गिरणी कामगारांवर गोळी चालवणार नाही म्हणत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने राजीनामा दिला होता.

एकोणीशे साठच दशक. मराठी माणसाने भांडून आपल्या हक्काच्या मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली होती. यशवंतराव चव्हाणांनी सहकारातून राज्याच्या विकासाचा पाया रचला होता. राज्याचं चित्र झपाट्याने बदलू लागलं होतं.

मुंबई वेगाने वाढत चालली होती. लाखो लोक रोजगाराच्या आशेने या मायानगरीची वाट पकडत होते. लोकसंख्या अफाट वाढली होती. कित्येक मराठी तरुण गिरणीत कामाला होते. पण महाराष्ट्राच्या निर्मितीच्या पूर्वीपासून इथल्या कापड उद्योगावर व एकूणच अर्थकारणावर गुजराती उद्योगपतींचं वर्चस्व होतं.

त्यांना आता कापड गिरण्या चालवण्यापेक्षा त्या सोन्याच्या किंमतीने विकून पैसे कमावण्यात रस होता.

यातूनच गिरणी मालक व तिथले कामगार यांच्यात संघर्ष वाढू लागला होता. कामगारांना त्यांच्या हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरावं लागत होतं. मराठी तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरू लागला होता. त्यांच्या आवाजाला वाचा फोडणाऱ्या शिवसेनेचा जन्म देखील याच काळातला. मोठमोठ्या कारखान्याचे कंपन्यांचे मालक आपल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत होते.

याच काळात मुंबईमध्ये कामगार चळवळीत जॉर्ज फर्नांडिस यांच्या सारख्या तडकभडक नेत्याचा उदय झाला होता. त्यांना बंद सम्राट असं म्हटलं जायचं. जॉर्ज यांच्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद पडायची. हजारो कामगार रस्त्यावर उतरायचे. आपल्या मागण्या लढून मान्य करून घेतल्या जायच्या.

तेव्हा मुंबई काँग्रेस स.का.पाटील यांच्या हातात होती. स.का.पाटील हे भांडवलशाही विचारांचे होते. मोरारजी देसाई, स.का.पाटील व इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये गिरणी मालकांचे धार्जिणे म्हणून ओळखलं जायचं. याच स.का.पाटलांनी एकेकाळी मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही अशी वलग्ना केली होती.

स.का.पाटलांचे काँग्रेस मधल्या समाजवादी विचारांचे समजल्या जात असणाऱ्या नेत्यांशी पटायचं नाही. विशेषतः यशवंतरावांमुळे महाराष्ट्राच्या सत्तेवर पकड मिळवलेल्या ग्रामीण नेतृत्वासोबत त्यांचा संघर्ष सुरु असायचा.

मुंबईत एकदा गिरणी कामगारांचं मोठं आंदोलन सुरु झालं. जॉर्ज फर्नांडिस यांनी बंद पुकारला. आंदोलन भलतंच चिघळलं होतं. गिरणी मालकांच्या लॉबीचा सरकारवर दबाव होता की हे आंदोलन दडपून टाकलं जावं.

त्याकाळात मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि गृहमंत्री होते पाटणचे बाळासाहेब देसाई.

बाळासाहेब देसाई म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असणारे नेते. यशवंतराव पहिल्यांदा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले होते, महाराष्ट्राचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांना ओळखलं गेलं. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत थेट मोरारजी देसाई यांच्या सारख्या तगड्या नेत्याशी भांडून महाराष्ट्राला न्याय मिळवून देणारा नेता म्हणून बाळासाहेबांना ओळखलं जायचं.

वसंतराव नाईक यांच्या ऐवजी त्यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होईल अशी चर्चा होती पण विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळावा म्हणून यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्याकडे शब्द टाकला व बाळासाहेब देसाईंनी पडती बाजू घेत गृह मंत्रिपद स्वीकारलं.

बाळासाहेब देसाई आक्रमक होते. सर्वसामान्य जनते बद्दल त्यांना कळवळा होता. गिरणी कामगारांची बाजू त्यांना पटत होती पण कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणे देखील गरजेचे होते. जेव्हा कामगार नेत्यांनी बंद पुकारला तेव्हा त्यांनी हा बंद बेकायदेशीर आहे व तो पाळू नका असे आवाहन केले.

पण कामगारांनी तरीही मोर्चा काढला. या मोर्चाला विराट गर्दी झाली. गिरणी मालकांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. कडक पोलीस बंदोबस्त होता पण तरीही आंदोलनाला हिंसक वळण लागले. जोरदार दगडफेक सुरु झाली. आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले होते, पोलीस शर्थीने ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते.

अचानक बाळासाहेब देसाईंना वरून आदेश आला की आंदोलन दडपण्यासाठी कामगारांवर गोळीबाराचे आदेश द्या.

गृहमंत्र्यांनी याला थेट नकार कळवला. त्यामुळे संतापलेल्या मुंबई काँग्रेसने त्यांच्याविषयीची नापसंती दर्शविणारा ठराव केला. भडक स्वभावाच्या बाळासाहेब देसाईंना क्रोध अनावर झाला. कितीही झालं तरी आंदोलक हे आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणे अमानुष आहे हे बाळासाहेबांचं मत होतं. त्यांनी याच तिरमिरीत येऊन मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवून दिला आणि गाडीत बसून पाटणला निघाले देखील.

महाराष्ट्राचा गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतो हा मोठा राजकीय भूकंप होता.

बाळासाहेब देसाई यांच्या पाठोपाठ होमी तल्यारखान आणि कैलास या मंत्र्यांनी देखील आपले राजीनामे वसंतराव नाईकांकडे सोपवले. दुसरा एखादा मुख्यमंत्री असता तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली असती.

वसंतराव नाईक प्रचंड हुशार होते, शांत डोक्याने आणीबाणीची परिस्थिती हाताळायची ताकद त्यांच्या कडे होती. त्यांनी स.का.पाटलांची भेट घेतली, त्यांना या मंत्र्यांची समजूत काढण्यास भाग पाडलं. तल्यारखान व कैलास यांनी आपले राजीनामे मागे घेतले. पण बाळासाहेब देसाई आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

अखेर वसंतराव नाईक यांनी त्यांना गृह मंत्रालयाच्या ऐवजी महसूल मंत्री पद स्वीकारायला राजी केले. आजही जेव्हा शेतकरी आंदोलनापासून ते विद्यार्थी आंदोलनापर्यंत चळवळी होतात, सरकार ते दडपण्यासाठी पोलिसांना खुले आदेश देते तेव्हा आंदोलकांवर गोळीबार करणार नाही म्हणत राजीनामा देणार्या या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची नक्की आठवण येते.

संदर्भ- सुरेश द्वादशीवार लोकराज्य 

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.