मुंबईचे पोलिस आयुक्त आणि वाद संपत नाहीत….

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांची गाडी, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना एनआयएने केलेली अटक या सगळ्या कारणांमुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती.

अखेर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून परमबीर सिंग यांच्या बदलीची घोषणा केली.

मात्र मुंबईचे पोलिस आयुक्त आणि वाद हे न संपणार समीकरण असल्याचं आता पर्यंत दिसून आलं आहे. मागच्या १० वर्षातील जरी उदाहरणं बघितलं तरी वादातून बदली झाल्याले किंवा राजीनामा द्यायला लागलेल्या आयुक्तांमध्ये परमबीर सिंग यांचा चौथा नंबर लागतो. याआधी देखील ३ पोलीस आयुक्तांशी वादाचा संबंध आला होता.

अरुप पटनाईक 

मुळचे ओडिसाचे असलेले अरुप पटनाईक हे १९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. प्रदीर्घ सेवेनंतर संजीव दयाळ यांच्याजागी १ मार्च २०११ रोजी त्यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्त करण्यात आलं होतं.

मात्र त्यानंतर अवघ्या दीड वर्षातच त्यांना हटवण्यात आलं होतं. ११ ऑगस्ट २०१२ रोजी रजा अकदमीच्या सभेनंतर आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स भागात हिंसक घटना झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांवर हल्ले झाले. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवरही त्यांचा परिणाम झाला.

त्यानंतर त्यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे तत्कालीन अध्यक्ष राज पुरोहित यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील आणि मुंबई पुलिस आयुक्त अरुप पटनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

त्यावर उद्धव ठाकरे यांनी इशारा देत दोघांनी राजीनामा न दिल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असं म्हंटलं होता. तर २१ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी गिरगांव चौपाटी ते आझाद मैदान असा प्रत्यक्ष मोर्चा देखील काढला होता.

अखेरीस २२ ऑगस्ट रोजी आर. आर. पाटील यांनी पटनाईक यांच्या बदलीची घोषणा करत त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्त केलं होतं. 

डॉ. सत्यपाल सिंग 

अरुप पटनाईक यांच्या जागी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून १९८० च्या बॅचच्या डॉ. सत्यपाल सिंग यांना आणण्यात आलं. २३ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांनी पोलिस आयुक्त म्हणून सूत्र स्वीकारली होती. त्यानंतर पुढच्या दिड वर्षातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

याला २ कारण सांगितली गेली. एक तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार होती.

मात्र दुसरं कारण हे वादच होतं. त्याच झालेलं असं कि, सत्यपाल सिंग यांना राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून बढती मिळणार होती. नियत वेळेनुसार त्यांच्या पदोन्नतीची फाईल एप्रिल २०१३ पर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मिळणं अपेक्षित होतं. पण ती त्यांना तब्बल ५ महिने उशिरा म्हणजे ३० सप्टेंबर २०१३ रोजी मिळाली. 

त्यावेळी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात आयपीएस अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीमध्ये एकवाक्यता येत नव्हती, त्यातूनच सत्यपाल सिंग यांच्या पदोन्नतीच्या फाईलला उशीर झाला.

यावरून त्यावेळी आर. आर. पाटील यांच्यावर विरोधी पक्षांनी टिका देखील केली होती. मात्र अखेरीस हा सगळा वाद ३१ जानेवारी २०१४ रोजी सत्यपाल सिंग यांच्या राजीनाम्यानंतर शांत झाला. 

राकेश मारिया  

डॉ. सत्यपाल सिंग यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांना आणण्यात आलं. १६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली होती.

मात्र दीड वर्षाच्या आताच त्यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली. पण त्यामागे कारण वादाचं होतं, असं खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

तो वाद होता शीना बोरा हत्याकांड.

ऑगस्ट २०१५ मध्ये पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खार पोलिसांच्या टीमने अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी श्यामवर राय नावाच्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक केली. त्याच्याकडून २०१२ मध्ये गायब झालेल्या शीना बोरा हिच्या हत्येची माहिती मिळाली.

त्यानंतर राकेश मारिया यांनी हे प्रकरण स्वतः तपासासाठी हातात घेतलं. 

श्यामने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली. या दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया खार पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन आरोपींची चौकशी आणि तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. या प्रकरणी होणाऱ्या चौकशीवर राकेश मारिया यांचं बारीक लक्ष होतं.

मात्र खुनाच्या प्रकरणाच्या चौकशीवर मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जातीने लक्ष का घालत आहेत? या प्रकरणी मारिया स्वत: इतका रस का घेत आहेत, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आले.

पुढे अवघ्या काही दिवसातच म्हणजे ८ सप्टेंबर २०१५ रोजी याच वादामुळे त्यांची तडकाफडकी बदली झाली.

पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,

तपास अधिकाऱ्यांनी तपास करावा, पोलीस आयुक्तांचं काम देखरेख करणं आहे, जर मारिया अनेकदा खार पोलीस स्टेशनला गेले नसते तरी चाललं असतं, या प्रकरणी वाद टाळण्यासाठी त्यांची उचलबांगडी केली होती.

परमबीर सिंग

राकेश मारिया यांच्या नंतर आलेल्या अहमद जावेद, दत्तात्रय पडसलगीकर, सुबोधकुमार जैस्वाल, संजय बर्वे यांची कारकीर्द कोणत्याही वादाशिवाय पार पडली. त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे २९ फेब्रुवारी २०२० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

मात्र यादरम्यान ते सातत्याने वादात सापडत गेले.

आधी पोलिस उपयुक्त्यांच्या बदल्या, त्यानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कथित टीआरपी घोटाळा, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण अशा अनेक वादात त्यांचं नाव गाजलं. 

त्यानंतर मागच्या महिन्यात २५ फेब्रुवारी २०२१ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी सापडली, सोबतच काही दिवसात या प्रकरणातील मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना एनआयएने केलेली अटक या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती.

अखेरीस परमबीर सिंग यांची बदली झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नवे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. संदीप चव्हाणके says

    भिडू,ते ठाकरे आणि सोनू निगम काय लफडे आहे ते सांग की ?

Leave A Reply

Your email address will not be published.