त्या क्षणापासून पाटलाचा पोरगा सिनेमात ‘नाच्या’ झाला…

गणपत पाटील. आज गणपत पाटलांच नाव काढलं की माणसं वाह् वाह् करतात. इतिहासाच्या पानांवर गणपत पाटलांना मान आहे. एक नाच्या म्हणून असणारी ओळख काही प्रमाणात का होईना पुसली जावून एक कलाकार म्हणून लोक त्यांच नाव आदराने घेतात.

पण वर्तमानकाळातील “नाच्या” ची भूमिका करणाऱ्या कलाकारांच काय?

टिटटॉकवर हाय आय एम सन्नी लिओनी म्हणून भूमिका करणारा कलाकार चेष्टेचा विषय असतो. चला हवा येवू द्या सारख्या कार्यक्रमात साड्या घालणारे कलाकार चेष्टेचा विषय असतात. प्रत्येकाच्या अभिनय क्षमतेवर टिका होवू शकते. ती जरूर करावी पण “साड्या” घालणं, टाळ्या वाजवणं म्हणून कुत्सीतपणे टिकाटिपण्णी करण्याची परंपरा आजही चालूच आहे.

गणपत पाटील ज्या काळात नाच्याची भूमिका रंगवायचे तो काळ कठिण होता. माणसांना रिल लाईफ आणि रियल लाईफ यातला फरक कळत नव्हता. निळू फुले कुठल्यातरी गावातला मस्तवाल पाटीलच वाटायचा. त्यामुळेच गणपत पाटलांच्या पौरुषत्त्वावर देखील आरोप करण्यात आले.

त्यांच्या पत्नीला टोमणेचं ऐकायला मिळाले. हा नाच्या म्हणून पै-पावणे दूरावले. मुलांच्या लग्नात अडचणी आल्या. हा तुमचा? मुलगा कसा असे प्रश्न विचारून लोकांना आपली अक्कल पाजलली तरी हा माणूस नाच्या च्या भूमिकेने घर जगवत गेला.

एक पाटलाचा पोरगा नाच्या कसा झाला हे सांगणारी गणपत पाटलांची ही गोष्ट.

कोल्हापूरच्या गरिब कुटूंबातला गणपत पाटील हा पोरगा. त्याच्या लहानपणीच त्याला वडिल जाण्याचं दुख सहन करावं लागलं. वडिल नाहीत, पोटापाण्याची आबाळ म्हणून हा पोरगा मोलमजूरी करू लागला. खाद्यपदार्थ विकू लागला. टाईमपास म्हणून हा मुलगा रामायणाच्या नाटकात सितेची भूमिका करत असे. याच दरम्यानच्या काळात त्यांची ओळख राजा गोसावी यांच्यासोबत झाली.

ही गोष्ट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

राजा गोसावी यांच्यामुळे त्यांचा संबंध चित्रपटसृष्टीशी आला. मास्टर विनायकांच्या शालिनी सिने प्रफुल्ल पिक्चर्समार्फत त्यांचा प्रवेश चित्रपटविश्वात झाला. कोल्हापूर सोडून ते मुंबईला आले. पण हा प्रवेश कलाकार म्हणून नव्हता. ते पिक्चर्ससाठी सुतारकाम करायचे. याच दरम्यान त्यांना एक भूमिका मिळाली. भूमिका केलेला हा त्यांचा पहिला चित्रपट.

चित्रपटाचं नाव होतं बालध्रुव. यात गणपत पाटलांची भूमिका होती ती म्हणजे, गर्दीत उभा राहिलेल्या एका मुलाची.

कालांतराने मास्टर विनायक गेले आणि गणपत पाटील पुन्हा कोल्हापूरला आले. या दरम्यानच्या काळात त्यांचा कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. राजा परांजपे यांचा राजा परांजपे यांचा बलिदान आणि राम गबाले यांचा वंदे मातरम् या पिक्चरमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.

पण त्यांचा मोठ्ठा ब्रेक ठरला तो भालजी पेंठारकर यांच्या पिक्चरमधील खलनायक. मीठभाकर या पिक्चरमध्ये त्यांनी खलनायक रंगवला. तत्कालीन पाटलांच्या पोराने पडद्यावर साकारावे असे समाजमान्यता असणारी ही भूमिका ठरली.

अन् त्या क्षणापासून पाटलाचा पोरगा तमाशातला नाच्या झाला..!

गणपत पाटील सिनेमांबरोबर नाटकांसाठी प्रयत्न करु लागले. ऐका हो ऐका या जयशंकर दानवेंच्या नाटकात त्यांना सोंगाड्याची भूमिका मिळाली. कमरेवर हात ठेवून एक हात हनुवटीखाली लावून नजाकतीत ते ही भूमिका साकारू लागले. बघता बघता नाटक हिट झाले. सर्वांना नाटकातला हा नाच्या खरा वाटू लागला. त्यानंतर जाळीमधी पिकली करवंद हे नाटक आलं. त्यातही त्यांना सोंगाड्याची भूमिका देण्यात आली.

पुढे कृष्णा पाटील यांनी वाघ्या मुरळी नावाचा सिनेमा केला. त्यातही त्यांना सोंगाड्याची भूमिका देण्यात आली. या कलाकाराने ती भूमिका हिट केली. त्या क्षणी या माणसाला देखील माहित नव्हते पुढे जावून “नाच्याची” ही भूमिका आपल्याला आयुष्यभर चिटकणार आहे. त्या क्षणापासून मराठी चित्रपटसृष्टी एक नाच्या मिळाला…!

तो काळ ब्लॅक ॲण्ड व्हाईट सिनेमांचा होता. प्रत्येक मराठी सिनेमात एक पाटील आणि एक तमाशाचा फड हे समीकरण फिक्स होवू लागलं. आणि याच सिनेमात महत्वाचा दुवा ठरले ते गणपत पाटील.

या पुर्वी केलेल्या सर्व भूमिका संपून गेल्या आणि उरला तो फक्त नाच्या.

पाठलाग, वाघ्या मुरळी, केला इशारा जाता जाता, मल्हारी मार्तंड, देवा तुझी सोन्याची जेजूरी ते एक गाव बारा भानगडी हा प्रवास सुरू झाला. इथे गणपत पाटील म्हणजे नाच्या आणि नाच्या म्हणजे गणपत पाटील हे समीकरण दृढ झाले.

सत्तरच्या दशकात त्यांच्या भूमिका गाजू लागल्या. तिकडे त्यांच्या खाजगी आयुष्यात मात्र नाच्या म्हणून टिंगलटवाळी सुरू झाली. अस सांगितलं जातं की नाच्या च्या भूमिकेवर हिणवल्यामुळे त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.

ते भूमिका करीत राहिले ते घर चालवण्यासाठी…

पुढे काळ सरला. झी गौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. नटरंग सारखा सिनेमा त्यांचीच आठवण करून देवू लागला. ते अखेरचे दिसले ते मुख्यमंत्री गणप्या गावडे या सिनेमात. तिथेही लोककलावंतासाठीची पेन्शन घेण्यासाठी ते आल्याचं दाखवण्यात आलं.

तो काळ काय किंवा आजचा काळ काय? एक कोल्हापूरचा पाटील ‘नाच्या’ रंगवतो हे प्रत्येक काळात कठीणचं असेल.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.