मोहब्बतें या सिनेमामध्ये बच्चनला फाईट ‘सचिन तेंडुलकर’ देणार होता पण..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. अमिताभ बच्चनची सिनेमा कंपनी abcl बुडाली होती, बँकेचं भरमसाठ कर्ज झालं होतं. हिरो म्हणून तो काम करत असलेले सिनेमे धडाधड आपटत होते. घरदार विकून तो रस्त्यावर येईल अशीच स्थिती दिसत होती.

बच्चनच वय झालं होतं , लाल बादशाह, बडे मियाँ छोटे मियाँ सारखे रोल त्याला शोभत नव्हते. बच्चन या नावाभोवती जो दरारा होता, त्याची अँग्री यंग मॅन हि इमेज होती ती आता संपूर्णपणे रसातळाला गेली होती. पण त्याला हे समजेना झालेलं.

अशातच एक दिवस त्याची भेट यशराज बॅनरच्या यश चोप्रा यांच्याशी झाली.

यश चोप्रा हे अमिताभचे जुने मित्र. त्यांच्याच दिवार, त्रिशूल सारख्या सिनेमांनी अमिताभला अँग्री यंग मॅन बनवलेलं, त्यांच्याच सिलसिला या सिनेमाने अमिताभ हळुवार रोमँटिक भूमिका देखील तितक्याच ताकदीने करू शकतो हे सिद्ध झालेलं. पण सिलसिला च्या वेळी अमिताभच्या आयुष्यात काही घटना घडून गेल्या त्यानंतर यश चोप्रा आणि तो एकत्र परत कधी दिसले नाहीत.

पण आता बच्चनला गरज होती.

यश चोप्रा यांचा यशराज हा बॅनर भारतातला सर्वात मोठा सिनेमा प्रोडक्शन हाऊस बनला होता. शाहरुख बरोबर त्यांचा दिल तो पागल है आणि त्यांच्या मुलाचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सुपरहिट झालेले.

चोप्रा याना सिनेमा सुपरहिट करायचा फॉर्म्युला सापडला होता.

भेटायला आलेल्या अमिताभला यश चोप्रा यांनी समजावून सांगितलं कि आता त्याने हिरोचे रोल बंद करून चरित्रात्मक भूमिकांकडे वळलं पाहिजे. त्याने सूर्यवंशम या सिनेमात झलक दाखवलीच होती, लोकांनाही संपूर्ण सिनेमाची स्क्रीन भरून टाकणारा  ठाकूर भानुप्रताप सिंग आवडला होता. हि अमिताभची जादू होती आणि तीच यश चोप्रा याना रिपिट करायची होती.

दिलवाले दुल्हनियाच्या रेकॉर्ड ब्रेक यशानंतर आदित्य चोप्रा शाहरुखला घेऊन मल्टिबजेट ड्रीम सिनेमा बनवण्याच्या तयारीला लागला होता.

या सिनेमात एका वडीलधाऱ्या भूमिकेत अमिताभला त्यांना घ्यायचं होतं .

बच्चनची व्दिधा मनस्थिती होत होती. पण यश चोप्रा यांनी शाहरुखच्या तोडीस तोड भूमिका असेल याचं त्याला वचन दिलं आणि अमिताभ या सिनेमासाठी तयार झाला.

आदित्य चोप्रा, अमिताभ आणि शाहरुख एका ग्रँड सिनेमासाठी एकत्र येत आहेत हे कळाल्यावर इंडस्ट्रीमध्ये जोरदार हवा झाली. फॅन्सदेखील कधी हा सिनेमा येतोय याची चर्चा करत होते. गॉसिप कॉलम सिनेमाबद्दल लिहिण्यात मग्न झाले होते.

नव्या शतकातला सर्वात मोठा सिनेमा म्हणून पब्लिसिटी होत असलेल्या या पिक्चरचं नाव होतं मोहब्बतें

सिनेमाचं शूटिंग लंडन येथे होणार होतं . यश चोप्रा यांचा सर्वात धाकटा मुलगा उदित, घर से निकलते ही वाला जुगल हंसराज आणि नवीन चेहरा जिम्मी शेरगील हे तीन हिरो होते तर श्मिट शेट्टी, किम शर्मा, प्रीती जांगियानी या तीन नव्या हिरोईन असा एकदम फ्रेश मामला होता.

सिनेमाची स्टोरी थोडक्यात अशी होती की अमिताभ एका गुरुकुल नावाच्या फेमस कॉलेजचे कठोर प्रिन्सिपल असतात आणि शाहरुख एक खुशालचेंडू म्युजिक टीचर बनून त्यांच्या कॉलेजमध्ये येतो.

त्यांच्याच कॉलेजमधल्या तीन विद्यार्थ्यांना अमिताभने बनवलेला परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन हे तीन नियम मोडून त्यांना प्रेम करायला उद्युक्त करतो.

हे तो का करत असतो याला एक कारण म्हणजे अमिताभने खूप वर्षांपूर्वी शाहरुखचे आणि त्याच्या मुलीचं अफेअर असताना लग्न होऊ दिलेलं नव्हतं आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली होती.

अमिताभला प्रेमाचा धडा शिकवण्यासाठी मिस्टर राज आर्यन रुपी शाहरुख खान त्या कॉलेजला येतो अशी स्टोरी होती.

अमिताभच्या मुलीच्या गेस्ट अपियरन्समध्ये ऐश्वर्या राय हिला फायनल केलं गेलंतर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत श्रीदेवी. आणखी एक महत्वाची बातमी आली ज्याने संपूर्ण भारतभरात एक मोठा बॉम्ब पडला.

अमिताभच्या मुलाच्या भूमिकेत महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला यश चोप्रा यांनी साईन केलं होतं . 

हे काही साधंसुध गॉसिप नव्हतं. सचिन तेव्हा आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर होता. शेन वॉर्न, मॅकग्रा, डोनाल्ड, वासिम अक्रम यांच्या चिंधड्या उडवत होता. अशावेळी तो सिनेमात येतोय तेही अमिताभ समोर आदित्य चोप्राच्या सिनेमात ही मोठी गोष्ट होती.

यापूर्वी सुनील गावसकर , संदीप पाटील या क्रिकेटरनी सिनेमात काम केलेलं पण ते एवढ्या मोठ्या बजेटच्या पिक्चरमध्ये नव्हते.

हे फक्त गॉसिप नव्हतं तर सचिनने प्रॉपर कॉन्ट्रॅकट साइन केलेलं. सचिन आणि बच्चन यांची बापलेकाची जुगलबंदी तुफान यशस्वी होणार होती. सचिन ची पब्लिसिटी कॅश करण्यासाठी यश चोप्रा यांनी हि आयडिया केली असावी.

पण दुर्दैवाने तस घडलं नाही.

पुढे सिनेमाचं शूटिंग सुरु झालं. जसजसा सिनेमा पुढे  लागला तसा तसं  पिक्चरची लांबी वाढत आहे हे यश चोप्रा यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या मुलाला कथेला फाटे फोडणाऱ्या प्रसंगांना कट करून स्क्रिप्टची लांबी कमी करायचे आदेश दिले.

आदित्य चोप्राने मनावर दगड ठेवून सचिन आणि श्रीदेवीच्या रोलवर कात्री चालवली. मिथुनदा सुद्धा एका छोट्या रोल मध्ये असणार होते, त्यांचा सुद्धा रोल कट झाला. 

२७ ऑक्टोबर २००० रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर मोहबत्ते रिलीज झाला. प्रचंड सुपरहिट झाला. अनेक अवॉर्ड्सची बरसात झाली. अमिताभ बापाच्या रोलमध्ये सुद्धा बाप आहे हे कळालं . फक्त टिंगू सचिन आणि धिप्पाड अमिताभची खास खर्जातल्या आवाजातली जुगलबंदी भारतीय प्रेक्षकांना बघायला मिळाली नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.