रामदेव बाबांनी आणलेल्या ‘कोरोनील’ औषधाचं पुढे काय झालं?

काल रात्री पासून रामदेव बाबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यात ते ऑक्सिजन नाही म्हणणाऱ्या लोकांवर टीका करत ‘देवाने संपुर्ण ब्रम्हांड ऑक्सिजनने भरुन ठेवला आहे. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने तो ओढा’ असा सल्ला सांगताना दिसत आहेत.

त्यासोबतच त्यांनी कोरोनाबधितांची ६० पर्यंत खाली आलेली ऑक्सिजनची पातळी प्राणायमाच्या साहाय्याने ९८ पर्यंत पोहचवल्याचा दावा पण केला.

आता यातील किती खरं खोटं हे रामदेव बाबांनाच माहित. पण त्यानंतर अनेकांनी बाबांनी याआधी केलेल्या एका दाव्या बद्दल काय झालं, असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो दावा म्हणजे कोरोनीलचा. त्यातचं काल प्रसिद्ध लेखलं चेतन भगत यांनी देखील एक खोचक ट्विट करत कोरोनीलची कोणीच अर्जंट मागणी करताना दिसतं नसल्याचं म्हंटलं होतं.

मग म्हंटलं जरा शोधवाचं या कोरोनीलचं पुढे काय झालं?

मागच्या वर्षीपासून सगळं जग कोरोनावर लस किंवा औषध कधी येतं, याची डोळ्यात तेल घालून वाट बघत होते. त्याच वेळी ‘आसेतु हिमाचल हलकल्लोळ झाला’. सरळ सांगायचं तर भल्या भल्यांचा चक्कीत जाळ झाला.

कारण सगळं जग वाट बघत असताना रामदेव बाबा आशेचा किरण घेऊन आले. २३ जून २०२० रोजी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्याचं नाव अर्थात “कोरोनील”. 

मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच चारी दिशांनी संशय आणि टीका सुरु झाल्यावर आयुष मंत्रालायानं आपल्याला या विषयाची कसलीच माहिती नसल्याचं म्हटलं, आणि या औषधांची नावं आणि त्यातले घटक सांगण्याचे आदेश पतंजलीला देण्यात आले. सोबतच या औषधांच्या जाहिरातीवर बंदी घातली आणि एक चौकशी समिती नेमली. त्यानंतर केंद्र सरकारनं देखील हे औषध लगेचच थंड बस्त्यात टाकलं.

मात्र पुढे स्वतः पतंजलीने आपण असा दावा केला नसल्याचं सांगत हे फक्त ‘प्रतिकारशक्ती’ वाढवणारं औषध आहे, असं म्हटलं आणि तशी विक्री करण्याची परवानगी मिळवली. सोबतच पतंजलीने स्पष्ट केलं की, जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंस अँड रिसर्चच्या देखरेखीखाली ९५ लोकांच्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्या होत्या.

मात्र तोपर्यंत जे व्हायचं ते नुकसान झालं होतं,

औषधाच्या नावाखाली फ्रॉड’ केल्याचा आरोप करणारी तक्रार पतंजली विरोधात दाखल करण्यात आली होती. सोबतच महाराष्ट्र सरकारनं देखील तात्काळ या औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आणि स्पष्ट की जो पर्यंत जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युटकडून या औषधाबद्दल स्पष्टीकरण येतं नाही तो पर्यंत महाराष्ट्रात याच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही.

त्यानंतर ऑगस्टमध्ये मद्रास उच्च न्यायालयाकडून पतंजलीला कोरोनाच्या भीतीचा फायदा उचलत असल्याचं म्हणतं तब्बल १० लाखांचा दंड ठोठवण्यात आला. सोबतच हे देखील स्पष्ट केलं की, 

कोरोनील केवळ सर्दी, खोकला, तापावर औषध उपयुक्त आहे. 

यानंतर पतंजलीची कोरोनील एकदम शांत झाली. त्यानंतर कोरोनील एकदम चर्चेत आलं ते जवळपास ६ महिन्यांनी.

फेब्रुवारी २०२१.

१९ फेब्रुवारी २०२१ ला रामदेव बाबांनी कोरोनील पुन्हा बाजारात आणलं. मागच्या वेळी घोळ झाल्यामुळे पतंजली आणि रामदेव बाबांकडून यावेळी अत्यंत सावध पावलं टाकली गेली, आणि लॉन्चिंगसाठी थेट देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यानांच व्यासपीठावर आणलं.

त्यावेळी रामदेव बाबांनी दावा केला कि,

“आता कोरोनील कोरोनापासून संरक्षण आणि उपचार करू शकते”  

यावरून डॉ. हर्षवर्धन यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनपासून सगळ्यांनी अशा ‘अवैज्ञानिक औषधाची’ प्रसिद्धी केल्याबद्दल टीका देखील झाली.

मात्र त्यावेळी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर केलं आम्हाला ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ची मंजुरी मिळाली आहे. तर रामदेव बाबा यांनी दावा केला की आम्हाला WHO कडून तब्बल १५० देशांमध्ये या औषधाच्या विक्रीची परवानगी मिळाली आहे. सोबतच आता पर्यंत १ कोटी लोकं ‘कोरोनील’मुळे बरे झाले आहेत.

मात्र या नंतर औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून या औषधाचा विरोध सुरु केला, सोबतच या औषधाला कोणत्याही मान्यताप्राप्त अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळाली नाही असा देखील दावा केला, आणि ती मिळाली असल्यास तसे सिद्ध करावं असं आव्हान देण्यात आलं. त्यानंतर लगेचचं या औषधाला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ट‌्वीट करून जाहीर केलं. 

त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडून पुन्हा या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.

मात्र कंपनीने पुन्हा यु-टर्न मारला आणि म्हंटलं कि आम्ही सरकार कडून WHO च्या गाईडलाईन्स नुसार औषधनिर्मितीचा परवाना मिळवला आहे.

सध्या ‘कोरोनील’चं कुठे आहे?

महाराष्ट्रमध्ये कोरोनील अद्याप बॅन असली तरी गुगल ट्रेंड नुसार भारतात मागच्या ९० दिवसांमध्ये कोरोनील बाबत मागच्या एप्रिल महिन्यांमध्ये लोकांनी चांगला इंट्रेस्ट दाखवला होता.

coronil

त्यामुळेच सध्या कोरोनील ‘आऊट ऑफ स्टॉक’ असल्याचं दिसून येत आहे. मनी कंट्रोल आणि News18 हिंदी या दोन वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त दिलं आहे. देशभरातील कोणत्याही केमिस्ट किंवा औषधांच्या आउटलेटमध्ये कोरोनील ‘आऊट ऑफ स्टॉक’ असल्याचं सांगण्यात येत आहे.

दिल्ली, गुडगाव आणि बेंगळुरू यासारख्या शहरांमध्ये देखील कोरोनील उपलब्ध नाही. दिल्लीच्या पृथ्वीराज रोडवर जनरल स्टोअर्स चालवणाऱ्या कपिल पंगासा यांनी या माध्यमांशी बोलताना डिमांड जास्त असल्यामुळे कोरोनील टॅबलेट/किट संपली असल्याचं सांगितलं आहे.

फोबर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक हे औषध ऍमेझॉन सारख्या वेबसाईट वरून खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कोरोनीलवर स्पष्टपणे या औषधाला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता नाही आणि या औषधाचा उद्देश उपचार किंवा आजारापासून संरक्षण नाही असं लिहिलं आहे. तरी देखील हे औषध खरेदी केलं जातं आहे.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. fake account bhidu says

    Bol bhidu screenla touch kel tri toch faltu message ky yetoy satrada hi facebook chukun touch houn open zaleli link kashala kon copy krel bhidu ha blog tulach asude bhava ani majhya fb accountvr punha disla tr 100 te 150 jananna kmitkmi report krayla sangen bhidu copy tr screenshot न pn hote bhidu punha image to text hot bhidu pn kon ya news copy krel bhidu ramdev ani ptanjali 😂😂 bhidu mi pn blogger ahe bhidu pn mla ya सब्जेक्टमध्ये bilkul interest nahi bhidu .

Leave A Reply

Your email address will not be published.