राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ८ वेळा विजेता असलेल्या प्लेअरची हत्या करण्यात आली होती..

“सय्यद मोदी” नाव कधी ऐकलं आहे का ? भारतातली सर्वात बॅडमिंटनच्या जगातली सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा ‘सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट’.

पी.व्ही.सिंधू, सौरभ वर्मा,के.श्रीकांत, पी. कश्यप या सर्व खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात या टूर्नामेंट मधे खेळण्यापासून केली होती.

आता आपल्याला हे सगळे खेळाडू माहिती आहेत. यांच नाव पेपर वाचताना नाहीतर बातम्या बघताना तर कानावर पडलेलच असतंय. पण ज्यांच्या नावाखाली ही स्पर्धा भरवली जाते ते ‘सय्यद मोदी’ कोण आहेत. त्यांचा बॅडमिंटनशी काही संबंध आहे का? असेल तर मग आपल्याला कसकाय माहिती नाही. तर आता पुढ याच नावाची हिष्ट्री माहित करून घेऊ.

सय्यद मोदी हा प्रकाश पदुकोन आणि पुलेला गोपीचंद यांच्याही अगोदर बॅडमिंटनमधे नाव करत असलेला खेळाडू होता. ८० च्या दशकात भारताचा अव्वल बॅडमिंटन प्लेयर असलेल्या सय्यद यांच पूर्ण नाव ‘सय्यद मेहंदी हसन जैदी’ हे होत. आपल्या ८ भावा-बहिणीत सगळ्यात छोट्या असलेल्या सय्यद मोदी यांना लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळाची आवड होती.

१९७६ मधे वयाच्या १४ व्या वर्षीच ते ज्युनिअर नॅशनल बॅडमिंटनचे चॅम्पिअन ठरले होते. ही तर त्यांच्या top-क्लास खेळाची एक झलक होती. पुढ १९८० मधे त्यांनी नॅशनल चॅम्पिअनशीप जिंकली आणि तिथून पुढची सलग आठ वर्षे ही स्पर्धा तेच जिंकत राहिले. पुढे त्यांना स्पोर्ट कोट्यातून रेल्वेत नौकरी मिळाली होती.

त्यांची गाडी व्यवस्थित रुळावरून जात होती. त्यांनी लखनौ इथ खेळाचा कसून सराव केला. १९८२ ला कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल आणि त्याच वर्षी झालेल्या एशियन गेम्समधे ब्राँझ मेडल जिंकलं होत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. यात Austrian International [ १९८३-१९८४ ]आणि USSR international(१९८५) ह्या युरोपियन बॅडमिंटन स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या.

याचदरम्यान त्यांनी आपली ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडू ‘अमिता कुलकर्णी’ सोबत लग्न केल. पण काही काळाने अमिताचं अफेअर एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर म्हणजे संजय सिंह याच्याबरोबर सुरु होतं. अमिता या प्रेग्नन्ट होत्या पण मोदी खुश नव्हते कारण त्यांना संशय होता कि त्यांचं होणार बाळ हे आपलं नसून दुसऱ्या व्यक्तीपासून होणारं आहे.

असंही म्हटलं जातं कि सय्यद मोदींच्या पत्नी  लिहायच्या आणि त्यात त्या सय्यद यांना जळवण्यासाठी प्रियकराचं वर्णन त्यात लिहायच्या. लव अफेअरच्या गोष्टी त्या डायरीत लिहिल्या जायच्या. ज्यावेळी मोदी हि डायरी वाचायचे तेव्हा त्यांना त्याचा खूप त्रास व्हायचा. हे प्रकरण पुढे वाढत गेलं. 

खेळात मात्र सय्यद मोदी टॉपला होते, भले भले खेळाडू त्यांच्यासमोर नांग्या टाकत असे. २८ जुलै १९८८ हा दिवस सय्यद मोदी यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस होता. ते स्कुटरवरून जात असताना भर रस्त्यात दोन बाइकस्वारांनी त्यांनी गाडी अडवली आणि त्यांच्या छातीत ५ गोळ्या झाडल्या. मोदी जागीच गतप्राण झाले.

अस म्हणतात कि अमिता आणि त्यांचे प्रियकर संजय सिंह यांनी हि हत्या घडवून आणली होती. सीबीआय च म्हणन होत कि, संजय सिंह आणि अमिता यांनी सय्यद यांच्या हत्येसाठी अखिलेश सिंहची मदत घेतली होती. संजय सिंह, अखिलेश सिंह हे दोघेही एकाच राजकीय कुटुंबातील व्यक्ती होते. संजय सिंह याच्याकडून हा खटला दिग्गज वकील राम जेठमलानी यांनी लढला होता. ठोस पुराव्यांअभावी १९९० मधे अमिता आणि संजय दोघांचीही निर्दोष सुटका झाली.

सय्यद यांच्या हत्येनंतर २ च महिन्यांनी त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. या हत्येत एकूण सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यापैकी चार जणांची पूर्वीच सुटका झाली होती. या हत्येतला शेवटचा आरोपी भगवती सिंहला लखनौ कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. पण अजूनही मुख्य आरोपी हे मोकाटच फिरत आहेत.

पुढे चालून सात वर्षांनी १९९५ ला अमिता आणि संजय सिंह यांनी एकमेकांशी लग्न केल. लव्ह, गेम आणि खून असा हा एकूण मॅटर झाला होता.  

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.