मुंडेंचा सलग चार वेळा १ मताने पराभव झाला होता, तो ही त्यांचे मित्र प्रमोद महाजन यांच्या हातून..

एकेकाळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून हिनवले जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या तळागाळात नेऊन पोहचवणारे  राम लक्ष्मण म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे. राजकारणात स्वार्था साठी अनेक जोड्या निर्माण होतात आणि तुटतात. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत निभावलेली निस्वार्थ मैत्रीचं उदाहरण म्हणजे मुंडे आणि महाजन.

 विशेष म्हणजे यांच्या मैत्रीची सुरवात महाविद्यालयीन जीवनापासून झाली होती.

तस बघायला गेलं तर दोघांच्याही घरच्या पार्श्वभूमीच्या राजकारणाचा कोणताही संबंध नव्हता. दोघांना जोडणारा दुवा म्हणजे मराठवाड्याची दुष्काळी माती.

गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या गावी एक सामान्य शेतकरी कुटूंबात १२डिसेंबर१९४९रोजी झाला. वडील पांडुरंग मुंडे आणि आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते. आई वडिलांसोबत गोपीनाथरावांनी वयाच्या १४व्या वर्षी पंढरपूरची पायी वारी केली.

त्यामुळे मुंडेंवर बालपणापासूनच अध्यात्मिक प्रभाव राहिला. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. १९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हरपले; त्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आई आणि मोठे बंधू पंडितआण्णा यांनी उचलली. शेतकरी असले तरी मुंडेंच्या वडिलांचं एक स्वप्न होतं की चार मुलांपैकी किमान एकाने शिकावे.

वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंडितराव मुंडे यांनी गोपीनाथरावांना चौथीपर्यंत गावात शिकल्यानंतर पाचवीपासून पुढच्या शिक्षणासाठी परळी या तालुक्याच्या गावी पाठवलं. घरच्या परिस्थितीमुळे स्वतःच शिक्षण अर्धवट सोडलं मात्र गोपीनाथ मुंडेंना ग्रॅज्युएट करायचं म्हणून त्यांनी अपार कष्ट केले. 

गोपीनाथ मुंडेंना देखील परिस्थितीची जाणीव होती. पुढे कॉलेजसाठी म्हणून अंबाजोगाईला आले तिथे  स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. या काळात त्यांची ओळख प्रमोद महाजन या चळवळ्या तरुणाशी झाली.

प्रमोद हे व्यंकटेश देवीदास महाजन आणि प्रभादेवी यांचे द्वितीय चिरंजीव होते. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशमधल्या मेहबूबनगर येथे झाला. महाजन कुटुंब त्यांच्या महाजन गल्ली उस्मानाबाद येथून अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. लहानपणीच त्यांच्यावर संघाचे संस्कार झाले.

स्वातंत्र्यलढ्याची, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा वारसा सांगणारे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय हे पूर्वी पासून राजकीय चळवळीचे केंद्र होते. त्याकाळात विद्यार्थी जीवनापासून नेतृत्व घडावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात निवडणूक घडायच्या. गोपीनाथ मुंडे देखील या निवडणुकांमध्ये सक्रिय झाले.

गोपीनाथ मुंडे एकेठिकाणी आपल्या कॉलेज जीवनातल्या आठवणी सांगताना म्हणतात,

मी स्वत:हून विद्यार्थ्यांच्या राजकारणात सामील झालो. त्या वेळी कॉलेजमधील प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीच्या निवडणुका आम्ही पॅनेल करून लढवायचो. माझा एक पॅनेल असायचा आणि दुसरा पॅनल माझे मित्र प्रमोदजींचा असायचा.

कॉलेजमधील या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पीयूसी ते ग्रॅज्युएट असा चार वर्षे सलग पुढाकार घेऊन सहभाग घेतला. आपल्या प्रमाणे ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना एकत्र करत त्यांनी कॉलेज सीआर साठी पॅनल उभं केलं होतं.  ते स्वत: उमेदवारीदेखील करत होते.

तर दुसरा गट होता प्रमोद महाजनांचा. प्रमोदजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून चळवळीचे काम करायचे. त्यांचं वेगळं पॅनल होतं. प्रमोद महाजनांचं व्यक्तिमत्व करिश्माई होतं. त्याकाळातही त्यांचा अभ्यास त्यांचं व्यक्तिमत्व समोरच्याला प्रभावित करत असे. त्यांची कॉलेजमधील भाषण तर प्रचंड हिट होत असत.

म्हणूनच कितीही तयारी करून गोपीनाथ मुंडेंनी आपला पॅनल उभा केला तरी त्यांचा विजय होत नसे.

मुंडे सांगतात,

गंमत म्हणजे, त्या चार वर्षांत मी एकदाही निवडून आलो नाही. अवघ्या एकाच मताने चारही वर्षे पराभूत होत होतो. आमच्यामध्ये दोन ग्रुप तयार झाले होते. दोन्ही ग्रुपमध्ये चांगलीच जिद्द निर्माण झालेली असल्याने कुणीही फुटत नव्हते. त्यामुळेच तर माझा पराभव एका मताने चारही वर्षे झाला.

माझी निवडणुकीत आधी पडायची तयारी होत गेली आणि मग नंतर निवडून येत गेलो.

मात्र गोपीनाथरावांचा एक मताने पराभव होत असताना कॉलेजचा प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी त्यांच्याच पॅनेलमधील असत. त्या वेळी प्रमोद महाजन आणि ते निवडणुकीनंतर आघाडी करायचे. मुंडे म्हणतात

“आमच्यात प्री-पोल अलायन्स नव्हती, तर आफ्टरपोल अलायन्स असायची. तेव्हा प्रमोद महाजन हे रा.स्व.संघाचे काम अधिकृतपणे करीत होते. मी मात्र कुठल्याही राजकीय पक्षात किंवा संघटनेत नव्हतो; तरीही प्रमोदजी माझे जवळचे मित्र होते. कॉलेजमध्ये आमचा पॅनेल वेगवेगळा असला तरी आमच्यात मैत्री फारच चांगली होती. मात्र कॉलेजमधील प्रेसिडेंट माझ्याच गटाचा होत राहिला. तेव्हापासून मी राजकारणात आहे तो आजतागायत!

अशी ही मुंडे व महाजन आगळीवेगळी मैत्री. पुढे दोघे मिळून राजकारणात आले. आणीबाणीच्या काळात एकत्र तुरुंगवास भोगला. मुंडेंचं प्रमोदजींच्या बहिणीशी लग्न झाल्यानंतर हि मैत्री नात्यात बदलली. पण कधी राजकारणामुळे त्यांच्यात वितुष्ट आलं नाही. उलट दोघांनी मिळून महाराष्ट्रात व देशात पक्षाला मजबूत केलं. आज भाजप कानाकोपऱ्यात पोहचला आहे त्याच श्रेय या दोघं दोस्तांनाच जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.