रमजानमध्ये कोरोना लस घेतली तर चालते का? मुस्लिम समाजासाठी फतवा जारी करण्यात आलाय..

भारतात आजपासून म्हणजेच १४ एप्रिलपासून रमजानचा महिना सुरु होणार आहे. इस्लाम धर्मात रमजान महिन्याला विशेष महत्व आहे. रमजान महिन्यात अल्लाहची इबादत करण्याबरोबरच मुस्लीम बांधव दान- धर्म करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार  नवव्या महिन्याला रमजान महिना  साजरी केला जातो.

मौलाना रजियुल इस्लाम नदवी इस्लामी यांच्या म्हणण्यानुसार इस्लाममध्ये रोज ठेवण्याची परंपरा दुसऱ्या  हिजरीमध्ये सुरु झाली.मौलाना खालिद रशीदी फिरंगी महली सोबतच अनेक मुस्लिम मौलवींनी घोषणा केली कि,

भारतात सोमवारी रमजानचा चंद्र निघाला नसल्याने मंगळवारी रात्री विशेष नमाज अदा केली जाईल, ज्याला तराबी  असं म्हंटल जात. त्यानंतर रमजान महिन्यास सुरुवात होते.

रमजान या पवित्र महिन्यात  मुस्लीम बांधव रोजा ठेवतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीच खात – पीत नाही. यासोबतच अनेक पथ्य पाळली जातात. जसं कि, संपूर्ण शरीरावर आणि नाडीवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. यासोबतच कोणासाठीही तोंडातून अपशब्द काढायचा नाही, आपल्या हाताने कोणाला इजा पोहोचवायची नाही आणि डोळ्यांनी कोणतीही चुकीची गोष्ट पाहायची नाही. एवढचं नाही तर शारीरिक संबंधही ठेवायचे नाहीत.

मात्र, या दरम्यान प्रश्न उपस्थित होतो कि, रमजानच्या महिन्यात रोजा दरम्यान कोरोना लस घेतली जाऊ शकते कि नाही ?

आता यावर दारुल उलूम फरंगी महल ने फतवा जारी केला आहे. झालं असं कि, मध्य प्रदेशातील भोपाळ येथील रहिवासी अब्दुर रशीद किदवई यांनी दारुल इफ्ता प्रश्न केला होता कि,

कोरोना संक्रमणासारखा भयंकर साथीचा आजार शिगेला पोहोचला आहे. यापासून बचावासाठी कोरोना विषाणूची पहिली लस घेतली आहे. त्याचबरोबर, दुसर्‍या लसीसाठी दिलेला कालावधी रमजानच्या महिन्यात आहे. आणि लस ही इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जाते. म्हणूनच, हे जाणून घ्यायचेय की, रोजाच्या वेळी लसीचा दुसरा डोस घेतला जाऊ शकतो का ?

इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया कडून जारी करण्यात आला फतवा …

या प्रश्नाचे उत्तर देताना, दारुल उलूम फिरंगी महलच्या इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाकडून फतवा जारी करण्यात आला. ज्यात  स्पष्टपणे सांगितलं गेलं की,

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यास रोजा तुटणार नाही. कोरोनाची लस मानवी शरीराच्या नसांतून प्रवेश करते ना कि पोटातून, त्यामुळे रोजा तुटत नाही. मुस्लिम बांधवांनी  केवळ रोजामुळे कोविड -१९ ची लस घेण्यास  उशीर करू नये. कोरोना महामारीपासून मुक्त होण्यासाठी लस जरूर घ्या.’

इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद यांच्यासह अनेक मौलवींनी  या फतव्यावर  सह्या केल्या आहेत.

दरम्यान,  मौलाना मिस्बाही यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम मानणाऱ्या  प्रत्येकाने  रोजा ठेवला पाहिजे . मात्र जे  आजारी आहेत किंवा प्रवास करतात त्यांनाच सूट देण्यात आली आहे. याशिवाय, ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना मासिक पाळी आहेत आणि लहान मुलांना रोजा ठेवण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यातही  आजारी असताना जर एखाद्याने रोजा ठेवलाच तर त्याला गोळ्या – औषध घेण्यास मनाई आहे, ती व्यक्ती सहरी आणि इफ्तार दरम्यान औषध  घेऊ शकते.

मुस्लिम समुदायातील अनेक व्यक्ती रोजा मध्ये कोरोना लस घेतली तर चालेल का या प्रश्नामुळे संभ्रमित झाले होते. पण दारुल उलूम फिरंगी महलच्या फतव्यामुळे सगळं शंका कुशंका दूर झाल्या आहेत व अनेक जण कोरोना लसीसाठी रांगा लावताना दिसत आहेत.

दारुल उल फिरंगी यांनी या पूर्वी देखील कोरोना काळात जनजागृती साठी अनेक फतवे जरी केले होते. मागच्या वर्षीच्या मार्च एप्रिलमध्ये जेव्हा कोरोनाचे संकट नुकतंच भारतात आले होते, तबलिगी जमातच्या मरकज मुळे देशभरात टीका होत होती तेव्हा मौलाना खालिद राशिद फिरंगी महली यांनी मुस्लिम समुदायाला कोरोना रोग लपवणे हा गुन्हा असल्याचं सांगत फतवा काढला होता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.