फेसबुकवर उत्तमोत्तम लिहिण्यासाठी मला जर कोणी प्रेरणा दिली असेल तर ती फेसबुकनीच!

सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांचे वेगवेगळे गट करायचे म्हंटले, तर स्वतःला व्यक्त करणारे, लिहिणारे, कॉपी पेस्ट करणारे, फक्त लाईक करणारे, फक्त वाचणारे,  वाद घालणारे, माहिती देणारे, राजकीय कारणांसाठी कार्यरत असणारे, व्यवसाय करणारे, नुसतेच डीपी बदलणारे असे अनेक गट होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया, त्यातल्या त्यात फेसबुक हे व्यक्त होण्यासाठीचं सर्वात लोकप्रिय माध्यम बनलं आहे याबद्दल दुमत नसावं.

अनेक जणांसाठी, विशेषतः स्त्रियांसाठी तर फेसबुक ही एक पर्वणी ठरली आहे. स्वतःला कविता, लेख यांच्या मार्गे व्यक्त करणे ते वेगवेगळ्या साड्या नेसून साड्यांच्या ग्रुप्समध्ये फोटो टाकणे, रेसिपीज पोस्ट करणे, आपली कलाकुसर दाखवणे, व्यवसाय सुरू करणे, तो वृद्धिंगत करणे, किचन टिप्स देणे, एक ना अनेकविध मार्गांनी अनेक लोकांपर्यंत पोचण्याचा फेसबुक हा एक राजमार्ग झालेला आहे. अर्थात, याचे फायदे, तोटे दोन्ही आहेत.

फेसबुकवर मी लिहायला सुरुवात केली ती छोट्या छोट्या समूहांमधून. लोकांना लिहिलेलं आवडायला लागलं, लाईक्स, कॉमेंट्स यायला लागल्या. मग हळूहळू भीड चेपली आणि स्वतःच्या वॉलवर लिहू लागले. वर्षभरात इतकं लिहिलं की त्याचं बांधीव स्वरूपात एक पुस्तक (बहावा) तयार झालं. त्या पुस्तकाच्याही जवळजवळ एक वर्ष व्हायच्या आत १००० प्रति विकल्या गेल्या. ही माझ्यासाठी  अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. फेसबुकवर मराठीतून लिहिणाऱ्यांची, व्यक्त होणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे, ही विशेष बाब देखील इथे नमूद करायला हवी.

एक गोष्ट आवर्जून सांगेन. सोशल मीडियावर लेखिका म्हणून प्रसिद्ध पावण्याचं सगळं श्रेय मी या सोशल मीडियालाच देईन. फेसबुकवर उत्तमोत्तम लिहिण्यासाठी मला जर कोणी प्रेरणा दिली असेल तर ती फेसबुकनीच!

या प्लॅटफॉर्मवर मी अनेक गोष्टी शिकले. सर्वात आधी इतरांनी लिहिलेलं खूप वाचलं, त्यातलं चांगलं ते अंगिकारलं, वाईट सोडून दिलं. मित्रयादीत असलेल्या, नसलेल्या लोकांनी कॉमेंट्समधून सांगितलेल्या सर्व गोष्टी, उपदेश, सूचनांचा अभ्यास केला आणि त्यातूनच आपल्या लिखाणात सुधारणा केल्या. फेसबुकवर लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा (याचंच नंतर पुढे ऍडिक्शन होऊ शकतं) म्हणजे तिथे मिळणारा तातडीचा प्रतिसाद. या प्रतिसादामुळे अनेकदा अजून चांगलं लिहायला प्रेरणा मिळते. लोकांशी थेट संवाद साधता येत असल्यामुळे लिखाणात बदल करता येतात, ते इतर हजारो लोकांपर्यंत पोचवता येतं.

पण हे सर्व करण्याआधी जर सोशल मीडियावरील तुमच्या लिखाणाची दखल घेतली जावी असं वाटत असेल तर माझ्या मते तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे सहजता, सातत्य आणि सर्जनशिलता.

तुमचं लेखन सहज स्फुरलेलं हवं, ओढूनताणून आव आणलेलं लेखन कोणाच्याही लक्षात येतं आणि त्यात फारसा जीवही नसतो आणि दमही नसतो. अगदी रोजच्या विषयांवर जरी लिहायचं असेल तरी त्यात सहजता हवी, तरच ते थेट वाचकांच्या मनाला जाऊन भिडतं.

फेसबुकवर मी One Post wonder लोकं पाहिली आहेत. एखाददुसरं चांगलं लेखन करतात आणि मग दर्जा घसरतो किंवा नंतर त्या तोडीचं लिहीत नाहीत,लिहू शकत नाहीत. इथे लिहितं राहायचं असेल, लेखक (इथे त्याला चेष्टेत ‘सेलिब्रिटी’ असं संबोधलं जातं!)  म्हणून थोडंफार नाव कमवायचं असेल तर लिखाणात सातत्य हवे. अगदी दररोज नाही, पण सतत चांगलं लेखन होत राहिलं तर ती वॉल जागी राहते, तिथे वाचकांचा राबता  राहतो.

तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, एक लेखक म्हणून तुम्ही सर्जनशील असायला हवं. आपल्या लेखनात वेगवेगळे प्रयोग करून पहायला हवेत, फक्त पब्लिकच्या टाळ्यांसाठी न लिहिता, एखाद्या लेखनप्रयोगात सर्जनशिलतेने वेगळे प्रयोग करायचं धाडस तुमच्याकडे हवं. ज्याच्याकडे मौलिकता आणि सर्जनशिलता असेल, तोच या सोशल मीडियाच्या महासागरात तरेल हे खरं!

फेसबुक हे खरं तर आभासी जग आहे, इथल्या लाईक्स, कमेंट्स, अगदी मित्रयादीही आभासी असते आणि हे जग पाण्यावरच्या बुडबुड्यांसारखं असतं, क्षणार्धात नाहीसं होऊ शकतं, हे सत्य असलं तरी या आभासी जगाने अनेक लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, अनेक लोकांना एकमेकांशी जोडलं, त्यांच्यातल्या सर्जनशिलतेला नवीन आयाम दिले यात काहीच शंका नाही.

अश्याच काही लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी, त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठीचे व्यासपीठ, मुंबईत होणाऱ्या पहिल्या सोशल मीडिया संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे. सर्वांनी जरूर यात सहभागी व्हावे.

  • गौरी ब्रम्हे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.