सासू सुनेच्या भांडणामुळं सोनिया गांधींना गडबडीत भारताचं नागरिकत्व घ्यावं लागलं..

“जर मुस्लिम समुदायाने मला मते दिली नाहीत आणि तरी मी निवडून आले. तर तेव्हा हे लोकं कोणत्याही कामासाठी माझ्याकडे आले तर त्यांना जशास तशी वागणूक दिली जाईल, आम्ही काही महात्मा गांधींचे वारसदार नाही. कायम फक्त देतच रहायचे आणि निवडणुकांमध्ये पराजयही स्विकारायचा”  

हे विधान आहे एकेकाळच्या पत्रकार आणि गांधी घराण्याची सून असलेल्या मनेका गांधी यांचे. त्या राजकारणात नेहमी विवादात तर राहिल्याचं शिवाय त्यांचं खाजगी आयुष्य ही तितकेच वादग्रस्त ठरलेले होते. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सून मनेका गांधी यांचे आज भारतीय राजकारणात वेगळे स्थान आहे. एक काळ असा होता की मनेका यांनी पती संजय गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी सूर्या या मासिकांचे प्रकाशन सुरू केले होते.

संजय गांधी हे एक हौशी पायलट होते, त्यांना विमान उडवण्याचा छंद होता आणि हाच छंद त्यांच्या जीवावर बेतला आणि त्यामुळे त्यांचे २३  जून १९८०  रोजी दिल्ली येथे विमान अपघातात गंभीर दुखापतीमुळे त्यांचे निधन झाले, त्यांच्या अपघाताला सर्वस्वी तेच जबाबदार होते. गांधी कुटुंब या दुःखातून बाहेर येतच होते, कि कुटुंबात पुन्हा वादावादी चालू झाल्या.

इंदिरा गांधी आणि सून मनेका गांधी यांच्यातला ताणतणाव वाढतच होता.

मनेकाने विसंवादाची तार छेडली होती. तिला आपल्या नवऱ्याचा राजकीय वारसा चालवायचा होता. यासाठी अमेठीमधून निवडणूक लढवायची होती. पण तेव्हा ती फक्त २३-२४ वर्षांची होती. खरं तर निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट होती. त्यानुसार आपण निवडणुकीला उभं राहू शकत नाही, हे तिला चांगलं माहीत होतं.

तरीही आपल्या पतीचा वारसा त्याचा भाऊ आपल्या कडून हिसकावून येईल या भीतीने ती सैरभैर झाली.  त्या रागामध्ये ती प्रसारमाध्यमां जवळ बिनधास्त विधानं करू लागली,

“माझा दीर राजीव अत्यंत आळशी आहे, तो सकाळी दहा वाजायच्या आधी अंथरुणातून उठतही नाही”. अशी विधान करण्यामागचा तिचा हेतू मात्र काही वेगळाच होता.

“राजीवला राजकारण कधीच आवडत नव्हतं, शिवाय त्याचं लग्नही एका परदेशी स्त्री बरोबर झालंय, असं असताना आपल्या भावाच्या कार्याची धुरा तो कशी काय आपल्या खांद्यावर घेऊ शकतो?”

अशी विधानं करून, मनेका हीच ‘गांधी’ घराण्याची वारसदार आहे, संजयच्या एकुलत्या एक मुलाची ती आई आहे, केवळ ती एकटीच इंदिराजींची वारसदार होऊ शकते असे लोकांना वाटावे म्हणून ती जाहीरपणे काहीही विधाने करत सुटायची.

सोनिया मूळ परदेशी आहे, याचं भांडवल सर्वात अगोदर मनेकानंच केलं होतं. हे कळल्यावर राजीव आणि इंदिराजींना संकटाचा लगेच वास आला म्हणून त्यांनी ताबडतोब सोनियाला भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. तसंही भारतीय नागरिकत्व घेण्याचा अधिकार सोनिया यांना लग्नामुळे मिळालाच होता.

राजीव- सोनिया यांच्याविरुद्ध बोलून मनेकानं सासूबाईंचा आणखीनच राग ओढवून घेतला होता. संजय वर लिहिलेल्या पुस्तकाची पहिली प्रत मनेकाने इंदिराजींना दाखवली, तेव्हा त्यांनी खूप मोठा बखेडा उभा केला.

इंदिरा रागाने म्हणाल्या की,

“लेखनातील काही भाग आणि फोटो खालचे मथळे आमच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाहीतच. शिवाय ते सत्याचा अपलाप करणारेही आहेत. त्यामुळे हे पुस्तक आहे त्या रूपात छापता कामा नये, तीन दिवसांनी त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे आणि तू मला शेवटच्या मिनिटाला प्रत दाखवते आहेस, त्यामुळे हवा तो बदल करून घेईपर्यंत हा प्रकाशन समारंभ पुढे ढकलावाच लागेल, कारण ज्या स्वरूपात पुस्तक आहे त्या स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी मी परवानगी देणार नाही “.

भडकलेली मनेका रागारागाने खोलीचे दार आपटून बाहेर निघून गेली, इंदिराजींनी ओरडल्यावर ती पुन्हा आत आली. तिने सासूच्या डोळ्यांना डोळा भिडवून पाहिलं.

“गोष्टी या थराला गेल्यात ते चालणार नाहीत मनेका. तुझी प्रसार माध्यमांशी चाललेली अर्थहीन बडबड आणि आपल्या कुटुंबाबद्दल तुझ्या मनाला येईल ते प्रसिद्ध करणे या गोष्टी मी खपवून घेणार नाही”.

या सगळ्या भांडणात मनेकाजवळ इंदिराजी यांच्यावर जीवघेणा वार करण्याचा एकमेव शस्त्र होतं ते म्हणजे, “मी तुमच्या नातवाला तुमच्यापासून तोडीन”.  इंदिराजी बोलतच होत्या,

“तू अशीच वागत राहिली तर भविष्यात आपलं नातं शिल्लक राहणार नाही. मी तुला साधी ओळखही दाखवणार नाही तेव्हा तूच काय ते निवड कर. एक तर ते एक तरी किंवा आपल्यातले मैत्रीपूर्ण संबंध तरी, तूच काय ते ठरव”.

एवढ्या प्रतिष्ठित नात्यावर पाणी सोडून देण्यास कदाचित हा योग्य क्षण नाही म्हणून तिने, पुस्तकाचं प्रकाशन पुढे ढकललं आणि फोटोखालचे मथळे ही बदलले.

इंदिराजींनी सुटकेचा निश्वास सोडला एक लढाई आपण जिंकली आहे याची त्यांना जाणीव होती. परंतु ही लढाई शेवटची असेल याची मात्र त्यांना मुळीच खात्री नव्हती. आणीबाणीची परिस्थिती निदान ह्या क्षणापुरती तरी टळली होती.

वाद घालण्यात पटाईत असलेली, हट्टाला पेटलेली मनेका एका दोऱ्याची निरगाठ आणखी आवळण्यात लवकरच तरबेज झाली होती. तिला आता दोन गोष्टी नीट समजल्या होत्या त्या म्हणजे ज्या सत्तारचनेवर इंदिराजी आरूढ होत्या त्या रचनेत आपल्यासाठी काहीही स्थान नाही आणि दुसरं म्हणजे भविष्यात आपण आपल्या सासूचे प्रतिस्पर्धी बनू शकतो.

आणि म्हणून तिने ठरवलं की एकीकडे आपल्या अवज्ञाकारक भडकाऊ वर्तन दुपटीने वाढवायचं तर दुसरीकडे सत्तेवरून पायउतार झालेल्या संजय समर्थकांना संघटित करून आपल्या ताकदीचा पाया बळकट करायचा.

त्याचदरम्यान संजय यांचा जुना मित्र अकबर अहमद ह्याने काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या फुटीरांचं नेतृत्व शिरावर घेतलं होतं. लखनऊ येथे जाऊन त्या फुटीर गटापुढे भाषण द्यायला मनेका कबूल झाली होती.

उत्तर प्रदेश विधानसभेतील साधारण शंभर सदस्यांनी मला पाठिंबा दिला आहे असं मनेकाने सांगितलं तेव्हा इंदिराजी खूप भडकल्या त्यांनी पुपुल जयकर ला सांगितले की,

‘माझ्या विरोधात हे लोक छोटे बंडच उभारत आहेत’.

मग त्यांनी मनेकाला एक निरोप पाठवला, “लखनऊला जायचं असेल तर माझ्या घरात पुन्हा पाऊलही टाकायचं नाही.”

खरे तर मनेका नाही तर तिची आई कट रचत होती. त्या दोघींच मुख्य हत्यार होतं सूर्या मासिक. मनेकाची आई जे काही करायला जात होती ते फारच स्फ़ोटक होतं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक डॉ. जिनेन्द्र कुमार जैन आणि सरदार एस. सी आंग्रे यांच्याशी ती चक्क सूर्या मासिकाच्या विक्रीच्या वाटाघाटी करत होती. हा सगळा प्रकार इंदिराजींच्या पाठीमागे चालला होता इंदिराजींना ते कळलं तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

सूर्या मासिकाच्या विक्रीचा व्यवहार त्यांना पत्ताही लागू न देता पूर्ण करण्यात आला. ही गोष्ट तर शिशूपालाचे शंभर अपराध पूर्ण झाल्यासारखी ठरली.

ते मासिक मनेका आणि तिच्या आईच्या मालकीचं असलं तरी मुळात त्याचा जन्म आणि पुढील कार्य केवळ इंदिराजींच्या वशील्यामुळे आणि त्यांचा प्रभाव असल्यामुळे होऊ शकलं होतं याची सर्वांना व्यवस्थित कल्पना होती. त्यामुळे घरातील तणाव कधीही स्फोट होईल अशा पातळीवर पोहोचला होता.

राजीवही मागील काही महिन्यांपासून घरात भावजयीची आणि आपली भेटच होणार नाही याची दक्षता घेत होते. मनेका आता फार काळ तिथे राहू शकत नाही हे स्पष्ट झालं होतं.

परंतु मनेकाबरोबरच या तंट्यात आपला नातू आपल्यापासून हिरावून घेतला जाणार हे पाहून इंदिराजी खूप मनानं खूप खचल्या. आतापर्यंत त्यांना जेवढ्या विश्वासघातांना सामोरं जावं लागलं होतं, त्यापैकी हा त्यांच्यासाठी सर्वात गंभीर, हानिकारक आणि क्रूर घात होता, कारण तो त्यांच्या घरातून झाला होता ज्या घराला त्या पवित्र स्थळ मानत होत्या. 

नातवासाठी म्हणून त्यांनी एक शेवटचा प्रयत्न केला. धीरेंद्र ब्रह्मचारी अजूनही त्यांना अधूनमधून भेटत असायचे ते मासिक कुठल्याही किमतीला पुन्हा विकत घेण्याचा वाटाघाटी करायला इंदिराजींनी त्यांना पाठवलं परंतु नव्या मालकांनी त्या गोष्टीला साफ नकार दिला. त्यामुळे इंदिराजींसमोर पुढं कुठलाच मार्गच राहिला नव्हता.

त्यादरम्यान इंदिराजी ‘द फेस्टिवल ऑफ इंडिया’ या उपक्रमाच्या उद्घाटनाला लंडनला सोनिया यांना घेऊन गेल्या होत्या.

इंदिराजी आणि सोनिया दूर आहेत, कामात गढून गेलेला राजीव फार काळ घरात नसतो, या गोष्टीचा फायदा घेऊन मनेकाने तो दिवस अगदी मोजून मापून ठरवला आणि इंदिराजींनी दिलेली सूचना सरळ धुडकावून ती लखनऊला गेली. आणि संजय समर्थकांच्या पुढे तिने आवेशयुक्त भाषण केलं. परंतु ते करताना आपण पंतप्रधानांची एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याची मात्र तिने पुरेपूर काळजी घेतली. सभेच्या आयोजकांनी ‘इंदिरा गांधी जिंदाबाद’ ‘संजय गांधी अमर रहे’ असे लिहिलेली फलक जागोजागी लावलेले होते.

भाषण संपवताना मनेका म्हणाली, “महान नेहरू-गांधी घराण्याची सून आहे या घराण्याची शिस्त आणि प्रतिष्ठा याचा मी नेहमीच सन्मान करेल.”

परंतु एकनिष्ठेच्या त्या प्रदर्शनाला इंदिराजी मुळीच बधल्या नाहीत. 28 मार्च 1982 रोजी सकाळी त्या लंडनहून भारतात परतल्या त्या,  “आपला अधिकार कुणालाही पायदळी तुडवू द्यायचा नाही असा दृढ निश्चय करूनच”!

नातवाचा वियोग सहन करण्याची त्यांनी मनाची तयारी केली. कारण मनेका त्या बाळाची आई होती या वास्तवापुढे त्या हतबल होत्या. अर्धवट झोपेतल्या फिरोज वरुण ला कडेवर घेऊन म्हणे गाने सरतेशेवटी रात्री अकरा वाजता ते घर सोडलं आणि ती बहिणी समवेत मोटारीत बसली. सगळं प्लॅनिंग केल्यासारखं चाललं होतं, कारण मुख्यप्रवेश दारावर देखील पत्रकार आणि कॅमेरामनची गर्दी आधीच झाली होती.

“एका सामर्थ्यवान, हुकूमशाही सासूची अत्यंत क्रूर वागणूक सहन करणारी एक गरीब प्रामाणिक सून अशी तिला स्वतःची प्रतिमा उभी करायची होती. त्या प्रतिमेत ते फोटो अगदी फिट्ट बसत होते”

दुसऱ्या दिवशी सकाळी भारतभरातील सर्व वृत्तपत्रांमध्ये फोटो खाली मथळा होता, “गाडीत बसून वार्ताहरांकडे बघुन हात हलवनारी मनेका”. काही परदेशी वृत्तपत्रांमध्येही ते फोटो आले.  इंडियन एक्सप्रेसने एक लेख छापला, त्यात पंतप्रधानांनी मनेकाला घरातून हाकलून लावण्यासाठी जी मेहनत घेतली, तिची तुलना ‘किडे मारण्यासाठी कुऱ्हाड वापरण्याशी’ केली इंदिराजी हरल्या होत्या आणि त्यांना ते चांगलं कळलं होतं. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.