एका व्हायरस मुळे घोळ झाला अन जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच लफडं बाहेर आलं होतं..

हे फेसबुक व्हाटसऍप मार्केटमध्ये आलं आणि राडा राडा सुरु झाला. जे कार्यकर्ते आधीच लफडेबाज होते त्यांना आता नवीन प्लॅटफॉर्म मिळाला. इनबॉक्स मध्ये जाऊन जेवण झालं का हे विचारलं जाऊ लागलं. समोरासमोरचं धाडस नाही ते व्हाटसऍप च्या मदतीने आकारास येऊ लागलं.

आता यातले कार्यकर्ते-कार्यकर्त्या लगीन झालेलं होत्या.  रोजच्या दाल चावल पेक्षा बिर्याणीच्या चर्चा इनबॉक्स मध्ये झडू लागल्या. सगळं झाल्यावर हिस्ट्री क्लियर करणे आलं, फोटो हाईड करणे आलं. बराच उसाभर करून न्यू टेक्नॉलॉजीच्या जगात आपली प्रकरणं दाबली जाऊ लागली.

असच आपले जेफ बेझॉस बापू म्हणजे अमॅझॉनचे मालक, मनानेच नाही तर पैशाने देखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व यांना पण कॉन्फिडन्स आला. बायकोला माहित नाही ते त्यांनी बाहेर गुटर गु करण्यास सुरवात केली. 

कधी कधी कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स बनतो असं म्हणतात. जेफ बापूच पण असच झालं. मागच्या वर्षी त्यांचं लफडं बाहेर आलं, बायकोने बापूला टाकलं. काडीमोड घेतला आणि बदल्यात जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचे अमॅझॉन कंपनीचे शेअर्स घेतले.

जेफ बेझॉसनं स्वप्नात देखील विचार केला नव्हता असं सगळं त्याच्या बरोबर घडलं. पण एक प्रश्न अनेकांना पडला की जगातल्या श्रीमंत माणसाच अफेअर असं कसं काय उघडकीस आलं ?

याचं कारण दिलं जातंय पगॅसस नावाच्या एका स्पायवेअर कड.

आता तुमची उत्सुकता चाळवली असणारच. (अनेक कार्यकर्ते टेन्शन मध्ये देखील आले असणार.)आता समाजसेवा म्हणून अगदी सुरवातीपासून सांगतो.

गोष्ट आहे २०१८ सालची.

झालं असं कि एकदा सौदी अरेबियाचे प्रिन्स अमेरिका दौऱ्यावर आले होते. आता सौदी म्हणजे तेलाच्या खाणीचा देश. उंटावरून फिरणारे शेख आता फेरारी घेऊन हिंडतेत, मग आपल्या बापूला वाटलं कि सौदीच्या या भावी सुलतानाची भेट घेऊ आपल्या कंपनीच्या विस्तारासाठी काय ना काय फायदाच होईल.

दोघे सिएटल इथे भेटले. डिनर झालं गप्पा झाल्या. दोघांनी एकमेकांना व्हाटसअप नंबर एक्स्चेंज केले. ४ एप्रिल ला दोघे भेटले आणि महिन्याभराने १ मे रोजी अचानक  सौदी प्रिन्सने बेझॉस साहेबांना एक गुड मॉर्निंग टाईपचा MP४ व्हिडीओ फॉरवर्ड केला. आपल्या नेहमीच्या सवयीने बापूने तो डाउनलोड केला.

करायला नको ते केलं आणि घोळ झाला.

व्हिडीओ डाउनलोड झाल्यापासून बापूचा फोन येड्यासारखा करू लागला. एखादा नव्याने दारू पिलेला माणूस एक पेग मारल्यावर मनात साठलेले सगळं बाहेर काढतो तस बापूच्या मोबाईलने केलं. आपला सगळं डेटा, फोटो, डॉक्युमेंट्स हॅकरच्या हवाली केलेलं. जेफ बेझॉस च्या लक्षात येई पर्यंत त्याचा बाजार उठला होता.

बापूने लगेच आपल्या सिक्युरिटी टीमला बोलावलं. त्यांनी त्याचा फोन एक्पर्टच्या हवाली केला. या टीमने सांगितलं कि सौदी प्रिन्सच्या अकाऊंटवरूनआलेला तो व्हिडीओ साधा नव्हता तर तो एक स्पायवेअर होता.

याच नाव पगॅसस

याची निर्मिती इस्रायलच्या एनएसओ ग्रुपने केली आहे. असं म्हणतात की त्यांनी हे स्पायवेअर जगभरातल्या सरकारांना विकायला सुरवात केली. सौदी अरबने २०१३ पासून पगॅससचा वापर करायला सुरवात केली असं सांगितलं जातं . मध्यंतरी इस्तंबूलमध्ये सौदी दूतावासात खाशोगी नावाच्या पत्रकाराचा खून झाला तेव्हा देखील याच स्पायवेअरचा वापर झालेला.

फक्त सौदी नाही तर भारतातल्या मोदी सरकारवर देखील पत्रकारांवर  नजर ठेवली जात असल्याचं आरोप केले गेले त्यात देखील याच स्पायवेअरचा वापर झाला होता . जेफ बेझॉसच्या सिक्युरिटी ऍडव्हायझर ने तर थेट सौदी अरेबिया सरकारला धारेवर धरलं. खूप गोंधळ झाला. 

आम्ही किती सेफ आहे, आपली माहिती चॅट कधी लीक होत नाही असा दावा करणारे व्हाटसअप दोन पावले मागे आले, हळूच व्हिडीओ पाठवला तर हा व्हायरस मोबाईलमध्ये घुसू शकतो असं म्हणून लागले.

हे सगळं चाललं होतं आणि अचानक जानेवारी २०१९ रोजी जेफ बेझॉस व त्याची पत्नी मॅकेन्झी यांचा २५ वर्षांचा संसार मोडत आहे असं त्यांनी ट्विटर वरून जाहीर केलं. सगळ्या जनतेला आश्चर्य वाटलं कि या आदर्श कपल मध्ये घटस्फोट होण्यापर्यंत जाईल असं काय घडलं होतं ? आम्ही जरी सेपरेट होत असलो तरी फ्रेंड्स राहू असं टिपीकल वाक्य देखील त्यांचं वापरून झालं.

MW GP484 Jeff M ZG 20180905090419

एकाच महिन्यात जेफ बापूने एका अमेरिकन मिडिया हाऊस नॅशनल एन्क्वायरर वर आरोप केले कि

त्यांनी माझे काही पर्सनल फोटो वापरून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मग हळूहळू सर्वसामान्य जनतेला एक एक गोष्टी क्लियर होत गेल्या. आदर्श पती समजला जाणारा जेफ्या टकला खरं तर आतल्या गाठीचा होता. त्याचे लॉरेन संचेझ नावाच्या फिल्मस्टार बरोबर अफेअर चालू होतं.ती सुद्धा बया लग्न झालेली होती, पदरात दोन मुलं होती. पण आता जगातल्या या श्रीमंत माणसा बरोबर सूर जुळले आणि मागचं पुढचं सगळं विसरून दोघे प्रेमलीलेत रंगले.

आता सौदी प्रिन्सने सोडलेल्या व्हायरस मध्ये जेफ बापूचं जेवढं मटेरियल बाहेर पडलं ते नॅशनल एन्क्वायररच्या हातात सापडलं असावं. त्यांनी एकदम खास सेल्फी, नको त्या अवस्थेतील फोटो, व्हिडीओ, चॅटिंग वगैरे वगैरे सगळं खुलं करण्याची धमकी दिली.

जेफ बापूच्या बायकोच्या हातात हे फोटो लागले असं म्हणतात आणि त्याच मुळे त्याने बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आता बापू आणि लॉरेन खुले आम एकत्र फिरतात. लॉरेनने देखील आपल्या नवऱ्यापासून डिव्होर्स घेतलय. पण या सगळ्यात मॅकेंजीला मात्र २५०० कोटींचे शेअर्स मिळाले. तिने ते म्हणे दान देण्यास देखील सुरवात केलीय. आजच तिचं दुसरं लग्न एका शाळा मास्तर बरोबर झालं.

तर बघा मित्रांनो व्हाटसपवर आलेला एक साधा डाऊनलोड केलेला व्हिडीओ जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा बाजार उठवू शकतो. त्यामुळे सावधान रहे सतर्क रहे.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.