म्हणून राज कपूरच्या मुलीला सून करून घ्यायची इंदिरा गांधींची इच्छा होती…

ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा भारतातून ब्रिटीश जावून भारत सेट झालेला. वेगवेगळी घराणे वेगवेगळ्या क्षेत्रात सेट झालेली.

अशा काळात भारतातल्या टॉपच्या दोन क्षेत्रात दोन घराण्यांच निर्विवाद वर्चस्व होतं.

या वर्चस्वला धक्का देण्याचं स्वप्न देखील कोणाला पडू शकत नव्हतं अशी त्यांची हवा होती. पहिलं क्षेत्र होतं राजकारणाच. इथे इंदिरा मिन्स इंडिया आणि इंडिया मिन्स इंदिरा अस म्हणणाऱ्यांची संख्या मोठ्ठी होती. दूसरं क्षेत्र होतं सिनेमाचं. इथे कपूर घराण्याची निर्विवाद सत्ता होती. शो मॅन राजकपूर यांचा बोलबाला होता.

विचार करा नातेसंबंधात ही दोन घराणे जवळ आली असती तर, आत्ता या गोष्टीचं विशेष अप्रुप वाटणार नाही पण ज्या काळात सिनेमा आणि राजकारण हे दोनच घटक मनोरंजन करण्यासाठी उपलब्ध होते त्या काळात या दोन घराण्यांची जवळीक होणं म्हणजे भारताच्या इतिहासाला वेगळं वळण देणारं देखील ठरलं असतं हे देखील खरं..

असो लय लांबड न लावता मुद्द्याला हात घालूया…

इंदिरा गांधींच्या मनात हीच इच्छा होती. हा सर्व घटनाक्रम रशीद किडवई यांनी नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकात मांडला आहे. यात अस सांगण्यात आलं आहे की,

राजकपूर यांच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्याची तयारी इंदिरा गांधींनी केली होती…

कपूर घराणं आणि गांधी घराणं याचं आपआपसात चांगल जमायचं. तस सत्तेत असणाऱ्या सगळ्यांसोबत जमवून घेणं भाग असत अस तुम्ही म्हणाल म्हणून तुम्हाला खालील लिंकवरील स्टोरी वाचायला हवी..

जेव्हा देशात जनता पक्ष सत्तेत होता आणि इंदिरा गांधींना सभेसाठी साधा हॉल मिळू शकत नव्हता तेव्हा राजकपूरने संपुर्ण बॉलिवूडला इंदिरा गांधींच्या मागे उभा केलेलं

असो, या पुस्तकात सांगण्यात आलं आहे की इंदिरा गांधी कपूर घराण्याचा सन्मान करत असत. त्यांच्या मनात कपूर घराण्याबद्दल आदर होता. हे संबंध फक्त मित्रत्वाचे राहू नयेत म्हणून राज कपूर यांची मुलगी ऋतू यांना आपली सून करण्याचा त्यांनी निश्चय केलेला. राजीव गांधी आणि ऋतू कपूर यांच लग्न लावून देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं.

पण झालं अस की मध्येच या फोटोने इतिहासाला वेगळं वळण दिलं…

Screenshot 2021 03 08 at 1.12.36 PM

इंग्लडच्या केब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेले राजीव गांधी एन्टोनिया मायनोच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाच्या निर्णयामुळे इंदिरांची इच्छा अपूर्ण राहिली. एन्टोनिया मायनो सासरी येवून सोनिया गांधी झाल्या. १९६८ साली राजीव गांधींनी लगीनगाठ बांधल्यानंतर आत्ता वेळ न दडवता पुढच्याच वर्षी म्हणजे १९६९ साली ऋतू कपूर यांनी राजन नंदा यांच्याशी लग्न केलं.

आत्ता हा न घडलेला इतिहास पुन्हा घडण्याची चिन्ह दिसू लागली ती करिना कपूरच्या एका मुलाखतीनंतर..

सिमी गैरेवाल यांच्यासोबतच्या मुलाखतीत करिना कपूरने राहूल गांधी आपली पसंद असल्याचं सांगितलं आणि चर्चा सुरू झाल्या. करिना कपूरला विचारण्यात आलं होतं की तिला कोणासोबत डेटला जायला आवडेल तेव्हा तिने राहूल गांधींच नाव सांगितलं.

२००२ साली यावर खूप चर्चा झाली. पुढे करिनाने सैफ अली खान सोबत लगीन केलं, भूतकाळाप्रमाणे करिनाचं उरकल्या उरकल्या राहूल गांधींच वर्षाभरात व्हायला पाहीजे होतं पण तस झालं नाही. हा इतिहास काय घडला नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.