नोबेल प्राईजमधून मिळालेला पैसा आईनस्टाईनने शेअर मार्केटमध्ये लावला अन् गंडला

तुका म्‍हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।।

अस संत तुकाराम महाराज म्हणून गेलेत. या वाक्यातल्या “एथें पाहीजे जातीचे” चा अर्थ आपण अवधुत गुप्तेंच्या गंडलेल्या पोस्टप्रमाणे घ्यायचा नाही. जातीचे म्हणजे ज्याला ज्यातलं कळत त्याने तेच करावे इतकं सरळं साधं आहे. 

असो,

तर आईनस्टाईन माहितच असतील. सुपरमॅन सारखा माणूस पृथ्वीला उलट्या चकरा मारून भूतकाळात जावू शकला ते याच माणसाच्या फॉर्म्यूल्यामुळे. आईनस्टाईन म्हणजे सायन्स मधले टॉम क्रुझ. आधुनिक भौतिकशास्त्राचे पितामह म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अगदी हूशार माणूस. इतके हुशार की त्यांच्यामुळे आत्ता जे काय चाललय ते चाललय. 

पण आईनस्टाईन देखील शेअर मार्केटमध्ये गंडलेले. यापूर्वी न्यूटन देखील शेअर मार्केटमध्ये गंडलेला ते आम्ही सांगितलच आहे. आत्ताचा मुद्दा आहे आईनस्टाईनचा.. 

तर झालेलं अस की,

1921 सालचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार अल्बर्ट आईनस्टाईन यांना जाहीर झालेला. या पुरस्काराची तत्कालीन रक्कम 1,21,572.54 SWIDISH KORNO इतकी होती. आज एक स्वीडीश KRONA म्हणजे जवळपास 9 रुपये झाले.

तेव्हाची रक्कम काढायची तर आजचे १० लाख ९४ हजार ते पण 1921 सालचे. ही रक्कम आपल्यासाठीच नाही तर आईनस्टाईनसाठी देखील लय होती. म्हणजे अस सांगितल जात की, आईनस्टाईन यांच्या गेल्या 12 वर्षातील उत्पन्नाएवढी ही रक्कम होती.

साहजिक पुरस्कार तर मिळालेला पण महत्वाचा प्रश्न होता पैसा कुठे गुंतवायचा..? 

अशा वेळी आईनस्टाईनसमोर पर्याय होता तो शेअर मार्केटचा. त्या काळात अमेरिकेची इकॉनॉमी जोरात उसळी घेत होते. US च्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत होते. याचाच फायदा घेवून आपण देखील पैसे शेअरमार्केटमध्ये लावण्याचा निर्णय आईनस्टाईनने घेतला. 

आत्ता झालेलं अस की,

शेअर मार्केटचा अभ्यास असणारे हूशार लोक व्यवस्थित स्टॉक मार्केटचा अभ्यास करुन पैसे लावत होते. मात्र यात असेही कार्यकर्ते होते जे फक्त चांगला रिटर्न मिळतोय म्हणून पैसे लावत होते. त्यांना शेअर मार्केटची एकंदरीत समज नव्हती.. 

दुर्देवाने आपले आईनस्टाईन देखील त्यातलेच एक होते. ते कंपनीचे एकूण व्हॅल्यूएशन, कंपनीचा फरफॉर्मन्स अशा गोष्टी न पाहता फक्त वाढती शेअर्स प्राईज पाहत होते. याच तत्वाने वाढणाऱ्या शेअर्सचा अंदाज घेवून काहीही माहिती नसताना त्यांना शेअर्समार्केटमध्ये आपल्या पुरस्कारातील मोठ्ठी रक्कम गुंतवली. 

त्यानंतर आला १९२९ चा काळ.

अमेरिकेच्या इतिहासात हा काळ मंदीचा काळ अथवा ग्रेट डिप्रेशन म्हणून ओळखला जातो. यापूर्वीच्या पाच सात वर्षांमध्ये शेअरमार्केटचा बुम झालेला होता. म्हणजे कंपन्यांचे शेअर्स कंपनीच्या एकूण व्हॅल्यूएशनपेक्षा जोरात वर गेलेले होते. 

शेअर मार्केटचा अभ्यास असणाऱ्या मित्रमंडळांनी वेळीच सावध होत आपले पैसे काढण्यास सुरवात केली. १९२९ पासून मार्केट कोसळण्यास सुरवात झाली ती पुढच्या वर्षभराच्या काळात मार्केट ८० टक्यांपर्यन्त कोसळलं होतं… 

झालं आईनस्टाईन यांचा इथेच पोपट झाला. शेअर मार्केटच्या दुनियेत ते सर्वसामान्यच होते. त्यांची देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बुडाली, पण या गोष्टीने शेअर्स मार्केटच्या दुनियेत एक इतिहास झाला. इतिहास काय होता तर इथे आईनस्टाईनपण गंडू शकतो… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.