सरकारने त्या दिवशी प्रोटोकॉल बाजूला सारला असता तर राज कपूरचा जीव वाचला असता..?

शो मॅन राज कपूर. कपूर घराण्याला बॉलिवूडचा बादशहा करण्यात जितका वाटा पृथ्वीराज कपूर यांचा आहे त्याहून कदाचित जास्त वाटा राज कपूर यांचा आहे अस म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.  मात्र राज कपूर यांच निधन झालं ते वय होतं ६३ वर्ष.

अस्थमा म्हणजेच दम्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी त्यामागे सरकारी नियम आणि प्रोटोकॉल देखील कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत.

झालेलं अस की तेव्हा राज कपूर दम्याच्या आजाराने त्रस्त होते. याच काळात ते त्यांच्या आयुष्यातला शेवटचा पिक्चर हिना शूट करत होते. तर दूसरीकडे राज कपूर यांना सरकारने दादासाहेब फाळके अवॉर्ड घोषीत केला होता.

हा अवॉर्ड घेण्यासाठी राज कपूर आपल्या संपुर्ण कुटूंबासहित दिल्लीत पोहचले. दिल्लीत आल्यानंतर त्यांच्या दम्याच्या आजाराने डोकं वर काढलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नेहमीच सोबत ऑक्सिजन सिलेंडर बाळगण्याचा सल्ला दिला.

थोडक्यात तुम्ही कुठेही जात असला तर सोबत ऑक्सिजन सिलेंडर बाळगा असा डॉक्टरांचा सल्ला होता.

दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी जाण्याची वेळ आली तेव्हा देखील त्यांनी हा ऑक्सिजन सिलेंडर आपल्या सोबत ठेवला.

मात्र राष्ट्रपती भवनच्या बाहेर असणाऱ्या सिक्युरिटीने त्यांना ऑक्सिजन सिलेंडरसहीत प्रवेश नाकारला. राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा विचार करता असा ऑक्सिजन सिलेंडर आत घेवून जाणं शक्य नव्हतं. शिवाय ते सरकारी प्रोटोकॉलला धरून नसल्याचं सांगण्यात आलं.

अखेर आपला ऑक्सिजन सिलेंडर बाहेर सोडूनच ते राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झाले.

दादासाहेब फाळके पुरस्कार समारंभास सुरवात झाली. इकडे पहिल्या लाईनमध्ये बसलेले राज कपूर अस्वस्थ झाले. राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या भाषणाच्या दरम्यान राज कपूर यांना दम्याचा अटॅक आला. अशातच राष्ट्रपती स्टेजवरून खाली आले व त्यांना त्या अवस्थेतही दादा साहेब फाळके अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आलं…

पण तोपर्यन्त न ऑक्सिजन सिलेंडर मिळाला न अन्य कोणत्या सुविधा…

त्यानंतर राज कपूर यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, काही दिवस उपचार सुरू राहिले पण यातच २ जून १९८८ साली त्यांच निधन झालं. या कार्यक्रमात सरकारने प्रोटोकॉल बाजूला सारून राज कपूर यांना ऑक्सिजन सिलेंडर सोबत बाळगण्याची परवानगी दिली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.