फाटक्या जीन्सला रफू करता येईल, पण फाटक्या तोंडाचं काय…?

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या महिलांच्या जीन्स वरच्या एका वक्तव्यानं चांगलेच वादात सापडलेत. विरोधी पक्ष आणि सामान्य लोकांकडून पण मुख्यमंत्र्यांवर टीका होतं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यांच्या या विधानानंतर कालपासून समाजमाध्यमांमध्ये #RippedJeansTwitter हा हॅश टॅग देखील ट्रेंडला आहे.

पण नेमका हा वाद आहे तरी काय? 

मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर रावत मंगळवारी उत्तराखंड राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात गेले होते. तिथं ते बोलताना म्हणाले,

फाटक्या जीन्स घालणाऱ्या महिला आपली मुलं आणि समाजाच्या समोर काय आदर्श ठेवतील.  जर या महिला लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी समाजात जातं असतात, तेव्हा आपण समाज आणि मुलांना नक्की कोणता संदेश देतो?

हे सगळं आपल्या घरातून सुरु होतं, जे आपण करतो त्याचंच अनुकरण मुलं करतात. ज्या मुलाला घरी चांगले संस्कार दिलेले असतील तो आयुष्यात किती जरी मॉडर्न झाला तरी ते फेल जाणार नाहीत. 

त्यावेळी त्यांनी त्यांचा एक किस्सा देखील ऐकवला. एका विमानात प्रवास करताना एक बहीण माझ्या शेजारी बसल्या होत्या. बोलणं झालं, आणि मी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तर पायात गम बूट होते, आणि वर बघितलं तर गुडघ्यात जीन्स फाटली होती. हातात कडे होते.

हे बघून मी त्यांना विचारलं कुठे जाणार आहे? तर म्हणाल्या दिल्ली. काय करता? तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं एनजीओ चालवते. मी त्यांना म्हंटलं, एनजीओ चालवतायं, उघडे गुडघे दाखवता, समाजात जाता तेव्हा काय संदेश आणि संस्कार देता?

मुख्यमंत्र्यांच्या याच मुद्द्यांवरून मोठा गदारोळ सुरु झाला, त्यावर चारी बाजुंनी जोरदार टीका सुरु झालीय. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

समाजवादी पक्षाच्या राज्यसभेमधील खासदार आणि जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन रावत यांच्या विधानावर चांगल्याच भडकल्या.

त्या म्हणाल्या, अशी विधान मुख्यमंत्र्यांना शोभा देतं नाहीत. ते ज्या पदावर बसले आहेत तिथून कोणताही विधान देण्यापूर्वी त्यांना आधी विचार करून आणि मगच आपलं मत मांडायला हवं.  कोणाचीही संस्कृती तुम्ही त्यांच्या कपड्यांवरून ठरवणं हा एक खूपच खालच्या पातळीवरचा विचार आहे, जो महिलांविरोधातील गुन्ह्यांना देखील प्रवृत्त करतो.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो ट्विट करुन त्यांचे गुडघे उघडे  असल्याचं म्हणाल्या. 

तर शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपला जीन्समधील फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांना विचार बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या या देशाच्या संस्कृतीवर आणि संस्कारांवर अशा पुरुषांमुळे परिणाम होतो जे महिलांना त्यांच्या निवडीवरून जज्ज करतात.

तर तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मुख्यमंत्र्यांचा विमानातील किस्सा ट्विट करतं, गुडघे दाखवणाऱ्या संघाकडे राज्य चालवायला दिल्यानंतर हे असं होतं. 

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर ‘बोल भिडू’ने काही मुलींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 

यावेळी पुण्याच्या एका महाविद्यालयात शिकणाऱ्या शिवानी पवार म्हणाली,

मुख्यमंत्री नक्की कोणत्या जमान्यात आहेत? कपड्यांवरून जर मुलींचे आणि महिलांचे संस्कार जर ठरवतं असतील तर त्यांनी खुशाल हिमालयात निघून जावं.  

तर सोलापूरमध्ये एका नामांकित कंपनीत काम करत असलेली ऐश्वर्या गाडे म्हणाली,

मुलींनी आणि महिलांनी कोणती कपडे घालायची हे ठरवणारे मुख्यमंत्री कोण? याआधी देखील गुजरातमध्ये जीन्स वर बंदीचा निर्णय आहे.

मला पक्षीय वादात जायचं नाही, मात्र फाटक्या जीन्सला रफू करता येईल, पण यांच्या फाटक्या तोंडचं काय…?

या चौफेर टीकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात आता त्यांच्या पत्नी पुढे आल्या आहेत. प्राध्यापक रश्मि त्यागी म्हणाल्या, 

मुख्यमंत्री ज्या संदर्भांतून हे सगळं बोलले ते बोलणं संपूर्ण दाखवलेलं नाही. ते म्हणाले होते समाज आणि देशाच्या निर्मितीमध्ये महिलांची भागीदारी महत्वाची आहे.

आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरेला वाचवणं आणि टिकवणं ही  महिलांची जबाबदारी आहे. आपली ओळख वाचवायला पाहिजे. आपल्या कपड्यांना वाचावा. मुख्यमंत्र्यांनी फाटक्या जीन्सची तुलना संस्कारांशी केली होती.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.