कोरोनामुळे पुणे-मुंबई सोडून जायची गरज आहे का ?

सध्या पुण्या-मुंबईच्या रस्त्यांवर खूप कमी गर्दी आहे. लोक घरातून बाहेर पडत नाहीत. पुण्यात सर्वांधिक गर्दी असेल ती जॉब करणारे तरुण-तरुणी, शिक्षणासाठी आलेले मुले-मुली.

या सर्वांना घरातून फोन येत आहेत. कारण एकच घरी ये बाळा… 

पुण्या-मुंबईत रोग आला आहे म्हणून घरी ये अशी आर्त हाक मारण्यात येत आहे. खरच पुणे-मुंबई सोडून गावाला जाण्याची गरज आहे का. नक्की बातम्यात सांगितलं जात आहे तितकं वातावरण आहे का. घरातल्यांपर्यन्त नक्की कोणत्या बातम्या पोहचत आहेत या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी हा लेख वाचायला हवा.

पहिली गोष्ट बातम्यांमध्ये कोणत्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. 

आत्ता दोनच दिवसांपुर्वीची घटना सांगतो. झालं अस की साताऱ्यामध्ये एक कोरोना संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती wtsapp ग्रुपवरुन आली. त्यानंतर आमच्या काही पत्रकार मंडळींनी ही बातमी म्हणून प्रसारित केली. इकडे आमच्या फॅमेली ग्रुपवर साताऱ्यात कोरोना आला म्हणून दंगा सुरू झाला. गावकरी घाबरले.

दुसऱ्या दिवशी बातमी आली की तो संशयित रुग्ण निगेटिव्ह होता. पण या एक दिवसाच्या घडामोडीत साताऱ्यात रुग्ण आढल्याची बातमी व्हायरल झाली.  संशयित असणं आणि पॉझिटिव्ह असणं यात फरक आहे. मात्र सनसनी दाखवण्याच्या हेतूने आहे TRP च्या स्पर्धेमुळे संशयित देखील सध्या पॉझिटिव्ह असल्याप्रमाणे दाखवला जात आहे.

या गोष्टीने काय फरक पडतो.

सर्वात महत्वाचा फरक पडतो तो घरी. आई-वडिल, नातेवाईक यांना संशयित असणं, रुग्ण पॉझिटिव्ह असणं यातील फरक समजत नाही. सातारा आणि कोरोना रुग्ण इतकच ते ऐकतात आणि काळजी करण्यास सुरवात करतात. यामुळे बऱ्याच वृद्ध माणसांचा बीपी वाढतोय. कोरोनाचे मिम्स फक्त तरुणांपुरतेच मर्यादित आहेत, वास्तविक घरातले भिलेत हेच खरं.

पुण्या-मुंबईत नक्की काय चाललय. 

हे बघा पुण्यात सध्या १६ रुग्ण आहेत. ते कोण होते, ते कुठे फिरले यासंदर्भातून प्रशासनाने माहिती घेतली आहे. तर मुंबईत —  इतके रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ते ज्या लोकांना भेटले त्यांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सोबतच करोना रोग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे व त्या दृष्टीकोनातून प्रशासन हालचाली करत आहे.

या सर्व गोंधळात घरातून वारंवार फोन येत आहेत की बाळ तू घरी ये,

तर घरी जावं की नाही. 

यामध्ये दोन भाग पाडायला हवेत.

एकतर नोकरदार किंवा असे विद्यार्थी जे प्लॅटमध्ये आपल्या कुटूंबासोबत राहतात. घरात दोन ते तीन सदस्य आहेत. 

व असे विद्यार्थी जे शिक्षणासाठी होस्टेलचा पर्याय निवडतात.

पैकी जे होस्टेलमध्ये राहतायत त्यांनी घरी जावं हे निश्चित. तशा सुचना प्रशासनाने देखील दिल्या आहेत. याबद्दलची माहिती घेण्यासाठी आम्ही,

इंडियन मेडिकल असोशिएशन IMA चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना फोन लावला तर त्यांनी सांगितलं,

निश्चितपणे होस्टेलमध्ये  राहणाऱ्या मुलांनी गावाकडे जावं. प्रशासनाने त्यांना सुट्या जाहीर केल्या असून जास्तीत जास्त विलगीकरणावर भर रहात आहे. आमचा त्यांना दूसरा प्रश्न होता की,

अशा वेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रवास करत असताना ही मुले इतरांच्या संपर्कात येवू शकतील त्यामुळे संसर्ग वाढू शकेल का?

यावर त्यांनी सांगितलं की,

योग्य ती खबरदारी घेवूनच हा प्रवास करावा. आवश्यकत ते मास्क वापरावेत, सॅनिटायझरचा वापर करावा. वारंवार डोळ्यात, तोंडास हात लावू नये. जे खबरदारीचे निकष देण्यात आले आहे त्यानुसारच त्यांनी प्रवास करुन गावी जावे.

आत्ता दूसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या कुटूंबासोबत राहणाऱ्या व्यक्तींसाठी. म्हणजे ज्यांच लग्न झालं आहे. विलगीकरण केल्यानंतर जे कुटूंबासोबत इथे चार आठ दिवस घरातून न बाहेर पडता राहू शकतात अशांसाठी. 

तर त्यांनी देखील योग्य ती खबरदारी घ्यावी. घरी जाण्याचा प्रश्न असेल तर जावच असं नाही. मात्र इथे विलगीकरण या तत्वावर रहावे. लक्षात असूद्या जितकी गर्दी जास्त तितका रोग पसरण्याची शक्यता जास्त. त्यामुळेच गर्दी करु नये.घरातून काम करण्याला प्राधान्य द्यावं.

थोडक्यात घरातून जो फोन येत आहे. तो फॉलो करा. शक्य त्यांनी घरी जा. मात्र घरी जात असताना प्रवासाचे सर्व निकष पाळा. निदान आईवडिलांची काळजी कमी होईल हे देखील खरं.

आणि सर्वात महत्वाची सूचना फॅमिली ग्रुपवर विश्वास ठेवू नका. टिव्हीवर वारंवार बातम्या पाहून लोड घेवू नका. 

हे ही वाच भिडू.