आता इथेनॉलवर गाड्या चालवायच्या असं नितीन गडकरी म्हणतायत.

आज पण पेट्रोल वाढलंय असं तुम्हाला कोण जर म्हंटल तर…तुम्ही म्हणाल, बसू दे तिकडं बोंबलत. रोजचं मड त्याला कोण रडं…नाही का. पण जर तुम्हाला कोण म्हंटल, की पोर हो पेट्रोलच्या बदल्यात इथेनॉल वर तुमची गाडी चालेल तर…तर जल्लोषच की,

तर तेलाचे दर पेटलेले आहेत. त्याकडं आता सरकार तर किती काळ दुर्लक्ष करणार. शेवटी राष्ट्रीय स्तरावरचा विषय असा कसा सोडून देतील. यामुळंच परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीं बाबत लोकांमधील वाढती नाराजी लक्षात घेऊन गडकरी म्हणाले की,

आगामी काळात सरकार लोकांना वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी इथेनॉल मिळवून देण्यास मदत करेल.

म्हणजे इथेनॉल पेट्रोलचा पर्याय बनू शकतोय तर? पण मग जर पेट्रोलला पर्याय होता तर आधीपासनचं  का नाही दिलं इथेनॉल? पोरांनी पेट्रोलच्या मीमवर किती मेहनत केलीय, माहिती का…असो

बघूया काय असतंय हे इथेनॉल 

इथेनॉल अल्कोहोलच्या गटातला एक कंपाऊंड आहे. अल्कोहोल गटाला आपण साध्या भाषेत दारु म्हणतोय. पण हे इथेनॉल दारु नाही बरं. नाहीतर प्यालबिल. आता याचे अनेक प्रकार आहेत. यातलं इथेनॉल C2H5OH. हे ज्वलनशील आहे. म्हणजेच जेव्हा ते ऑक्सिजनच्या उपस्थितीत जळते तेव्हा ते कार्बनडायऑक्साईड आणि हायड्रोजन रिलीज़ करते. मग ते इंधनासारखे कार्य करते.

आता आपण लहानपणी केमीस्ट्री लै खोलात जाऊन वाचलं नाही. त्यामुळं काही समजेल अशी शक्यता पण नाही म्हणा. फक्त एवढंच लक्षात ठेवा कि, जग फक्त दोन गोष्टींनी बनलयं.

कोणत्या दोन गोष्टी ?

ऑर्गेनिक कंपाऊंड आणि इनऑर्गेनिक कंपाऊंड. ऑर्गेनिक कंपाऊंड ज्यामध्ये कार्बन (आणि हायड्रोजन) असते. आणि इनऑर्गेनिक कंपाऊंड ज्यात कार्बन नसतो.

पण आपण इंधन सिंगल फ्युएल म्हणून वापरू शकणार नाही कारण इथेनॉलचे कॅलरीफिक मूल्य खूप कमी आहे. तो एकटा जळू शकत नाही. त्याला सोबतीला कोणतरी जळवत ठेवायला लागतंय. 

बघायला गेलं तर डिझेलची कॅलरीफिक व्हॅल्यू ४० ते ४५ MJ/ Kg पर्यंत असते. परंतु इथेनॉलचे कॅलरीफिक मूल्य केवळ २६ ते २७ MJ/ Kg असते. त्यामुळं हे स्पष्ट आहे की जर ते डिझेल, पेट्रोल मध्ये मिसळले गेले तरच फायदा किंवा बचत होईल.

म्हणजे हे स्पष्ट झाले आहे की बेस फ्युएल म्हणून पेट्रोल-डिझेलच राहील. पण प्रश्न आहे की या बेसमध्ये म्हणजे पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळलं पाहिजे?

बघा हं, इथेनॉलची किंमत आता प्रतिलिटर ६० ते ६२ रुपये आहे. तर पेट्रोल सध्या १०० च्या वर आहे. इथॅनॉल मिश्रित पेट्रोलवर किंमत आणि उष्मांक सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी केला जातो. ८.५ टक्के इथेनॉल अजूनही पेट्रोलमध्ये मिसळल जातं.

पण आता त्याहूनही अधिक इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळावं लागेल. म्हणजे नितीन गडकरींनी ज्या ‘फ्लेक्स इंजिन’ची गोष्ट सांगितली तेच ते. 

‘फ्लेक्स इंजिन’ म्हणजे असं इंजिन, जे फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही तर भेसळ असणाऱ्या तेलाला पण सपोर्ट करेल. म्हणूनच त्याच नाव ‘फ्लेक्जीबल’ शी संबंधित आहे. ‘फ्लेक्स इंजिन’ बाबत गडकरी म्हणाले की, अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामधील बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि टोयोटाच्या वाहनांमध्ये ही इंजिन बसविण्यात आली आहे.

मग इथेनॉलची उपलब्धता किती आहे 

सध्या भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता ४२६ दशलक्ष लिटर (गुळावर आधारित) आणि २५८ दशलक्ष लिटर (धान्य-आधारित) आहे. ते अनुक्रमे ७६० कोटी लीटर आणि ७४० कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या इथेनॉलमधून केवळ १०१६ कोटी लिटर EBP (इथॅनॉल बेस्ड पेट्रोल) तयार होणार नाही तर उर्वरित ३३४ कोटी लिटर इथेनॉल इतर कामांसाठी वापरला जाऊ शकतो.

याच्यामुळं इंजनच्या परफॉर्मन्सवर काही इफेक्ट पडेल का ?

वाहनांमध्ये ECM बसविलेला असतो. इलेक्ट्रॉनिक नियंत्रण मॉड्यूल जे EBP च्या मिश्रणानुसार तो टॉलरन्स निश्चित करतो. परंतु जर गुणोत्तर खूपच वाईट असेल तर इंजिन निकामी होण्याची शक्यता आहे. थोडक्यात इंजिन ओवरहीट होण्याची शक्यता जास्त आहे.

आजकाल फ्लेक्स इंजिनचे नाव फारसे ऐकिवात नाही. पण ५० ते ६० वर्षांपूर्वी पेट्रोलमध्ये केरोसीन मिसळून इंजिनमध्ये टाकलं जात होतं. त्यामध्ये पेट्रोलचे प्रमाण खूपच कमी होते आणि रॉकेलचे प्रमाण खूप जास्त होते. तेव्हा केरोसीन पण स्वस्त होत. त्यामुळं रॉकेल-पेट्रोलचे हे मिश्रण मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.

त्यामुळं आता हे सगळं कधी होईल माहित नाही. तोपर्यंत आपण फक्त पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याच्या बातम्याच बघायच्या आणि मीम तयार करायचं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.