धडाकेबाज साठी “मैंने प्यार किया” पणाला लावणारा लक्ष्या होता.

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सर्वांना माहित आहेत. आजही लक्ष्याचा विषय निघाला की महेश कोठारेंचे डोळे पाणावतात. ‘धडाकेबाज’ सिनेमातलं ‘हि दोस्ती तुटायची नाय’ हे गाणं लक्ष्या-महेश या दोघांच्या मैत्रीला साजेसं गाणं म्हणता येईल.

या दोघांची मैत्री किती घट्ट होती, हे सांगणारा हा किस्सा

१९९० दरम्यानचा तो काळ होता. महेश कोठारेंनी दिग्दर्शित केलेला ‘धूमधडाका’ हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. महेशच्या या सिनेमामुळे अभिनय आणि काॅमेडी टायमिंगचं खणखणीत नाणं असणा-या लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकाराची ओळख सिनेसृष्टीला झाली. पहिलाच सिनेमा सुपरहिट झालाय म्हणुन महेश थांबला नाही. मराठी सिनेमांमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात महेश उत्सुक होता. 

अशातच महेशला ‘धडाकेबाज’ ची कल्पना सुचली. या सिनेमात बाटलीचा राक्षस दाखवण्यासाठी थेट अमेरिकेतुन महेशने तंत्रज्ञान मागवलं होतं. आजच्या काळात आपण ‘बाहुबली’ सारख्या सिनेमांना भव्य दिव्य मानतो. परंतु डोक्यातल्या अचाट कल्पना जिवंत कशा साकारायच्या हे महेश कोठारेंच्या सिनेमांतून पाहायला मिळतं. ‘धडाकेबाज’ सुद्धा एक असाच आगळावेगळा सिनेमा. 

‘धडाकेबाज’ च्या शूटींगला सुरुवात झाली. दुसरीकडे सूरज बडजात्या ‘मैरे प्यार किया’ सिनेमातून सलमान खानला लाँच करण्याच्या तयारीत होता. या सिनेमासाठी लक्ष्याला विचारणा झाली. लक्ष्याने जिगरी दोस्त महेशशी चर्चा करुन ‘धडाकेबाज’ च्या शुटींगनंतर ‘मैने प्यार किया’ साठी स्वतःच्या तारखा दिला.

लक्ष्याचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असल्याने ‘धडाकेबाज’ च्या सेटवर पेढे वाटून सेलिब्रेशन करण्यात आलं. 

‘धडाकेबाज’च्या शुटींगचा शेवटचा टप्पा सुरु झाला. यात महेश लक्ष्याला घेऊन ‘गंगाराम’ या गाण्याचं शूटींग करणार होता. सगळेच उत्सुक होते. आणि अचानक या गाण्याच्या शुटींगच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण सेटची लाईट गेली. लक्ष्या आणि इतर कलाकार मेकअप करुन बसले होते. सर्वांनी वाट पाहिली पण शेवटपर्यंत लाईट आलीच नाही. रिकामा वेळ सत्कारणी लावावा म्हणुन लक्ष्या-महेशसह बरीचशी मंडळी त्या दिवशी क्रिकेट खेळली. 

पुढच्या दिवशी सुद्धा हिच समस्या निर्माण झाली. त्यावेळेस जनरेटर वगैरेची इतकी सोय नसल्याने गेलेली लाईट परत यायची वाट पाहण्याशिवाय पर्यात नव्हता. लाईट गेल्यामुळे शुटींगचे दोन दिवस वाया गेले होते. संपूर्ण गाणं शुट होणं बाकी होतं.

आता मात्र महेशला चिंता वाटू लागली. कारण एक-दोन दिवसांनी लक्ष्याला ‘मैने प्यार किया’ साठी मुंबईला पोहोचणं आवश्यक होतं. 

मित्राच्या मनातली घालमेल लक्ष्याने बरोबर ओळखली. लक्ष्या महेशजवळ गेला आणि म्हणाला,

‘महेश माझ्या हिंदी सिनेमाचं शुट सुरु होणार आहे. तिथे सूरज बडजात्या नावाचा मोठा दिग्दर्शक आहे म्हणे. पण मला कोणाची पर्वा नाही. तु अजिबात काळजी करु नकोस. आधी ‘धडाकेबाज’चं शुटींग पूर्ण करेन मगच ‘मैने प्यार किया’ साठी जाईन. माझ्यासाठी सगळी दुनिया एका बाजुला आणि महेश कोठारे एका बाजुला. तुझा सिनेमा पूर्ण करुनच जाईन.’

जीवलग दोस्त लक्ष्याच्या या शब्दांनी महेशच्या डोक्यावरचा भार उतरल्यासारखा झाला. मनावरचं दडपण दूर झालं.

हि होती लक्ष्या-महेशची जीवाला जीव देणारी यारी. लक्ष्याचे प्रत्येक सिनेमे हे दर्जेदार आहेतच पण महेशच्या सिनेमात लक्ष्याचा अभिनय जास्त खुलून यायचा. लक्ष्याचा महेशवर इतका विश्वास होता की महेशच्या प्रत्येक सिनेमाच्या करारावर मानधन, कथा असा कोणताही विचार न करता लक्ष्या सही करायचा. महेशचा सिनेमा हा उत्तमच असणार, याची लक्ष्याला पक्की खात्री होती. 

२००४ साली लक्ष्या हे जग सोडून गेला. त्यानंतर महेशने सुद्धा सिनेमात अभिनय करणं जवळपास बंदच केलं. आता महेश कोठारे त्यांच्या प्राॅडक्शन कंपनी अंतर्गत नवनवीन मालिकांची आणि सिनेमांची निर्मिती करतात. मुलगा आदिनाथ आणि लक्ष्याचा लेक अभिनयला घेऊन एखादा सिनेमा दिग्दर्शित करण्याची महेश कोठारेंची इच्छा आहे.

सिनेसृष्टीत ग्लॅमरच्या दुनियेत, सततच्या स्पर्धेत परस्परांमधली मैत्री जपणं तसं कठीणच म्हणता येईल. परंतु महेश-लक्ष्याची मैत्री हि या दुनियेपलीकडे सुद्धा तितकीच अस्सल आणि निखळ होती, याचाच अनुभव मिळतो. 

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.