याचं पोरांमुळ सरकारला टिकटॉकच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली.

आज समस्त देशवासीयांसाठी जीव भांड्यात पडणारी घटना घडली. ती म्हणजे टिक टॉक उर्फ एकेकाळच म्युजीकली यावर सरकार बंदी घातली आणि यावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्ट पण नाही म्हणतय. सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं गुगल आणि अॅपल ला सांगितलं तुमच्या स्टोरवरन शून्य मिनिटात हे दोन्ही एॅप उडवायचे.

गेली काही महिने ती पब्जी खेळणारी लेकर आणि ही टिक टॉकवाली जनता यांनी देशाला येड लावायचं बाकी ठेवल होत. यातल टिक टॉकचा तरी बंदोबस्त झाला. आता दोन दिवसात सगळ्यांच्या मोबाईल वरून हे अॅप गायब होईल असा अंदाज आहे.

एक काळ होता आम्ही पण टिक टॉकला बाहेरून पाठींबा दिला होता. म्हणजे काय आम्ही डाऊनलोड केलं नव्हत. (या जन्मात येऊन सगळी पाप केली पण चित्रगुप्ताच्या हिशोबात सांगेन हे पाप केलं नाही) पण आम्हाला वाटायचं कोण वापरतय तर वापरू दे. याच एक उद्दात्त कारण देखीउल होतं.

“आम्हाला वाटायचं टिक टॉकनं अभिनय क्षेत्रात लोकशाहीवाली क्रांती आणली. आम्ही तर याला वंचित आघाडी समजायचो.”

पूर्वी काय व्हायचं तुम्ही जर गोरे देखणे असला, फिगर , बॉडी वगैरे भारी असली, लई पैशे असले, वशिला असला, घराणेशाही असली, गेला बाजार एक्टिंग चांगली असली तरच तुम्हाला टीव्ही, सिरीयल, नाटक या क्षेत्रात चान्स मिळायचा. पण टिक टॉक नावाच्या अॅपने सगळ मोडीस काढलं. आता तुम्हाला वरील पैकी काहीही नसलं तरी चालत होत.

फक्त पाहिजे एक स्वतःचा नसेल तर फ्रेंडचा अँड्रॉइड मोबाईल त्यावर अंबानीच्या जिओचा पॅक. त्या मोबाईलवर टिकटॉक अॅप काढायचं आणि सुरु व्हायचं. तिथ तुमच्या कन्टेट ला काहीही बंधन नाही. तुम्ही बच्चन अमिताभच्या आवाजापासून डॉक्टर गुलाटीच्या आवाजातले डायलॉग, कुमार सानूची गाणी,  अजय देवगनचं दुखः सगळ बाहेर काढू शकता.

मग सुरु झाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हैदोस. 

रोज लाखो व्हिडीओ बनू लागले आणि टिक टॉकबाहेर देखील instagram, whatsapp, youtube, facebook वर दिसू लागले. काहीच बंधन नसल्यामुळे अक्षरशः काहीही दिसू लागलं. सातवी आठवीच्या मुलामुली पासून साठीतले म्हातारे म्हातारी या नव्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ लागले. काही जण आपली चांगली क्रिएटीव्हीटी पण दाखवत होते ते तर आहेच पण लई जण, लई म्हणजे लई जण वीट आणत होते. फेसबुक इंस्टा काहीही उघडलं की ही जनता हायच.

फक्त भारतातच नाही तर जगभर या टिकटॉकचा गोंधळ सुरु होता. फक्त भारत पाकिस्तान बांगलादेश या सख्या चुलत भावंडामध्ये याचा जोर लई दिसत होता. (वाईट गोष्टीच्या बाबतीत एकमेकाच लगेच शिकत्यात) यांचं एक वेगळच जग निर्माण झालं होत. यांची दुनियादारीच वेगळी होती. सोशल मिडिया इंफ्ल्यूएन्सर म्हणून यांची चर्चा होऊ लागली.

अखेर मद्रास कोर्टात कोणी तरी विषय नेला, कोर्टाच्या जजला देखील टिकटॉकन पीडल असणार. त्यांनी आदेश दिला आणि मोदी सरकारने अच्छे दिन सेग्मेंट खाली याअॅपवर बंदी आणली.

आता याची टेक्निकल कारण बरीच आहेत. बोल भिडूनं खास रिसर्च करून असे काही टिकटॉक युजर शोधून काढलेत ज्याच्या व्हिडीओमूळ  सरकारला लक्षात आलं आता टिकटॉकवर बंदीला उशीर करून चालणार नाही.

१. चित्रविचित्र हेअरस्टाईल, मेक अप करणारी पोरं.

यात आम्ही मुद्दाम पोरींचा उल्लेख केला नाही. हा विषय फक्त पोरांचा आहे आणि तो गंभीर आहे. अंग काठीएवढ , तोंड एवढ चिमणी एवढ आणि डोक्यावर चिमणीच्या घरट्यासकट आख्ख झाड असली यांची हेअरस्टाईल आसते. अंगात भडक पेक्षा डार्क कलरचा शर्ट असतो. शेजारी एखादी स्कुटी लावलेली असते. डोळ्यावर तशाच भडक कलरचा गॉगल असतो आणि चेहऱ्याला मेकअप.

आणि हे ध्यान कमी म्हणावं तर ही येडी लोक त्यावर अजून फिल्टर लावत्यात.  यांना रोखावं तरी कसं हा यक्षप्रश्न देवाला सुद्धा पडला असेल.

२.पेटीएम वाल्या पोरी.

अज्ञानी लोकांसाठी सांगतो, या पेटीएम कंपनीच्या पोरी नाहीत. या पोरी आहेत एस्कोर्ट गर्ल्स. म्हणजे काय की ५० रुपये, शंभर रुपये पेटीएमवर पाठवा आणि खास व्हिडीओचा लाभ घ्या. जास्त पैसे दिले तर इतर सोयीचा देखील लाभ होईल. आता आपल्याकड उपाशी मंडळ काय कमी हाय? बापजाद्यांनी डान्स बारीवर पैशे उधळले आमच्या नंतरच्या पिढ्या या पेटीएम गर्ल वर वॉलेट रिकाम करू लागल्या. आता तिथ खरोखर त्यांना व्हिडीओ दिसले काय माहित नाही पण त्यानंतर दर्द वाले व्हिडीओचं प्रमाण वाढलेलं आढळलं. यांच्याच मूळ कायद्याला आपला बडगा दाखवायला लागला.

आता आम्ही जनहितार्थ अवेअरनेस म्हणून यांची माहिती सांगितली. लगेच गुगल वर सर्च करायला जाऊ नका. तुम्ही पण गण्डशीला !

३. जोक करणारे व्हिडीओ.

एक काळ होता pj म्हणून हे जोक आमच्या ३३१५ मोबाईलवर एसएमएस वर यायचे. आम्ही तेव्हा पहिल्यांदा हसलो. मग हेच जोक परत परत फिरून आमच्या मोबाईलवर येऊ लागले. कधी एखादे काका whatsappवर पाठवायचे तर कधी कपिल शर्मा आणि त्याची टीम मुलींच्या वेशात सांगायला लागले. तेव्हाच हसू यायचं बंद झालं होतं.

त्यात हे टिकटॉकवाली जनता परत परत तेच जोक सांगत्यात आणि स्वतःचं ह्सत्यात. (कपिल शर्मा कडे कमीत कमी सिद्धू तरी असतोय.) हे जोक वाले व्हिडीओ बघून हसू नाही तर आता रडू येतंय. कधी कधी नवीन जोक पण येत्यात पण तेव्हड्या साठी हे रोज रोज बघायला लागण परवडणार नाही.

४. Boys who cry passionately on musically.

cry tik tok

अंह. हे एक फेसबुक पेज आहे. टिक टॉकचं विशेष कलेक्शन आहे तिथं. स्वतः जा आणि बघा इथल्या करामती. इथं काही लेकर रडत असत्यात. नुसत रडत नाहीत तर नाईनटीजची गाणी लावून रडत्यात. बर तुम्हाला वाटेल तर चार अश्रू टपकत असतील तर तसं नाही. त्यांच्या डोळ्यातून केसातून शरीरातून मिळेल त्या जागेतून अश्रू बाहेर येत असत. त्यातपण वेगवेगळी डान्स वगैरे कला ते सादर करत असतात. कसलं दुख्खः झालेलं असतंय कुणास ठाऊक.

गाण्यावरून वाटतय की यांचा प्रेमात धोका झालाय म्हणून ते रडालेत. यांच्या वयाचं असताना आम्ही गृहपाठ वही विसरली म्हणून मास्तरच्या छड्या खाऊन रडायचो. (मास्तर तुमची आणि त्या छडीची लई आठवण येत्या. तुम्ही पाहिजे होता.)

५. लहान बाळाचे, कुत्र्या मांजराचे टिकटोक व्हिडीओ बनवणारे.

https://www.youtube.com/watch?v=sCnMR-4Przk

आता वरची लिस्ट दिली हे सगळे मुके प्राणी. त्यांना अजून मोबाईल वापरता येत नाही. त्यांना त्यात इंटरेस्ट पण नसतो. आपले आईबाबा करायला लावतील तसं करायचं आणि काही तरी खायला मिळवायचं एवढच त्यांना माहित. यांच्या क्युटनेसचा वापर करून ही जनता आपले फन वाढवते. आजकालचे  नरमादी या ओव्हरलोडेड क्युटनेस चा वापर करून शिकार करत आहेत हा आमचा वैयक्तिक अभ्यास आहे.

यांना वेळीच रोखलं पाहिजे नाही तर काही वर्षांनी हे मुके प्राणी बोलायला लागले असते आणि आपल्या पिढीला वेळीच कारवाई केली नाही म्हणून शिव्या दिल्या असत्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.