सहजासहजी ऐकून घेणारी माणसं आपण नाही.

पंतप्रधान सांगताहेत. मुख्यमंत्री सांगताहेत. अगदी जग ओरडून सांगतय गर्दी करू नका. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पण आपण ऐकणार नाही. सहजासहजी ऐकून घेणारी माणसं आपण नाही.

एवढ्या कोरोनाच्या राड्यात आपले लोक तोंडावर मास्क लावून का होईना लग्न उरकून घेताहेत. कुणी सत्संगाला जातोय. कुणी फिरायला जातोय. कुणी लोकलमध्ये जातोय. कुणी ट्रेनमध्ये जातोय.

आता यातले अत्यावश्यक कामाला निघालेले नेमके किती असतील? आणि असे लाखो लोक अर्जंट कामावाले आहेत तर देश अजून महासत्ता का झाला नाही? एकूण एवढ्या विनंत्या करूनही गर्दी करण्याची आपली मानसिकता काही जात नाही.

मुळात घरात बसून काय करायचं हा सुद्धा प्रश्न खूप लोकांना पडलाय. आणि सोशल मिडीयावर घरात बसून काय करायला पाहिजे हे मेसेज पण फिरताहेत हे बघून हसावं का रडावं अशी वेळ आलीय.

पण ही न ऐकण्याची सवय आजची नाही.

आपल्याकडे प्लेगची साथ आली होती. मुंबईत हजारो लोकांचा जीव जात होता. पण लोकांनी लस टोचून घ्यायला नकार दिला. कारण ती सवयच नव्हती. देवीच्या रोगात पण तेच. लोक देवीची पूजा करायचे. अंगात देवी आली म्हणायचे. प्लेगची लस टोचून घ्यायला नकार का दिला आपल्या लोकांनी?

तर काही लोक म्हणाले आम्ही शाकाहारी आहोत. बाहेरचे जंतू शरीरात टोचून घेणार नाही. काही लोक म्हणाले हा इंग्रजांचा कट आहे. पुण्यात पण हीच परिस्थिती.

आणि या बाबतीत हिंदू मुस्लीम एकी असते.

म्हणजे फक्त हिंदूच लस टोचून घ्यायला विरोध करायचे असं नाही. मुस्लीम पण तेवढेच कट्टर होते त्याबाबतीत. कळस म्हणजे दुसर्या जातीच्या लोकांसोबत भरती करतात म्हणून खूप लोकांनी दवाखान्यात पण जायला नकार दिला होता. खांदा देवून आलेल्या माणसालाच पुन्हा खांदा द्यायची वेळ यायची. अशी परिस्थिती असतानाही लोक ऐकायला तयार नव्हते.

प्लेग आणि देवीची गोष्ट सोडा. पोलिओच्या बाबतीत पण हेच अनुभव आले. पोलिओचा डोस घ्यायला लोक तयार नसायचे. त्यामुळे पुरुषत्व जातं असा कुणीतरी जावईशोध लावला. पोलिओचा डोस घ्यायला हात जोडायची वेळ यायची.

हाच प्रकार नसबंदीच्या बाबतीत.

कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला लोक तयारच नसायचे. पुरुषांना वाटायचं एकदा ऑपरेशन केलं की बायकोला काय तोंड दाखवणार? म्हणजे ठरवूनच टाकलेलं मनाने. ऑपरेशन झालं की खेळ खलास. देवा एवढी आपली विज्ञानावर श्रद्धा बसत नाही. बसली नाही.

नाहीतर राजकीय नेते आमच्या धर्माच्या लोकांना कोरोन होणार नाही असं बालिश विधान करू शकले नसते.

कुटुंब नियोजनाचं काम करणाऱ्या शकुंतला परांजपे यांनी त्याकाळातल्या लोकांचे अनुभव लिहून ठेवलेत. पुण्यात घरी त्यांनी कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र काढलं. पण त्यांच्या घराकडे बायका फार यायच्या नाहीत. कुणी पाहिलं तर काय अशी भीती वाटायची.

बरं आलेल्या लोकांना स्वतःची समस्या सोडून बाकी चौकशाच खूप. एकूण कौटुंबिक आणि लैंगिक जीवन याबाबतीत आपलं एकमत आहे. दुसऱ्याच्या गोष्टीत आपल्याला खूप इंटरेस्ट असतो याबाबतीत.

एकदा शकुंतलाबाईना एका बाईने त्यांना प्रश्न विचारला,

‘तुम्ही कुटुंब नियोजनाची साधनं फक्त लग्न झालेल्या बायकांनाच देता ना?’

यावर शकुंतला बाई म्हणाल्या,

‘मी चौकशी करत नाही. वयात आलेल्या बायकांना देते.’

मग त्या बाईने पुढचा प्रश्न विचारला,

‘अविवाहित आणि विधवांनासुद्धा?’

तर शकुंतला बाई पण खमक्या. त्या म्हणाल्या,

‘त्यांना तर जास्त गरज असते. लग्न झालेल्या बाईला कुणापासूनही मुल झालं तरी नवऱ्याच्या नावावर खपवता येतं.’

पुढे त्या बाईने चौकशी बंद केली.

एकदा तर एक मुस्लीम जोडपं होतं. ऑपरेशन करण्यासाठी त्यांची समजूत घातली. नवरा ऑपरेशन करायला तयार झाला. ऑपरेशन टेबलवर त्याला आणलं आणि एक बाई धावत आली. माझ्या नवऱ्याच ऑपरेशन करायचं नाही म्हणाली. शकुंतला बाईना प्रश्न पडला. फॉर्मवर तर बायकोची सही आणी परवानगी होती. मग हा काय गोंधळ आहे. चौकशी केल्यावर लक्षात आलं की त्या गृहस्थाला दोन बायका होत्या. पहिलीने परवानगी दिली होती. पण दुसरीचा ऑपरेशनला विरोध होता.

साथीचे रोग असोत किंवा कुटुंब नियोजन. आपण सहज ऐकणारी माणसं नाही.

डायबिटीस, कॅन्सर सारख्या रोगावर पण आपण फालतू उपाय सुचवत असतो. सोशल मिडीयावर वाचत असतो. कधी कधी वाटतं की शाळेत असताना डबा घेऊन पांदीला परसाकडला बसल्यावर पोरं जे ज्ञान वाटायचे ते मोठ झाल्यावरही लोक खरं समजून चालतात.

त्यावेळी चिंचेला वाकडं दाखवलं की पोट साफ होतं म्हणायचे. मग चिंचेच्या झाडाकडे बघून पोरं जीभ बाहेर काढायची. पोट आवळायची. पण ते वय वेगळं. मोठेपणी असे खेळ चालत नाहीत. मात्र काही लोकांना मोठेपणाची जाणीवच होत नाही. whatsapp वरच त्यांचं शिक्षण चालू राहतं. मग ते गोमुत्र पार्टीला जाऊ लागतात.

अशा लोकांना तोंड देत विज्ञानवादी चळवळी आपल्याकडे चालू होत्या. आजही आहेत. ग्रहणात काय करायचं नाही याची भली मोठी यादी असते. ती भले भले लोक पाळत असतात. पण साथीच्या रोगात जे करायचं नाही सांगितलय ते मात्र लवकर पटत नाही. वारंवार सांगावं लागतं.

एका गावात शकुंतला बाई कुटुंब नियोजनाचं महत्व सांगत होत्या. तेवढ्यात एका बाईने विचारलं, मुलं तर देवच देतो. यावर शकुंतला बाई काही बोलणार एवढ्यात गावातलीच दुसरी बाई तिला कोपरखळी मारून बोलली, ‘देवच येतो जणू रातचा तुझ्यासंग गोष्टी कराया.’ विषय संपला.

लोकांच्या शंका एवढ्या थेट आणि परखडपणे बोलून मिटायच्या. नाहीतर हात धुवून कुठे काय फरक पडतो असा प्रश्न विचारणारे आजही आहेत. आपल्या देशातल्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती खूप आहे हा एक फाजील आत्मविश्वास असणारे काही कमी नाहीत. मुळात या अति आत्मविश्वासाचं काय करायचं हा पण मोठा प्रश्न आहे.

उन्हात व्हायरस टिकणार नाही हे लोक छातीठोकपणे सांगत होते. आपल्याला हा स्वभाव सोडून द्यावा लागेल. ऐकून घेण्याच्या बाबतीत नाही म्हणजे नाही ही भूमिका सोडावी लागेल. ऐकावंही लागेल. आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या नाही म्हणजे नाही हे ठरवावंही लागेल.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.