

 

 

परंतु भैरव सिंग राठोड हे तर युद्धातच शहिद झाले होते असं दाखवण्यात आलं होतं मग त्यांचा आज कसं काय निधन झालं ? असा प्रश्न पडला असेल. तर याचं कारण आहे भैरव सिंग राठोड यांचा खराखुरा जीवनप्रवास आणि बॉर्डर सिनेमातील कथा यामध्ये काही बदल करण्यात आले होते. 

भैरव सिंग राठोड यांचा जन्म राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सोलंकीयातला या गावचा. भारत स्वतंत्र होऊन काही वर्ष लोटली असतांना भैरव सिंग यांनी आर्मीत जॉईन होण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर १९६५ मध्ये बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफची स्थापना झाली आणि भैरव सिंग बीएसएफमध्ये जॉईन झाले. 

बीएसएफला ६ वर्ष पूर्ण होत असतांनाच १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली.

हे युद्ध जरी भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवर लढलं जात असलं तरी पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर देखील आक्रमण केलं होतं. त्यातच राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील लोंगेवाला पोस्टवर बीएसएफच्या १२० जवानांची कंपनी तैनात होती. त्यांच्यावर २ हजार पाकिस्तानी सैनिकांनी टँक्स घेऊन आक्रमण केलं होतं. भारतीय सैनिकांकडे फक्त बंदुका होत्या, पण तरी देखील भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा डाव उधळून लावला होता.

बॉर्डर सिनेमात दाखवण्यात आलंय की, जेव्हा भैरव सिंग यांना कळतं की पाकिस्तानी टँक्सला उडवल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा ते स्वतःच्या हातात अँटी टँक्स माईन घेतात आणि समोर चालायला लागतात. त्यांना बघून पाकिस्ताने सैनिक भैरव सिंगांवर गोळ्या चालवतात. त्या गोळ्यांनी घायाळ झाल्यानंतर देखील भैरव सिंग माईन घेऊन पाकिस्तानी टॅंकला उडवतात आणि त्यातच शहिद होतात.

मात्र जरी खऱ्या युद्धात भैरव सिंग पाकिस्तानी टँक्सला उडवण्यात महत्वाची भूमिका बजावली असली तरी ते शाहिद झाले नव्हते.

५ डिसेंबर १७७१ च्या रात्री लोंगेवाला पोस्टवर २३ पंजाब रेजिमेंटचे १२० सैनिकांची एक कंपनी तैनात होती. त्यांच्यासोबत बीएसएफच्या १४ बटालियनची डी कंपनी लढत होती, ज्यात लान्स नाईक भैरव सिंग राठोड तैनात होते. तर पाकिस्तानच्या तुकडीमध्ये २ हजार सैनिक होते. जेव्हा पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात बीएसएफच्या तुकडीतील एक सैनिक शहीद झाला तेव्हा भैरव सिंग यांनी स्वतःची मशीन गन उचलली आणि पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडले.

भैरव सिंग यांनी तब्बल ७ तास फायरिंग केली आणि त्यात पाकिस्तानच्या २५ सैनिकांना ठार केलं. त्यांच्या या पराक्रमामुळे तुकडीमधील इतर सैनिकांना देखील हुरूप आला आणि त्यांनी देखील मोर्चा सांभाळला. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन १९७२ मध्ये सेना पदकाने सन्मानित करण्यात आलं.

या युद्धात भैरव सिंग यांचं निधन झालं नव्हतं मात्र बॉर्डर सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आला आणि त्यात भैरव सिंग शहिद झाल्याचं दाखवण्यात आलं. 

सिनेमात भैरव सिंग यांना शहिद होत असल्याचं दाखवण्यात आल्यामुळे आणखी एक बदल करण्यात आला होता. तो म्हणजे भैरव सिंग यांचं या युद्धापूर्वीच लग्न झालं असल्याचं दाखवण्यात आलं, पण खऱ्या आयुष्यात भैरव सिंग यांनी युद्धानंतर लग्न केलं होतं.

परंतु जरी या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये थोडेफार बदल करण्यात आले असले तरी सिनेमात  अगदी खरंखुरं युद्ध दाखवण्यात आलं होतं.

सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल केले असल्यामुळे यावर आक्षेप घेतले जातील अशी शंका दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांना वाटत होती. तेव्हा दत्ता यांनी देशाचे तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांची भेट घेतली आणि त्यांना सगळी स्क्रिप्ट वाचून दाखवली. ही स्क्रिप्ट बघून नरसिम्हा राव इतके भारावले की त्यांनी या सिनेमाला पाठिंबा तर दिलाच सोबतच आर्मीकडून ज्या वस्तू हव्या आहेत त्या उपलब्ध करून देण्याची परवानगी देखील मिळवून दिली. 

लोंगेवाला युद्धाच्या तब्बल २६ वर्षानंतर १९९७ मध्ये बॉर्डर सिनेमा तयार झाला आणि भारतीय सैनिकांच्या वीरतेच्या गाथांमध्ये एक मैलाचा दगड बनला. या सिनेमाने निव्वळ पडद्यावरच स्वतःची छाप उमटवली नाही तर लोकांच्या मनात देखील हा सिनेमा आजही अगदी तस्साच जिवंत आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या कार्यक्रमात या सिनेमाचे गाणे आणि टीव्हीवर हा सिनेमा असं समीकरण ठरलेलंच असतं. 

खऱ्या आयुष्यातील भैरव सिंग राठोड यांनी देखील १९७१ च्या युद्धानंतर आणखी १६ वर्ष बीएसएफमध्ये सेवा दिली. 

या १६ वर्षांच्या काळात त्यांनी भारताच्या सीमेवर नेहमीप्रमाणे खडा पहारा दिला. त्यानंतर १९८७ मध्ये वयाच्या ४६ व्या वर्षी ते नाईक पदावरून बीएसएफमधून रिटायर्ड झाले. रिटायर्डमेंटनंतर स्वतःच्या गावासोबत पंचक्रोशीतील तरुणांना आर्मीमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. 

जोपर्यंत त्यांच्यात चालण्या-बोलण्याची शक्ती होती तोपर्यंत त्यांनी तरुणांचा आर्मीसाठी सराव करून घेतला. आर्मीत कसं जायचं आणि सीमेवर काम कसं करायचं याचे धडे ते तरुणांना देत होते. गेल्या वर्षी लोंगेवाला युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तर यंदा १६ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संपर्क साधून भैरव सिंग यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.  

परंतु काल त्यांची प्रकृती चिंताजनक झाली त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. एम्समध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी एकदा सुनिल शेट्टी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मुलाने यासाठी प्रयत्न देखील केले होते परंतु सुनिल शेट्टी यांची भेट घेण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. नाईक भैरव सिंग राठोड यांना बोल भिडू तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.