पहिल्याच प्रयोगाला नऊ वन्स मोअर मिळवत केश्याचा “संगीतसूर्य केशवराव भोसले” झाला

मराठी रंगभूमीचा एक सुवर्णकाळ सुरू होता. बालगंधर्वां सारखे कलाकार आणि राम गणेश गडकरी यांच्यासारखे नाटककार रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम नाटकं आणत होती. सध्या मनोरंजन क्षेत्रात जी जीवघेणी स्पर्धा असते, तशी स्पर्धा नव्हती.

अनेक नाटक कंपनी कार्यरत होत्या. त्यांच्यात थोडीफार स्पर्धा रंगत असली तरीही यातून एक चांगलं नाटक रसिकांसमोर आणायचं एवढाच उद्देश होता. नाटक हा एक सोहळा समजून दर्दी नाट्यरसिक सुद्धा नाटकांचा मनापासून आस्वाद घ्यायचे.

अशा काळात उदयास आलेला कलाकार म्हणजे केशवराव भोसले.

ही गोष्ट तेव्हाची जेव्हा केशवराव भोसले संगीतसूर्य झाले नव्हते. केशवराव भोसले यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. अगदी लहान वयात वडिलांचे अकाली निधन झाले. घरी गरीबी. त्यामुळे केशवराव भोसले यांनी घराची आर्थिक जबाबदारी स्वीकारली.

१९०० सालाची नुकतीच सुरुवात झाली होती. ब्रिटिशांचं राज्य देशावर होतं. सध्या असतात तसे नोकरीचे पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हते. घरच्या गरीबीमुळे जनुभाऊ निमकरांच्या स्वदेश हितचिंतक नाटक कंपनीत केशवराव भोसले कामासाठी रुजू झाले. 

केशवराव कंपनीत जी सांगेल ती कामं करायचे. सर्व त्यांना केश्या या नावाने हाक मारायचे. कोणालाही नकार न देता केश्या कायम उत्साहात सर्व कामं करायचा.

एकदा कंपनीचा कोल्हापूरला नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचं नाव होतं शारदा. परंतु शारदेची भूमिका सुंदर रंगवणारा कलावंत अचानक तापाने फणफणला. त्याच्या आजारपणामुळे रात्रीचा प्रयोग रद्द होण्याची चिन्ह होती. परंतू स्वदेश हितचिंतक कंपनीचा प्रयोग कधीच रद्द होत नाही, असं बोलून कोणीतरी जनुभाऊ निमकरांना उसकवलं. यामुळे जनुभाऊंनी सुद्धा काहीही झालं तरी प्रयोग रद्द करायचा नाही, असं ठरवलं.

नाटकात शारदे ची भूमिका कोण करणार असा सर्वांना प्रश्न पडला. जनुभाऊंच्या डोळ्यासमोर प्रत्येक कामं उत्साहात करणारा केश्या उभा राहिला. 

प्रयोग रात्रीचा होता.

अधिक वेळ न दवडता जनुभाऊ केश्याला सोबत घेऊन टांग्यातून एका मित्राच्या घरी गेले. सलग पाच – सहा तास त्यांनी केश्या कडून शारदेच्या संवादांची आणि गाण्यांची कसून तालीम करून घेतली. कोल्हापूरला रात्रीचा प्रयोग. नाट्यरसिक प्रयोग सुरू होण्याची वाट बघत होते.

या खास प्रयोगाची ख्याती संपूर्ण शहरात पसरली. प्रयोगाला राजर्षी शाहू महाराज आणि त्यावेळेस कोल्हापुरात असलेले प्रबोधनकार ठाकरे उपस्थित होते. 

शारदा नाटकाचा प्रयोग सुरू झाला.

केश्या रंगमंचावर भूमिका करू लागला. नाटकातली पदं सुरेल आवाजात गाऊ लागला. उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रेक्षक केश्याला मनापासून दाद देऊ लागले. नाटकातील एका गाण्याला केश्याला नऊ वेळा वन्स मोअर मिळाला. अखेर जनुभाऊ निमकर विंगेतून स्टेजवर आले.

त्यांनी प्रेक्षकांना प्रेमळ विनंती केली,

“आणखी वन्स मोअर नको. पोरगा लहान आहे. दमलाय तो !”

पण प्रेक्षक मात्र ऐकायला तयार नव्हते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेले शाहू महाराज यांनी सर्वांना शांत करण्यासाठी एक तोडगा काढला. त्यांनी “सर्वांच्या वतीने फक्त केवळ एकच वन्स मोअर घे.” असं केश्याला सांगितलं.

त्या एका रात्रीत सूर्या सारखा उदयास येणारा केश्या संगीतसूर्य केशवराव भोसले झाला. 

रंगमंचावर पुढील २० वर्ष संगीतसूर्य केशवराव भोसले स्वत:च्या गायनाने संगीत नाटकं गाजवत राहिले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी हा संगीतसूर्य स्वत:च्या संगीताची छाप मागे सोडून रंगभूमीवरून कायमचा मावळला. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.