गृहराज्यमंत्री असलेल्या श्रीकांत जिचकरांना काँग्रेसच्याच आमदारांनी मारहाण केली होती…

राजकारणातील चढाओढ भारताला नवीन नाही. पार्लमेंट मध्ये नेतेमंडळी एकमेकांच्या उरावर बसून भांडताना आपण टीव्हीवर लाईव्ह पाहत आलोय. पण पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात ही मात्र अपवादानेच अशा घटना घडताना दिसतात.

एकदा मात्र खुद्द महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्यांना याचा फटका बसला होता. तेही बाहेरच्या नेत्यांकडून नाही तर आपल्याच पक्षाच्या नेत्याकडून.

ते नेते होते डॉ. श्रीकांत जिचकार

श्रीकांत रामचंद्र जिचकार, यांना महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश भारताचा सगळ्यात क्वालिफाईड व्यक्ती म्हणून ओळखतो. नागपूर जिल्ह्यातील आजानगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांत जिचकार यांनी आपल्या आयुष्यात एकूण ४२ पदव्या मिळवल्या .

त्यांनी आपल्या पहिल्या पदवीची सुरवात सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय शिक्षणापासून केली. ते एम.बी.बी.एस. व एम.डी. तर होतेच, त्याबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेऊन एल.एल.एम. पदवी घेतली. 

यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते.

या शिवाय १९७८ मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनले, पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि आयएएसची पोस्ट पटकावली. ४ च महिने नोकरी केली आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला.

याचा अर्थ असा नव्हे कि ते आयएएस अधिकारी होते म्हणून राजकारणात आले.

विद्यार्थी दशेत असल्यापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. महाविद्यालयात असताना त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्याच काळात ते नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

पुढे काँग्रेस पक्षाकडून आग्रह झाल्यामुळे जिचकार यांनी १९८० साली विधानसभेची निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून गेले. इ.स. १९८५ पर्यंतची त्यांची ही कारकीर्द प्रचंड लोकाभिमुख व लोकप्रिय ठरली होती. एकाच वेळी चौदा खात्यांचा कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता.

१९८५ साली त्यांचा विधानसभेला पराभव झाला पण तरीही शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना गृहराज्यमंत्रिपद मिळाले.

आपल्या कडक शिस्तीमुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात हेडमास्तर म्हणून ओळखले जायचे. पण कार्यक्षम कारभार आणि चोख प्रशासन यामुळे श्रीकांत जिचकार मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री म्हणून ओळखले जायचे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वापार दोन गट चालत आलेले. एक होता पश्चिम महाराष्ट्रातील सहकारमधल्या दिग्गज नेत्यांचा आणि दुसरा विदर्भ मराठवाडा या उपेक्षित भागातल्या नेत्यांचा. शंकरराव चव्हण दुसऱ्या गटाचं नेतृत्व करायचे. पश्चिम महाराष्ट्राला साखर सम्राटांनी पाणी पळवून इतर भागाचा अनुशेष वाढवला असं त्यांचं मत होतं.

श्रीकांत जिचकार हे शंकरराव चव्हाण यांच्या गटात गेल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांनाही आपला विरोधक ठरवून टाकलं होतं.

श्रीकांत जिचकार यांच्या भागातच रणजित देशमुख आणि सुनील शिंदे उर्फ सोनू बाबा या आमदारांशी त्यांचा छत्तीसचा आकडा होता. नरखेडच्या कुठल्यातरी प्रश्नावरुन तर सुनील शिंदे आणि श्रीकांत जिचकार हमरीतुमरीवर आलेले होते. सोनू बाबा आणि रणजित देशमुख एका गटाचे असल्यामुळे त्या लढाईला श्रीकांत जिचकार विरुद्ध रणजित देशमुख आणि सोनू बाबा असं स्वरुप प्राप्त झालं होतं.

एकदा श्रीकांत जिचकार हे विदर्भात आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. दुर्गम भागातल्या खेड्यामध्ये विकासकामांचे उदघाटन केले जात होते. श्रीकांत जिचकार यांच्या मोटारींचा ताफा एका गावात पोहचला आणि अचानक काही तरी गडबड झाली. 

नरखेड रस्त्यावर सोनू बाबांच्या समर्थकांकडून जिचकारांच्या गाडीवर दगडफेक सुरु झाली.

जिचकार यांच्या गाडीचे काच फोडण्यात आले. त्यांच्या बॉनेटला लावलेला राष्ट्रध्वज मोडण्यात आला. त्यांच्या सोबत आलेल्या पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलीस व गावकरी यांच्यात धुमश्चक्री झाली. अनेक जण जखमी झाले. खुद्द गृहराज्यमंत्री श्रीकांत जिचकार यांना देखील मारहाण झाल्याचं बोललं गेलं.

कसेबसे श्रीकांत जिचकार तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले.  

‘गृह राज्यमंत्र्याच्या गाडीवर दगडफेक होणं आणि त्यातही तो गृह राज्यमंत्री मुख्यमंत्र्याचा लाडका असेल तर त्याचे पडसाद गंभीरपणे उमटणं स्वाभाविक होतं. शंकरराव चव्हाण यांनी कडक पाऊल उचलायचं ठ्वल. सुनील शिंदे , रणजित देशमुख यांना त्यांच्या समर्थकांसह अटक करण्यात आली.

त्यांना जामीन घेण्याची संधी होती मात्र रणजित देशमुखांनी बेल घेण्यास स्पष्ट नकार दिला.

‘मी जामीनासाठी कोणतीही विनंती करणार नाही . कारण आमचं काही चुकलेलं नाहीये’ असं त्यांचं म्हणणं होतं.

या दोन्ही आमदारांची रवानगी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाली .

प्रकरण फार चिघळू लागले. केंद्रात पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडून दबाव वाढला. अखेर शरद पवारांना मध्यस्थीची विनंती करण्यात आली. शरद पवार तेव्हा नुकतेच काँग्रेस मध्ये परतले होते. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. रणजित देशमुख आणि सुनील केदार हे त्यांचे समर्थक मानले जायचे. त्यांच्या अटकेवरून पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका देखील केली होती.

पण शंकरराव चव्हाण यांनी एक पाऊल मागे घेत त्यांना हे प्रकरण शांत करण्याची जबाबदारी दिली.

 शरद पवार नागपूरला आले आणि त्यांनी रणजित देशमुख आणि सुनील केदार यांना समजावलं आणि अखेर हे दोन्ही आमदार कारागृहाच्या बाहेर आले.

असं म्हणतात कि या घटनेतून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली होती. शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदावरून गच्छंती होण्याकडे वाटचाल सुरु झाली. या सगळ्याला कारणीभूत ठरले श्रीकांत जिचकार.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.