होम आयसोलेशन बंद करण्याआधी प्रशासनावर किती ताण येईल याचा विचार करायला हवा होता

राज्यात आजपासून कोरोना रुग्णांसंबंधीचे काही नवीन नियम लागू झाले आहेत. यात प्रामुख्यानं एका निर्णयानं सगळ्याचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे, होम आयसोलेशन बंद करणं. आज म्युकरमायकोसिस आणि कोरोना या दोन आजारांसंदर्भातल्या झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

एका बाजूला शासनाने हा निर्णय घेतला असला तरी, पुणे महानगरपालिकेकडून मात्र या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे.

पुण्यासारख्या ठिकाणी असा निर्णय लागू करण्यापूर्वी त्याचा पुनर्विचार करावा, असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सरकारला केलं आहे. त्यांच्या मते आता जर सगळे रुग्ण पुन्हा कोविड केअर सेंटर्समध्ये शिफ्ट करायचे म्हंटले तर प्रशासनावर प्रमाणाबाहेर ताण येणार आहे. सगळी यंत्रणा अतिरिक्त प्रमाणात उभी करावी लागणार आहे.

याच सगळ्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशन बंद केल्यामुळे यंत्रणेवर नेमका कोणता आणि कसा परिणाम होऊ शकतो, काय ताण येऊ शकतो? आणि हा निर्णय योग्य आहे कि अयोग्य याचा ‘बोल भिडू’ने घेतलेला आढावा…  

काय म्हणाले राजेश टोपे?

जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे हि टोपे म्हणाले.

कोणते जिल्हे रेड झोन मध्ये आहेत?

राज्यात सध्या अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली असे १८ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या सगळ्या जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन आता बंद होणार आहे.

इथल्या सगळ्या यंत्रणेवर कशा प्रकारे ताण येऊ शकतो?

शासनाच्या या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आधी विरोध दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथल्या प्रशासनावर प्रचंड ताण येऊ शकतो. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी हा निर्णय अव्यवहार्य असल्याचं म्हंटल आहे.

याच बाबत नेमका कसा ताण येऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, 

राज्य सरकारकडून कोणतीही पूर्व कल्पना न देता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेची तारांबळ होणार आहे हे निश्चित. मात्र सद्यस्थितीमध्ये तरी राज्य सरकारनं पुण्यासारख्या ठिकाणी हा निर्णय घेणं अव्यवहार्य आहे.

कारण पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात दाट वस्तींमध्ये रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे त्यावेळी गृहविलगीकरण करणं केवळ अशक्य होतं. त्यावेळची अशी परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडून देखील चांगली सुविधा उभी करण्यात आली होती.

पण दुसऱ्या लाटेत मात्र मोठं मोठ्या सोसायटी आणि अपार्टमेंट अशा ठिकाणी रुग्ण आढळायला लागले. मात्र याठिकाणी होम आयसोलेशनची सुविधा होती. त्यामुळे पुण्यात आज घडीला तब्बल ८० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते.

अशा परिस्थितीमध्ये आता जर होम आयसोलेशन बंद केलं तर जे ८० टक्के रुग्णांसाठी जवळपास ८० टक्के यंत्रणा पुन्हा उभी करावी लागणार आहे. त्यामुळेचं राज्य सरकारनं होम आयसोलेश बंद करण्याआधी प्रशासनावर किती ताण येईल याचा विचार करायला हवा होता.

यात क्वारंटाइन सेंटर्स, कोविड केअर सेंटर्स, तिथं बेड, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ, नॉन पॅरामेडिकल, सफाई कर्मचारी, ऍम्ब्युलन्स अशी सगळी व्यवस्था उभी करायला लागणार आहे. मात्र आता अडचण अशी आहे कि हि सगळी यंत्रणा सध्या कोरोना हॉस्पिटल्स, सध्याचे कोविड सेंटर्स, लसीकरण या ठिकाणी व्यस्त आहे.

पुण्यात अशी आहे विलगीकरण केंद्रांची व्यवस्था…

केंद्र – क्षमता – सध्याचे रुग्ण

रक्षकनगर खराडी – २५०- ५३

संत ज्ञानश्‍वर शाळा, येरवडा – ५०० – २३

बनकर शाळा, हडपसर – ३०० – ५६

गंगाधाम – १५० – ६५

एसएनडीटी – २५० – १५

औंध आयटीआय – १०० – ३९

दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र शासकीय यंत्रणेकडून या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

शासनाकडून ग्रामीण भागामध्ये प्रादुर्भाव जास्त असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्ह्यांमध्ये प्रशासनावर ताण येऊ शकतो याबाबत सातारचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील ‘बोल-भिडू’शी बोलताना म्हणाले,

असा निर्णय सरकार घेऊ शकते याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. याच मुख्य कारण सांगायचं झालं तर होम आयसोलेशनमधील रुग्ण बाहेर फिरतात. जोडीला हे रुग्ण बऱ्यापैकी लक्षण नसलेले होते आणि त्यांच्यामुळे प्रादुर्भाव वाढण्यास मदत होतं होती. हि मुख्य समस्या ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येत होती.

त्यामुळे प्रशासनातील अधिकारी आधीपासूनच अलर्ट होते आणि त्यांनी तयारीला सुरुवात केली होती. त्यामुळे सातारमध्ये तरी  प्रशासनाकडे क्वारंटाईन सेंटर्स, कोविड केअर्स सेंटर्स आधीपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे फार ताण येणार नाही.

सोबतच जरी ७० ते ८० टक्के रुग्ण जरी होम आयसोलेशन मध्ये दिसत असले तरी सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहेत, आणि ती सातत्यानं कमी होतं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे २८ सेंटर्स उपलब्ध आहेत.

रुग्णावर काय परिणाम होईल?

अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा येतील २४ वर्षीय अभिजित कोरोना बाधित असून सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. तो म्हणाला, मला काही वेळापूर्वी प्रशासनाकडून फोन करून सीसीसीमध्ये दाखल होण्यात सांगण्यात आलं आहे.

मात्र सध्या घरीच सुविधा चांगली आहे. घरचं उत्तम जेवण आणि मनोरंजनासाठी साधन देखील आहेत. पण तिथं गेल्यानंतर या सगळ्याचा आभाव होणार आहे. घरी आपल्या माणसांच्या सानिध्यात राहून मनाला पॉजिटीव्ह एनर्जी येते.

पण उलट आता सीसीसीमध्ये गेल्यानंतर घरच्यां ऐवजी दुसऱ्या बाधित रुग्णांच्या संपर्कात येण्याचा धोका आहे. त्यामुळेइंफेक्शन आणखी वाढू शकते.

बीड, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये या पूर्वीच आदेश देण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये २१ मे तर अहमदनगर आणि आणखी काही जिल्ह्यांमध्ये २२ मे रोजी असे आदेश देण्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची १५ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली होती. त्यात हे आदेश देण्यात आले होते. केवळ अपवादात्मक स्थितीमध्येच होम आयसोलेशन केलं जावं अशा सूचना मंत्री थोरात यांनी दिल्या होत्या.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.