असा आहे संपुर्ण देशभरात लागू होण्याची शक्यता असणारा भिलवाडा पॅटर्न

भारतात मार्च महिन्यात कोव्हीड 19 या व्हायरसने प्रवेश केला.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा धाडसी निर्णय जाहीर केला. येत्या 14 एप्रिल ला हा लॉकडाऊन संपेल अस सांगण्यात येत आहे.

पण लॉकडाऊन नंतर काय हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. याच उत्तर म्हणून केंद्र सरकारने भिलवाडा पॅटर्न राबवण्याचे संकेत दिले.

काय आहे हा कोरोनाच्या विरोधातील लढ्याचा महत्वाचा भिलवाडा पॅटर्न?

भिलवाडा हे राजस्थानमधील जिल्ह्याचे ठिकाण. जयपूर, उदयपूर अशा मोठ्या शहरापासून दूर अंतरावर असूनही तिथे कोरोनाचे संक्रमण झाले. 18 मार्च रोजी तिथला पहिला रुग्ण सापडला. ही झिरो पॉझिटिव्ह केस होती, एक डॉक्टर.

आता या डॉक्टरांना कोरोनाची लागण कशी झाली हे कळले नाही मात्र त्यांच्यानंतर खूप वेगाने हा रोग भिलवाडामध्ये संक्रमित झाला. दुसऱ्याच दिवशी आणखी काही डॉक्टर कोरोनाग्रस्त आहेत हे सिद्ध झालं.त्यांनी तपासलेले रुग्ण, इतर सहकारी या सगळ्यांची तपासणी सुरू झाली.

दर दिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होऊ लागली होती.

फक्त भिलवाडा साठीच नाही तर अख्ख्या राजस्थानसाठी ही धोक्याची घंटी होती.

सरकारच्या आदेशाची वाट न पाहता भिलवाडाचे कलेक्टर राजेंद्र भट यांनी 20 मार्च रोजीच कर्फ्यु जाहीर केला. म्हणजे देशभरात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी 4 दिवस भिलवाडा बंद करण्यात आले होते.

राजेंद्र भट्ट यांनी वेगाने पावले उचलली. सर्व प्रथम 50 चेक पोस्ट बनवून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक व खाजगी गाड्यांची वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली.

जिल्ह्याबाहेरची एकही व्यक्ती आत येऊ शकणार नाही व जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जाऊ शकणार नाही असे आदेश होते.

कोरोना रुग्णांचे काँटक्ट्स मॅपिंग करण्यात आले. कोव्हीड 19 व्हायरसचे हॉटस्पॉट शोधून तेथील संचार 100% रोखण्यात आला. शहरातही सर्व हॉटेल व हॉस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेतले.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांची स्क्रिनिंग करण्यासाठी तब्बल 2100 जणांची टीम बनवण्यात आली.

या टीमने 28 लाख लोकांचे स्क्रिनिंग केले आणि त्यातील 16,382 संशयितांना वेगळे करण्यात आले. बाराशे घरांच्या बाहेर पहारा बसवण्यात आला.

पूर्णपणे आयसोलेशनमध्ये असणाऱ्याना जेवण व अत्यावश्यक वस्तू घरपोच मिळवण्याची व्यवस्था केली.

राजेंद्र भट्ट यांनी कोरोनाच्या विरोधातील लढा आक्रमकपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले.

नियम मोडणाऱ्यांची दयामाया दाखवली गेली नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रशासनाला काम करण्यासाठी मोकळीक दिलेली होती.

मार्च महिना अखेर पर्यंत भिलवाडा मध्ये कोरोनाचे 26 रुग्ण आढळले होते. पुढच्या आठ दिवसात फक्त एकच पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला तर मागच्या दोन दिवसापासून एकही नवीन रोगी सापडलेला नाही. कोरोना पॉझिटिव्हमधील 20 जण पूर्णपणे बरे झाले.

यालाच भिलवाडा पॅटर्न म्हणून ओळखले गेले.

कालच केंद्र सरकारने देखील भिलवाडाने ज्या वेगाने कोरोनावर नियंत्रण मिळवले याचे कौतुक केले. आरोग्य मंत्रालयाने हा भिलवाडा पॅटर्न देशभरात राबवन्यासाठीचा प्लॅन देखील जाहीर केलाय.

तर केंद्रीय कॅबिनेट सचिव गौबा यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगितले.

आता पुणे सारख्या कोरोना सेन्सिटिव्ह शहरात हाच पॅटर्न राबवण्यास सुरवात केली आहे आणि काहीच दिवसात संपूर्ण देशभर हे लागू होईल

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.