जगातला सगळ्यात डोकेबाज माणूस न्यूटनलाही शेयर मार्केटमध्ये चुना लागला होता!

शेयर बाजाराचा अभ्यास करणाऱ्या मित्राने “याला लै डोकं लागतं” असं सांगून फुशारक्या मारल्या असणार तुमच्यासमोर…. त्याला हा किस्सा नक्की सांगा. जगात सगळ्यात हुशार माणसांमध्ये नाव घेतलं जातं न्यूटनचं. जग त्याच्यासाठी उघड्या पुस्तकासारखं होतं असं म्हणतात.

एवढ्या डोकेबाज माणसाने कितीक आकडेमोडी करून नवींनवीन फंडे शोधून काढले. आता या माणसाने अभ्यास करून रोज मनीकंट्रोल बनवून शेयरमार्केटवर राज्य केलं असतं…

पण हा माणूससुद्धा आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेचा वापर करून शेयर मार्केटमध्ये आपलं नाव करू शकला नव्हता.

बेंजामिन ग्रॅहम यांनी आपल्या “इंटेलिजंट इन्व्हेस्टर” पुस्तकात हा किस्सा सविस्तर छापला आहे. १७२० सालच्या नवीन वर्षात साऊथ सी कंपनीमध्ये न्यूटनने काही शेयर्स विकत घेतले होते. हा स्टॉक मार्केट इंग्लंडमधील सगळ्यात जास्त परतावा देणारा स्टॊक होता.

या कंपनीची सुरुवात ब्रिटिश साम्राज्याची स्टॉक एजन्सी म्हणून झाली होती. जानेवारी १७११ साली पब्लिक आणि खाजगी अशा दोन्ही गुंतवणुकी एकत्र करण्यात आल्या होत्या. १७१३ मध्ये या कंपनीला दक्षिणेकडील समुद्रांमध्ये बेटांवर आफ्रिकन गुलाम पुरवण्यासाठी आणि दक्षिण अमेरिकेच्या बेटांवर व्यापार करण्यासाठी कंत्राट दिलं.

आता हि कंपनी एका नव्या खंडावर ताबा घेतेय म्हणून हिची ख्याती युरोपात पसरली. या कंपनीचा मार्केटमध्ये दबदबा निर्माण झाला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आपली कामे यात गुंतवली. स्पेनच्या आणि पोर्तुगालच्या स्पर्धेला तोंड देऊन इंग्रजांना हि कंपनी मोठी करायची होती. पण हे जनतेकडून सोयीस्कर रित्या लपवण्यात आलं होतं. त्यामुळं या कंपनीचा फुगा फुगत गेला होता. न्यूटनंही या प्रचाराला बळी पडला आणि त्याने आपले पैसे यात गुंतवले.

न्यूटनचे आजवरचे सगळ्यात प्रसिद्ध चरित्र ‘नेव्हर ऍट रेस्ट’ लिहिणाऱ्या रिचर्ड वेस्टफाल यांनीही या घटनेचा उल्लेख त्याच्या चरित्रात केला आहे.

१७२३ साली या कंपनीने चांदीचे मोठमोठे साठे आपल्यासोबत युरोपात परत आणले होते. त्यावर न्यूटनने बक्कळ नफा कमावला होता.

त्यामुळे नंतरच्या काळात न्यूटनला या कंपनीवर विश्वास बसला. तो इंग्लंडमधल्या रॉयल सोसायटी या संस्थेचा अध्यक्ष होता. यात शात्रज्ञांना प्राधान्य दिले जाई आणि विज्ञानावर चर्चा होत असत.

कॉन्फिडन्समध्ये माणूस अचानक जास्त स्टॉक घेऊन ‘नडू तेच्या’ म्हणून जसा पुढं घुसतो तसं न्यूटनने केलं. त्याने आपल्या सोसायटीचे मेम्बर आणि रोखे काढून यात गुंतवले.  सभासदांच्या पगारातली रक्कम काढून १५०० पौंड एवढी रक्कम त्याने या कंपणीच्या बॉण्डमध्ये गुंतवली.

कंपनीला स्पेनच्या विरुद्ध चक्क युद्ध उभारावं लागलं. त्याचे पैसे गुंतवणुकीतून घेण्यात आले. या युद्धात इंग्लंडच्या वाट्याला पराभव आला. याची कुणी कल्पनाच केली नव्हती कि एखाद्या जागतिक सत्तेचा असा दुर्दैवी शेवट होऊ शकेल.

अख्ख्या दक्षिण अमेरिका खंडातुन इंग्लंडला आपला गाशा गुंडाळावा लागला.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. न्यूटनला या गोष्टींचा अंदाजच नव्हता. त्याने आपला हिशोब चोख करून योजनेने पैसे बरोबर गुंतवले होते. पण शेयर बाजारची समीकरणे बदलावणाऱ्या इतक्या गोष्टी अस्तित्वात होत्या की त्या सगळ्यांचे गणित एकत्र लावणे  शक्य होईना.

“मी बाकीच्या ग्रहताऱ्यांविषयी ठामपणे सांगून भाष्य करू शकतो. पण शेयरमध्ये पैसे गुंतवत मार्केट वरखाली करणाऱ्या लोकांच्या मूर्खपणाचा अंदाज वर्तवू शकत नाही”

असं त्यानं ठामपणे सांगितलं.

त्याने पहिल्यांदा लावलेले बरेचसे पैसे बुडीतात गेले. त्यावर निघणाऱ्या १०० % नफ्याचा संपूर्ण भाग म्हणजे जवळपास ७००० पौंड एवढा पैसा गेला.

पण शेयर बाजाराची गम्मत हीचय. हा नाद एवढा जालीम आहे कि माणूस आपोआप परत यांच्याकडे ओढला जातो. त्यामुळं मार्केटचा मोह एकदा झाला कि तो लवकर सुटता सुटत नाही. न्यूटनचंही असंच झालं आणि त्याला परत हा मोह सुटला. मार्केटमध्ये अचानक तेजी येऊ लागली. त्याने मागच्या वेळेपेक्षा जास्त पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला.

यावेळी आपण अधिक सावधगिरी बाळगून धंदा करू असं त्याला वाटलं. पण मार्केटचं चक्र परत फिरलं आणि त्याला या वेळी तब्बल २०,००० पौंडाचा फटका बसला. आजच्या हिशोबात ही किंमत ३५ लाख डॉलर्सच्या आसपास जाते. म्हणजे जवळपास २५ कोटी रुपये!

एवढाच नाय, सोसायटीच्या सदस्यांनी न्यूटनला आपले पैसे परत मागितले. त्याने गुंतवलेल्या पैशातले फक्त काही पौंड त्याला परत आले होते. उरलेले ६०० पौंड त्याला आपल्या पदरचे स्वतःच्या कमाईमधून द्यावे लागले होते.

हा घोटाळा साऊथ सी बबल (बुडबुडा) म्हणून गाजला. अशा गोष्टी परत होऊ नयेत म्हणून सरकारने नवनवीन कायदे केले.

आणि न्युटननेही यातून धडा घेऊन परत स्टॉकचा नाद केला नाही. आपल्या पुढच्या आयुष्यात त्याने इतर कुणाला स्वतःच्या जवळपास “साऊथ सी कंपनी” हा शब्दसुद्धा उच्चरून दिला नाही असं म्हणतात.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.