इंस्टा स्टोरीवर क्लिक करताय ? थांबा. एक १४ वर्षांचा पोरगा जगातल्या मोबाईलचा बाजार उठवतोय

इंस्टाग्रामची व्हायरल स्टोरी ज्यामूळे बंद होतायेत फोन..

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र त्यात आता इंटरनेट देखील जोडला गेलाय. विरंगुळा म्हणून असणारं इंटरनेट, सोशल मीडिया कोरोना लॉकडाउन दरम्यान जीवनाचा अविभाज्य भाग बनलय, अस म्हणायला हरकत नाही. सोशल मिडीयावर ऐरवी तर काही ना काही ट्रेंडिंग होतचं असत, मात्र लॉकडाउन दरम्यान सर्वजण घरी असल्यानं अनेक रिकामे चाळे सूचायला लागले.

कधी -कधी या गोष्टी मनोरंजनासाठी चांगल्या वाटतात, तर कधी विनाकामाची डोकेदुखी बनतात. असाच एक गेम सध्या इन्स्टाग्रामवर सुरुये. जिथे एक हायलाइट स्टोरी मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय, ज्याला टच करताच इंस्टाग्राम बंद होते , एवढंच नव्हे तर काहींचे फोन सुद्धा हँग होतायेत.

हँग हायलाइट्स स्टोरी

काही दिवसांपासून या इंस्टाग्राम स्टोरीने खळबळ उडवली. ज्याची चर्चा आगीसारखी पसरलीय.
एक इन्स्टाग्राम हायलाइट @ / kill_my_phone नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट केले गेले. या हँडलवर हे एकमेव हायलाइट होते. Android किंवा आयओएस मोबाइल वापरकर्त्यांनी त्याला टच करताच. आधी एक सूचना येते की, पुढची स्टोरी इन्स्टाग्राम बंद करेल. आणि लगेचच आपला फोन हँग होतो. किंवा काही वेळासाठी आपले इंस्टाग्राम ॲप काम करणे बंद होते.

नेमका काय आहे मॅटर…

दरम्यान, इन्स्टाग्रामवर आपण एखादी स्टोरी पोस्ट करतो. ही स्टोरी आपल्या फॉलोअर्सला 24 तासांसाठी दिसते. हे नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे हायलाइट. हे हायलाइट्स प्रोफाइल फोटोच्या खाली गोलाकार टॅबमध्ये दिसते. या टॅबवर टच करताच स्टोरी पून्हा दिसते.

असेच काहीसे हायलाइट काही दिवसांपूर्वी देखील व्हायरल होत होते.

@pgtalal नावाच्या पेजवर ते पाहिले गेले. त्यात काही अरबी भाषेत लिहिलेलं होतं, परंतु त्यावर कोणी क्लिक करताच इन्स्टाग्राम हँग होत होतं. यामूळं लोक हैराण झाली की, नक्की झालं तरी काय? कोणी म्हंटल की, हा डेटा हॅक करण्याचा कट आहे. तर कोणी याला इंटरनॅशनल कॉन्स्पिरेसी म्हंटल. आपल्या सारखा सामान्य माणूस तर सोडाच यामूळं मोठं – मोठ्या टेक गुरूंना सुद्धा घाम फुटला.

असाच एक टेक गुरू म्हणजे लंडनचा YouTuber अरुण मैनी. Mrwhosetheboss हे त्याचं यूट्यूब चॅनेल, ज्याच्यावर 70 लाखाहून अधिक सब्सक्रायबर आहेत. हा हॅकिंगचा झोल शोधण्यासाठी त्याने दूसऱ्या एक्सपर्ट्सची मदत मागितली. त्यावेळी ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे रिसर्चर अनन्य अरोरा यांनी मदतीचा हात पुढे केला.

अनन्य अरोरा म्हणाला की, स्मार्ट हॅकरने इंस्टाग्राम स्टिकरचा आकार इतका वाढवला की तो कोणत्याही मोबाइलच्या लिमीट बाहेर जाईल. त्यामूळे हे सगळं घडतयं.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, प्रत्येक वेळी कोणतेही ॲप जेव्हा आपल्या स्क्रीनवर काही सर्विस देते. ते स्क्रीन साइज नुसार ॲडजस्ट होतं. स्क्रीन साइजची देखील एक लिमीट असते, ॲप बनविण्याऱ्या कंपन्याना ते माहीत असतं.

अशा परिस्थितीत इन्स्टाग्रामने काही स्क्रीन साइजनुसार आपले ॲप तयार केले आहे. या हॅकरने ॲपवर दिसणार्‍या स्टिकरचा आकार कित्येक पटींनी वाढविला. ज्यामूळे कोणीही जेव्हा @pgtalal च्या या हायलाइट्सवर क्लिक करतो, तेव्हा ॲप ते कित्येक पटींच्या मोठ्या आकारात उघडण्याचा प्रयत्न करतो. यामुळे ॲप काम करणे बंद करते. कमी रॅम आणि जुने फोन तर हे हँडलने करू शकत नाही, आणि ते बंद होतात.

अनन्य याने आपल्या ट्विटरवर ही संपूर्ण यंत्रणा स्पष्ट केली आहे.

हे करत असलेल्या हॅकरची माहिती मिळताच युट्यूबर अरुण मैनीला धक्का बसला.

तो 14 वर्षाचा मुलगा आहे जो वयाच्या 11 व्या वर्षापासूनच कॉम्प्यूटर प्रोग्रामिंग शिकतोय. त्याने मजे- मजेत इंस्टाग्रामची कमतरता जाणून घेण्यासाठी असे केले.

त्याने आपल्या नावाचा खुलासा तर केला नाही, मात्र, युट्यूबबर मॅनीला सांगितले की, त्याने इन्स्टाग्राम सर्व्हरवर एक विशिष्ट कोड पाठवून हा उद्योग केला. ही माहिती दिल्यानंतर हॅकरने इंस्टाग्रामवरुन त्याचे हायलाइट्स काढून टाकले. सध्या, @pgtalal वरील हायलाइटमुळे इन्स्टाग्राम हँग होणे बंद झाले.

दरम्यान, हॅकर्सच्या या गमतीत या ॲप्सवरचा आपला पर्सनल डेटा किती सुरक्षित आहे, असा विचार डोक्यात आल्याशिवाय राहत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.