राजकीय नेत्यांचे बुरखाहरण : श्री. बाळासाहेब देसाई 

रा.तु पाटील (तडसरकर) यांचे “बुरखा हरण राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे” या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जून १९८८ साली प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तकामध्ये तत्कालीन परिस्थित प.महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांबद्दल तटस्थपणे लिहण्यात आले आहे. हेच लेख आम्ही क्रमाक्रमाने आपणासमोर देत आहोत.

पैकी या लेखमालिकेतील पहिला लेख श्री. बाळासाहेब देसाई

एक कर्तबगार नेता व प्रशासक 

श्री बाळासाहेब देसाई हे एक कर्तबगार लोकप्रिय नेते होऊन गेले. अगदी देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्व संधेवर सुद्धा त्यांच्याजवळ स्वातंत्र्य लढ्यातील पुण्याईचे छोटेसे गाठोडे नसता उलट  ऐन स्वातंत्र्य लढ्याच्या काळातच  ब्रिटीश सरकारने त्यांना रावसाहेब पदवी देऊ केल्याने व इतर अनेक गैर समजामुळे त्यांची बाजू लंगडी असतानाही  १९४१ व ४६ असे दोन वेळा म्हणजे सलग अकरा वर्षे ते सातारा जिल्हा बोर्डाचे कार्यक्षम अध्यक्ष म्हणून काम केले महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात शिक्षण, शेती, बांधकाम व शेवटी गृह या महत्वाच्या खात्याचे सर्वकाळ कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले श्री वसंतराव नाईक यांच्या नंतर तेच मुख्यमंत्री होणार अशा बातम्या पसरत होत्या. या सर्वांस बाळासाहेबांची हुषारी कर्तबगारी तर कारणीभूत होतीच. पण शिवाय जुन्या संस्थानी राजवटीबद्दल सरंजामशाहीबद्दल अभिमान बाळगणाऱ्या घरंदाज म्हणविल्या जाणाऱ्या वजनदार मराठा जातीच्या राजकारण्यांना तशी स्वप्ने पडत होती. पण घडले विपरीतच. 

दरबारी रुबाबाची आवड 

तसे पाहिले तर पाटण तालुक्यातील मरळी या छोट्या गावातील देसाई घराणे मोठ्या सरंजामीत मोडत नव्हते. व्यक्तिशा बाळासाहेबांचे बालपण तर सावत्र आईच्या जाचात व गरिबीत गेले. शिक्षणासाठी विहे या आजोळ गावचा व नंतर कोल्हापूर मधील विद्यार्थी वसतीगृहाचा त्याना आसरा घ्यावा लागला पण स्वत: बाळासाहेब खानदानीचे मोठे अभिमानी व पुरस्कर्ते. कोल्हापूरमध्ये राहून त्यांनी शिक्षणापेक्षा खानदानीचे धडेच अधिक घेतले व कोल्हापूर संस्थानाचे मात्र जगद् गुरू यांच्या पुतणीशी विवाह झाल्याने कोल्हापूर संस्थानातील सरंजामदाराशी अधिकच संपर्क लाभला. 

यशवंतराव चव्हाण यांचा खंबीर  वरदहस्त 

बाळासाहेब हुषार होते वकील म्हणून कराड, पाटण, सातारा येथे चांगले काम केले. पण महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन १९४१ साली ते जिल्हाबोर्डाचे सदस्य झाले. व त्याच तालुक्यातील कुंभार गावचे एक हुषार वकील श्री आनंदराव चव्हाण यांचेशी चुरशीचा सामना होऊन बाळासाहेब जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष बनले.

आनंदरावांनी जिल्हाच सोडला केवळ जुन्या कूपरशाहीतील मंडळीनी आनंदरावांना पाठींबा दिला म्हणून दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीप्रमाणे आम्ही तरुण कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना अध्यक्षपदी येण्यासाठी मदत केली. असे यशवंतराव आत्मचरित्रात म्हणतात काय असेल ते असो. स्वातंत्र्य लढा संपल्यानंतर झालेल्या ४६ सालच्या निवडणूकीतही यशवंतरावांनी आपली सारी पुण्याई खर्च करुन वसंतराव दादा, किसनवीर व इतर वजनदार मित्रांच्या मदतीने पुन्हा बाळासाहेबांनाच अध्यक्षपदी बसवले. 

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील कामगिरी 

स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या १९५२ च्या पहिल्या विधानसभा निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर उभे राहिलेल्या आनंदराव चव्हाण यांना चुरशीच्या सामन्यात अवघ्या सातशे मतांनी पराभूत करुन बाळासाहेब आमदार झाले. पण त्यांना १९५७ पर्यन्त मंत्रीमंडळात मोरारजीभाईंनी प्रवेश दिला नाही यशवंतरावांनी मात्र महाद्विभाषिकांचे व नंतर नवोदित संयुक्त महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात बाळासाहेबांना प्रथम शिक्षण मंत्री व नंतर शेतीमंत्री केले. रेंगाळत पडलेले कोयनाधरण योजनेचे काम वेगाने पार पाडण्यासाठी नंतर बांधकाम खाते मिळाले. तेव्हा बाळासाहेबांनी कर्तबगारीची चुणूक दाखवलिच शेवटी गृहमंत्री झाल्यावर शांतता व सुव्यवस्थाही चांगली ठेवली. 

आढ्या बरोबर घराचे वासेही फिरले 

नोव्हेंबर ६२ मध्ये पं. नेहरूंच्या बोलावण्यावरून यशवंतराव संरक्षणखाते सांभाळण्यासाठी दिल्लीला गेले पण आपल्या मागून पश्चिम महाराष्ट्र अगर कोकणातील वजनदार मराठा मंत्री आपल्या नेतृत्वास मागेपुढे शह देईल म्हणून यशवंतरावांनी अगोदर कन्नमवार व नंतर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले नंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, ते यशवंतरावांच्या इच्छेने नव्हेतर त्यांच्या इच्छेविरुद्ध इंदिराजींच्या हेक्याने. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा मराठाच व्हायला हवा या लोकांच्या भाबड्या समजूती प्रमाणे बाळासाहेब देसाई, पी.के.सावंत, राजारामबापू, यशवंतराव मोहिते वगैरे मराठा नेते चातकाप्रमाणे संधीची वाट पहात होते पण ? 

बाळासाहेबांचे दोष उशीरा दिसू लागले 

वर सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब देसाई स्वातंत्र्य लढ्यापासून अलिप्त होते. सलग अकरा वर्षे जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निरांकुशपणे सत्ता चालिवताना अगदी देव माणसाप्रमाणे वागले नसतील त्यांना म्हणे निशापाणी करण्याचे व्यसन होते. विरोधकांनी हे कोलीत वापरण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन पाहिला होता. आज काल त्या दोषांपासून दहावीस टक्के कॉंग्रेसवाले तरी अलिप्त असतील का नाही याची शंका आहे. पण कानामागून येऊन तिखट झालेले नाका पेक्षा मोती जड  ठरलेल्या बाळासाहेब देसायांना केवळ आता आपल्या कह्यात राहणार नाहित. दिल्ली पर्यन्त संधान बांधून आपला हेतू साध्य करु शकतील असे दिसू लागताच १९७८ च्या निवडणूकीपूर्वीच ७७ साली त्यांना मंत्रीमंडळाचा राजीनामा देऊन बाहेर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली. 

जनतापक्षात प्रवेश काही तासातच परत स्वगृही 

राजारामबापू एक दिवस कॉंग्रेस पक्ष सोडून जनतापक्षात आले होतेच आता खुद्द एस एम जोशींनी एक दिवसभर बाळासाहेबांच्या खनपटीस बसून काही प्रलोभन दाखवून कॉंग्रेस सोडून जनतापक्षात प्रवेश केल्याचे त्यांच्या तोंडून वदविले. म्हातारपणाचा हा नवा घरोबा उपयोगी पडणार नाही पश्चाताप करण्याची पाळी यायला नको म्हणून दुसऱ्याच दिवशी आपला निर्णय बदलल्याचे जाहिर केले. 

शेवट पर्यन्त चिकाटी 

बाळासाहेब मंत्रीमंडळातून बाहेर पडले तरी त्यांचे नेतृत्व उघडे पडले नाही ६७ सालच्या भूकंपात साऱ्या पाटण तालुक्याच्या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी  तातडीने धावत येवून महिनाभर व नंतर वरचेवर त्यांनी तालुका ठिय्या दिला होता. आपादग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन केले. मुंबई व साऱ्या भारतातून परदेशातूनही मदतीचा ओघ सुरू केला ती जाणीव लोकांना होतीच. प्रत्येक गावातील कुटूंबापर्यन्त नोकऱ्या उद्योग धंदे वगैरे मार्गांनी मदतीचा हात पोचला होता. मरळीचा साखर कारखाना इतर लहान मोठे उद्योगधंदे, रस्ते, पुल, धरणे, पाठबंधारे वगैरे साठी महाराष्ट्राच्या खजीन्यातील मोठा भाग बाळासाहेबांनी पाटणकडे वळवला होता. 

तिकडे जनता पक्षाचे सरकार जाऊन दिल्लीला पुन्हा इंदिराजींचे सरकार आले यशवंतराव सर्व इर्ष्या सोडून देऊन स्वगृही परतले अशा घडीघडीला बदलत्या राजकारणात काही तरी चमत्कार घडेल अशी आशा बाळासाहेबांनी उराशी बाळगली असावी त्यांनी १९७८ साली व नंतर ८० सालीही विधान सभेचे तिकीट मागितले ते मिळाले व निवडून आलेही. थोडे दिवस ते विधान सभेचे सभापती सुद्धा होते पण पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. 

शिवाय वय झालेलेल रक्त दाबासारख्या अनेक व्याधी उपाधींनी उचल खाल्ली होती ८० साली वास्तविक त्यांनी उभे राहायला नको होते कारण गावोगाव रखडत जाऊन लोकांना उपकाराला जागण्याचे आवाहन करुन ही अगदी थोड्या चारपाच हजार मतांनी ते विजयी झाले. व त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत मरळी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या चिरंजीवांना श्री शिवाजीराव देसाईंना सर्व कॉंग्रेसवाल्याने कट करुन पराभूत केले ८५ च्या निवडणूकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. 

अशा प्रकारे एका समर्थ हुषार नेतृत्वाचा शेवट (लोकांच्या नव्हे) खुद्द बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून चांगला झाला नाही. 

  •  लेखक : रा.तु.पाटील (तडसरकर) १९८८

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.