ट्रम्प तात्यांना टोचलेलं कोरोनावरचं औषध खरंच गुणकारी आहे का? भारतात कधी येणार?

मेड इन चायना वस्तु टिकतं नाही असं म्हणतात. पण कोरोनानं हा दावा खोडून काढला. वर्ष उलटून गेलं तरी अजून जायला तयार नाही. त्यामुळे अख्ख जग सध्या कोरोनावर काही तरी औषध शोधायच्या मागं आहे. तर कुठे लसीकरण करुन संक्रमण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. तर कुठे आणखी काही उपचार पद्धती शोधली जात आहे.

अशातच आता आणखी एका नवीन उपचार पद्धतीची भर पडणार आहे. ही पद्धत आहे

मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज

होय. आता कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज देखील वापरलं जाणं शक्य होणार आहे. अशा अँटीबॉडीज कोरोनाच्या स्पाइक प्रोटिनवर हल्ला करून व्हायरसला न्युट्रलाईज करू शकतात. हे अँटीबॉडी कॅसिरिविमॅब आणि इमडेविमॅबचे कॉकटेल (एकत्रित मिश्रण) आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अर्थात (CDSCO) ने नुकतचं रेजेनरॉन या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या विशिष्ट मोनोक्लोनल अँन्टीबॉडीजच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना उपचारादरम्यान ही पद्धत वापरण्यात आली होती.

सुरवातीला कोरोनाबद्दल अनेक विचित्र कमेंट करणारे डोनाल्ड ट्रम्प, कोरोना लाटेत केलेल्या कामामुळे त्यांचं अध्यक्षपद गेलं. पण त्याच ट्रम्प तात्यांना या मोनोक्लोनल अँटीबॉडीजनी वाचवलं. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला टोचलेले इंजेक्शन म्हणून ते उपाय खात्रीशीर म्हटले जातात.

पण त्या आधी हे मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज म्हणजे नेमकं काय काय ते सविस्तर..

मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज हे प्रयोगशाळा-निर्मित प्रथिने आहेत. हे शरीराच्या कोणत्याही भागास नुकसान न करता हा व्हायरस नष्ट करू शकतात. मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज सामान्यत: मनुष्याच्या अँन्टिबॉडी, उंदरांच्या पेशींचे अँटीबॉडी किंवा दोघांच्या संयोजनातुन क्लोनिंगद्वारे लॅबमध्ये तयार केले जातात.

एम्सच्या औषध विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल याविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,

असा विश्वास नक्कीच वाटतो की एखाद्या विशिष्ट अँटीबॉडीने जर ह्या रोगाला टार्गेट केले गेले तर तो आजार बरा होऊ शकतो. म्हणूनच, मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज वेगवेगळ्या रोगांना टार्गेट करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांनी विकसित केले आहेत. कर्करोगाच्या उपचारात टार्गेट थेरपी म्हणून अनेक प्रकारचे मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज देखील वापरले जातात.

अमेरिकेत यापुर्वी याची चाचणी घेण्यात आली आहे…

सध्या कोरोनाच्या उपचारात टोसिलीझुमॅबचा वापर केला जातो. हे एक प्रकारचे मोनोक्लोनल अँन्टीबॉडी देखील आहे. हे दुसर्‍या रोगाचा उपचार करण्यासाठी तयार केले गेले आहे, परंतु कोरोना संक्रमणादरम्यान शरीराच्या अंतर्गत भागामध्ये सूज रोखण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना अँटीबॉडी कॉकटेल इंजेक्शन दिले गेले होते त्यांच्यात इंजेक्शन न मिळालेल्या लोकांपेक्षा ८१ टक्के संक्रमण होण्याचा धोका कमी आढळला आहे.

कासिरीविमॅब आणि इमडेविमॅब कोरोना लक्षात ठेवून तयार केले गेले आहेत. अमेरिकेतही याचा प्रयत्न केला गेला आहे. हे अँटीबायोटिक सौम्य आणि कमी तीव्र संक्रमण ग्रस्त रूग्णांना दिले जाते. जेणेकरून संक्रमण सुरूवातीलाच थांबवता येईल आणि रोग गंभीर होणार नाही.

ही पद्धती इंजेक्शन म्हणून वापरली जात आहे, ते देखील केवळ सौम्य किंवा अत्यंत गंभीर रूग्णांना दिले जाते. मात्र यात एक समस्या अशी की सध्या सौम्य संसर्ग झालेल्या रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गरजू रूग्णांना ओळखणे आणि त्यांना ही पद्धत वापरणे सोपे होणार नाही. औषधाची उपलब्धता देखील एक मोठे आव्हान असेल.

दरम्यान, जर्मनीने या औषधाच्या वापरास परवानगी दिली होती. जर्मनी सरकारने या अॅन्टिबॉडीजचे २० लाख डोस विकत घेतले. जे ४८७ मिलियन डॉलर इतक्या किंमतीचे आहेत. कोरोनाविरूद्धच्या लढाईत हत्यार असलेल हे औषध १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिलं जातं.

भारतातही दिली गेली मंजुरी

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत असणाऱ्या भारताने देखील या औषधाच्या वापरास मंजूरी दिली आहे. भारतात सध्या अँटीबॉडी कॉकटेलच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्यूशनचा अधिकार फार्मा कंपनी सिप्ला जवळ आहे. या औषधाच्या वापराने कमी जोखमीच्या तसेच कमी गंभीर रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल.

आता मंजूरी मिळाल्याने त्याची आयात तर सोपी होईल, मात्र ते कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

डॉ. रवी गोडसे यांच्या सारख्या तज्ञ डॉक्टरांनी सरकारकडे मागणी केली आहे कि लवकरातल्या लवकर मोनोक्लोनल अँन्टीबॉडीजची उपचारपद्धती भारतात सुरु केली जावी यामुळे दुसऱ्या लाटेतील जीवितहानी थांबवता तर येईल आणि तिसऱ्या लाटेला सामना करण्यासाठी देखील देश सज्ज होईल.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.