बाॅलिवूडमध्ये आयटम डान्स करणारी पहिली नृत्यांगना म्हणजे कुकू मोरे

भिडूंनो, थोडा गैरसमज झाला असेल. माझाही झाला. आपण मराठी असुन मोरे आडनावाची स्त्री बाॅलिवूडमध्ये आयटम डान्स करणारी पहिली नृत्यांगना आहे, आणि आपल्याला याची सूतराम कल्पनाही नाही.

तर सर्वप्रथम हा गैरसमज दूर करतो आणि लेखाच्या विषयाला सुरुवात करतो. कुकू मोरे या मराठी नसुन त्या अँग्लो इंडीयन होत्या. त्यांच्या आडनावाची स्पेलिंग ‘Moray’ अशी आहे. अँग्लो इंडियन म्हणजे अशी ब्रिटीश माणसं ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे.

तर अशा या कुकू मोरे. १९४०-५० च्या काळात कुकू मोरे यांनी स्वतःच्या दिलखेचक अदांनी आणि सुंदर नृत्याने बाॅलिवूडवर स्वतःची छाप पाडली. कुकू नृत्यामध्ये ज्या सफाईने कंबरेचा वापर करायची, त्यामुळे तिला ‘रबर गर्ल’ म्हणुनही ओळख मिळाली. 

१९२८ साली कुकूचा जन्म झाला. लहानपणापासुन कुकूला डान्सचं प्रचंड वेड. सिनेमात डान्स करुन भरपुर पैसे कमावण्याचं तिचं स्वप्न होतं. इतक्या लहान वयात जणु स्वतःचं भविष्य ती बघत होती. झालंही तसंच.. १९४६ साली ‘अरब का सितारा’ या पहिल्याच सिनेमातुन कुकूच्या डान्सची झलक सर्वांना बघायला मिळाली.

या पहिल्याच सिनेमातील डान्समुळे त्याकाळी अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या नजरेत कुकू आली. 

यानंतर १९४८ साली मेहबूब खान यांच्या ‘अनोखी अदा’ या सिनेमाच्या माध्यमातुन पहिल्यांदाच प्रमुख नृत्यांगना म्हणुन कुकूला ओळख मिळाली. यानंतर एकामागोमाग एक सिनेमांमध्ये कुकूच्या नृत्याची अदाकारी सर्वांना बघायला मिळत होती. पुढच्याच वर्षी १९४९ साली आलेल्या दिलीप कुमार, नर्गिसच्या ‘अंदाज’ सिनेमातील कुकूची अदाकारी असलेलं ‘झुम झुम के नाचो आज’ हे गाणं लोकप्रिय ठरलं. 

आता आपण ‘कलाकार इतकं मानधन घेतात’, वगैरे गोष्टींच्या चर्चा करतो. पण कुकू त्याकाळी म्हणजेच ५० च्या दशकात प्रत्येक सिनेमातील डान्ससाठी ६००० रुपये इतकं मानधन घ्यायची. ही रक्कम त्यावेळी निश्चितच मोठी होती. अशाप्रकारे लहानपणी सिनेमात डान्स करुन भरपुर पैसे कमावण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं. 

कुकूचे हेलनच्या परिवाराशी मैत्रीपूर्ण संबंध होते. हेलनच्या कुटूंबातले सदस्य कुकूच्या डान्सचे चाहते होते. हेलन सुद्धा कुकूचा नितांत आदर करायची. कुकूलाही हेलनविषयी खुप जिव्हाळा. हेलनला सिनेमात डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास कुकूचं खुप मोठं योगदान आहे.

१९५१ साली आलेल्या ‘आवारा’ सिनेमातील ‘एक दो तीन आजा मौसम है रंगीन’ या गाण्यात तेरा वर्षीय हेलन कुकूसोबत नाचली आहे. यानंतर कुकू आणि हेलन १९५८ साली आलेल्या ‘चलती का नाम गाडी’, ‘यहूदी’ या सिनेमांमधील गाण्यांमध्ये सुद्धा एकत्र नाचताना दिसल्या. हेलनसोबतच बाॅलिवूडमध्ये खलनायकी भुमिका गाजवणारे प्राण यांनाही कुकूने ‘जिद्दी’ या सिनेमातुन बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मदत केली. 

कुकूचा मुंबईत स्वतःचा आलिशान बंगला होता. तिने लग्न केलं नव्हतं. तिच्याकडे तीन गाड्या होत्या. एक गाडी तिच्यासाठी, एक गाडी तिच्याजवळ असणा-या कुत्र्यांसाठी तर तिसरी गाडी तिची खास जवळची असलेली हेलनसाठी असल्याची चर्चा होती.

कुकूने स्वतःसाठी भरपूर दागिन्यांची खरेदी केली होती. प्रसिद्धी आणि संपत्ती तिच्या पायाशी अक्षरशः लोळण घेत होती. 

कसंय भिडूंनो, कोणाचं नशीब कधी बदलेल काय सांगता येत नाही. इतकी अमाप श्रीमंती उपभोगणा-या कुकूचं आयुष्य एका फटक्यात बदललं. इन्कम टॅक्स चुकवल्यामुळे आयकर विभागाने कुकूच्या घरावर आणि तिच्या सर्व संपत्तीवर जप्ती आणली.

पैशाच्या राशीत लोळणारी कुकू अक्षरशः रस्त्यावर आली. तिला सिनेमासाठी डान्सच्या ऑफर येणं सुद्धा बंद झालं. १९६३ साली आलेला ‘मुझे जिने दो’ हा कुकूने डान्स केलेला शेवटचा सिनेमा. 

कुकूची आर्थिक अवस्था प्रचंड वाईट झाली. यातच तिला कॅन्सरचं निदान झालं. दोन वेळचं जेवण मिळणं तिला कठीण झालं. असं म्हणतात, भाजीमार्केटमध्ये भाजीविक्रेते गेल्यावर जी रस्त्यावर भाजी पडायची, ती उरलीसुरली भाजी शिजवून कुकू खायची. इतकी वाईट परिस्थिती तिच्यावर ओढवली होती. ३० सप्टेंबर १९८१ रोजी तिचं निधन झालं. 

सिनेमाक्षेत्रात यशाच्या शिखरावर असणारे अनेक कलाकार काळाच्या ओघात कुठे गायब झाले, हे कोणालाच सांगता येत नाही. जे तग धरुन राहिले, ते लोकप्रिय झाले. त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित असतात. परंतु वेळ वाईट आल्याने कुकू सारखे अनेक कलाकार काळाच्या प्रवाहात नकळत हरवले गेले. या कलाकारांनी सुद्धा काहीवेळ आपलं मनोरंजन केलं असतं. त्यामुळे त्यांचंही स्मरण करणं गरजेचं आहे. 

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. Amit kangale says

    एखादा लेख मराठी निर्माते यांच्यावर पण होऊन जाऊ द्या
    आणि नेहमी एक नाव समोर येतं ते म्हणजे फत्तेलाल
    हे फत्तेलाल कोण ?
    त्यावर प्रकाश टाकावा

Leave A Reply

Your email address will not be published.