आजही म्हाताऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये सुरैय्याच्या गप्पा रंगतात….

काळ बदलत जातो, सिनेमे बदलत जातात. बदलणाऱ्या काळासोबत नवनवीन कलाकार सिनेमांमध्ये स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. या बदलाच्या प्रक्रीयेमध्ये जुने कलाकार मात्र कुठेतरी मागे पडतात. काही काळाच्या पडद्याआड सुद्धा निघून जातात. प्रेक्षक म्हणून आपल्यालासुद्धा त्यांचा विसर पडतो.

आज तुम्हाला सांगणार आहे, अशाच एका अभिनेत्रीची कहाणी,

तिचे चाहते खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू होते. ती अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड मधली पहिली ग्लॅमर गर्ल सुरैय्या.

असं म्हणतात, की सुरैय्याची एक झलक पाहण्यासाठी तिच्या मरीन ड्राइव्हच्या घराबाहेर गाड्यांची रांग लागायची त्यामुळे भरपूर ट्रॅफिक व्हायचं.  मरीन ड्राईव्ह येथे असणाऱ्या ‘कृष्णा महल’ या तिच्या घराबाहेर गाड्यांची इतकी रांग असायची की, कधीकधी गर्दीला आवरायला पोलिसांना यावं लागायचं. इतके या अभिनेत्रीचे चाहते होते.

सर्वांच्या मनावर राज्य करणारी सुरैय्या नेमकी कोण होती?

सुरैय्याचं पूर्ण नाव सुरैय्या जमाल शेख असं होतं. १५ जून १९२९ रोजी लाहोर येथे सुरैय्याचा जन्म झाला. सुरैय्याच्या जन्माच्या एक वर्षानंतर तिचं कुटुंब मुंबईत आलं. सुरैय्याचे मामा एम. जहुर यांनी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. १९३० च्या दशकात हिंदी सिनेमातील लोकप्रिय खलनायक म्हणून त्यांना ओळख मिळाली.

मामा मुळे हिंदी सिनेमा जगताशी सुरैय्याचं नातं जोडलं गेलं. 

लहानपणापासूनच आपल्या गायनाने आणि अभिनयाने सुरैय्याने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. खूप वेळेस ती आपल्या मामासोबत सिनेमाच्या शूटिंगला जायची. १९४१ साली नानुभाई वकील यांच्या नजरेत सुरैय्या आली आणि त्यांनी ‘ताजमहल’ या सिनेमात मुमताज महलच्या तरुणपणीच्या भूमिकेसाठी सुरैय्याची निवड केली.

या सिनेमात सुरैय्याने अभिनय केला आणि त्यानंतर हिंदी सिनेमातील एका यशस्वी प्रवासाच्या दिशेने तिने वाटचाल केली. 

अभिनयासोबतच सुरैय्याचा गायन क्षेत्रात सुद्धा प्रवास चालू झाला होता. सुरैय्या त्याकाळी ऑल इंडिया रेडिओ च्या माध्यमातून स्वतःच्या गायनाची जादू सर्वांना दाखवत होती.  अशाच एका रेकॉर्डिंग दरम्यान नौशाद अली नावाचे प्रसिद्ध संगीतकार यांनी सुरैय्याचा आवाज ऐकला. सुरैय्याच्या आवाजाने ते खूप प्रभावित झाले आणि सिनेमांमध्ये पार्श्वगायन करण्याची संधी त्यांनी सुरैय्याला दिली. 

१९४३ साली आलेल्या ‘इशारा’ या सिनेमामुळे सुरैय्या एका रात्रीत स्टारपदावर पोहोचली.

या सिनेमात लोकप्रिय अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून सुरैय्या झळकली. आश्चर्य म्हणजे, त्यावेळी पृथ्वीराज कपूर हे ३७ वर्षांचे होते आणि सुरैय्या केवळ १४ वर्षांची होती. पृथ्वीराज कपूर यांना काम करायला खूप अवघड गेलं, कारण कॅमेरासमोर  सुरैय्या हीरोइन होती पण कॅमेरा मागे ती त्यांच्या मुलीसारखी होती. या दोघांच्या ‘इशारा’ सिनेमाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. 

पृथ्वीराज कपूर यांच्या शिवाय सुरैय्याची मशहूर गायक आणि अभिनेते के.एल.सेहगल यांच्यासोबत सुद्धा जोडी जमली. सेहगल यांनी एकदा सुरैय्याचा आवाज ऐकला होता आणि त्यानंतर ते सुरैय्याचे दिवाने झाले.

यामुळे १९४५ साली ‘तदबीर’ या सिनेमात सुरैय्याला घ्यावं, अशी शिफारस सेहगल यांनी दिग्दर्शकांकडे केली. सुरैय्याने सिनेमात अभिनयासोबत स्वतःच्या गायकीचं सुद्धा दर्शन प्रेक्षकांना घडवलं. सुरैय्याच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे तिला ‘सुर सम्राज्ञी’ तसेच ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून ओळख मिळाली. 

४० आणि ५० च्या दशकांमध्ये बॉलिवूडच्या पहिल्या ग्लॅमर गर्लने एकापेक्षा एक सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘शमा’ ,’मिर्झा गालिब’, ‘दो सितारे’, ‘खिलाडी’, ‘सनम’, ‘कमल के फूल’ असे तिचे अनेक सिनेमे गाजले. तसेच ‘सोचा था क्या दिल में दर्द बसा लाई’, ‘तेरे नैनो ने चोरी किया’, ‘मुरली वाले मुरली बजा’ अशी सुरैय्याने गायलेली गाणी सुद्धा लोकप्रिय झाली. 

१९५४ साली आलेल्या ‘मिर्झा गालिब’ या सिनेमात सुरैय्याने नवाब जान ही भूमिका साकारली.

नवाब जान ही मिर्झा गालिब यांच्यावर अतिशय प्रेम करायची. सिनेमात मिर्झा गालिब यांच्या पाच गझलांना सुरैय्याने आपला आवाज दिला. सुरैय्याच्या सुंदर अभिनयाने आणि गाण्यांनी हा सिनेमा आजही हिंदी सिनेमातील एक दर्जेदार सिनेमा म्हणून ओळखला जातो.

हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतका आवडला की एका समारंभात सुरैय्याचं कौतुक करताना ते म्हणाले,

“तुम्ही गालिबचा आत्मा पुन्हा एकदा आमच्या समोर जिवंत केला.”

मिर्झा गालिब हा पहिला हिंदी सिनेमा ज्या सिनेमाला ‘राष्ट्रपती सुवर्ण पदक’ मिळाले आहे. 

१९३६ ते १९६३ या काळात सुरियाने ६७ सिनेमांमध्ये अभिनय केला. तसेच जवळपास ३३८ गाण्यासाठी सुरैय्या यांनी स्वतःचा आवाज दिला. एका सिनेमाच्या प्रीमियर दरम्यान चाहत्यांनी घातलेल्या गराड्यामुळे तिला थोडीशी जखम झाली, त्यामुळे शक्यतो स्वतःच्या सिनेमांच्या प्रीमियरला जाणं ती टाळायची. 

सुरैय्या त्या पिढीतल्या गायन आणि अभिनय करणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाची कलावंत होती. ३१ जानेवारी २००४ रोजी सुरैय्याचं निधन झालं.

आज नव्या पिढीला सुरैय्याविषयी इतकं ठाऊक नसेल, परंतु सुरैय्याने भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचं दिलेलं योगदान मौल्यवान आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.