महिला आणि पुरुष हॉकी टीमच्या यशामागे ओडिसा सरकारचा देखील मोठा वाटा आहे…

आज सकाळी सकाळी भारताला टोकियो ऑलिम्पिकमधून हॉकीच्या बाबतीत एक गुडन्यूज मिळाली. ती म्हणजे दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय महिला हॉकी संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत पहिल्यांदाच ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम केला आहे.

सोबतच दुसरीकडे काल ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने देखील इतिहास रचला आहे. ग्रेट ब्रिटनला हरवून पुरुष हॉकी संघानं उपांत्य फेरी गाठली आहे. तब्बल ४ दशकानंतर पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवलं आहे. पुरुष हॉकी संघाने याआधी १९७२ मध्ये ही कामगिरी केली होती. या यशामुळेच कालपासून भारतीय महिला आणि पुरुष या दोन्ही संघाचं देशभरातून चांगलंच कौतुक होतं आहे.

मात्र या दोन्ही संघांच्या यशामागे खेळाडू आणि संघ व्यवस्थापकांसोबतच ओडिसा राज्याचा आणि सरकारचा देखील मोठा वाटा आहे.

कसा ते पण सांगतो.

एकतर ओडिसाचे अनेक खेळाडू भारतीय हॉकी टीमचा एक तर भाग होते किंवा त्यांनी नेतृत्व केलं आहे.

यात मग माजी कर्णधार प्रबोधन टिर्की असतील किंवा माजी आणि अनुभवी खेळाडू दिलीप टिर्की. यांच्यासोबतच सध्याच्या टोकियो ऑलिम्पिकच्या भारतीय पुरुष हॉकी टीमचा उपकर्णधार बीरेंद्र लकडा आणि महिला हॉकी टीमच्या खेळाडू दीप ग्रेस एक्का असतील. या सगळ्यांनी हॉकीमध्ये राज्याचं आणि देशाचं नाव रोशन केलं आहे.

भारतीय हॉकीला पुढे नेण्याच ओडिसाच योगदान इथपर्यंतच मर्यादित नाही.

ओडिसा सरकारने जवळपास १५० कोटी रुपये खर्च करून २०१८ पासून भारतीय राष्ट्रीय हॉकी टीमचे (यात पुरुष-महिला, ज्युनिअर आणि सिनिअर दोन्ही) अधिकृत प्रायोजकत्व स्वीकारलं आहे. यातून नवीन पटनाईक यांनी एकप्रकारे भारतीय हॉकीच्या गौरवशाली इतिहासाला पुनर्जीवित करण्याचा विडाचं उचलला आहे.

सोबतचं ओडिसाने हॉकी इंडिया फेडरेशनच्या भागीदारीमधून भुवनेश्वरमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकांचं आयोजन केलं आहे. यात पुरुष वर्ल्ड कप, वर्ल्ड लीग, प्रो लीग आणि ऑलिम्पिक क्वालिफायरचा देखील समावेश होता. एकूणच या सातत्यानं मिळणाऱ्या पाठिंब्याचं फळ सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं दिसतं आहे.

ओडिसा सरकार केवळ हॉकी टीमची स्पॉन्सरच नाही तर पटनाईक यांनी हॉकीसाठी राज्यात बरंच मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे. यात भूवनेश्वरमधील जगाला हेवा वाटेल असं उभारलेलं कलिंगा स्टेडियम असो कि रुरकेला इथं तब्बल १२० कोटी रुपये खर्च करून उभारलं जात असलेलं बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असो. हे सगळं नवीन पटनाईक यांनी पुढाकार घेऊन उभं केलेलं आहे.

भुवनेश्वरच्या याच बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये २०२३ चा पुरुष संघाचा वर्ल्डकप पार पडणार आहे.  

राज्य सरकारकडून कलिंगा स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं एक हाय परफॉर्मन्स सेंटर देखील उभारण्यात आलं आहे. इथं हॉकीच्या खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच राज्य सरकारकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनी हॉकी स्टेडियम उभे करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यातून हॉकीची आवड असणाऱ्या खेळाडूंना खेळण्याचा सराव करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

नवीन पटनाईक यांच्या याच सगळ्या योजना आणि पुढाकारामुळे त्यांना अत्यंत नामवंत असा २०१८ मधील FIH President’s Award मिळाला आहे. हॉकीच्या विकासातील योगदानासाठी, सोबतच स्थानिक आणि जागतिक पातळीवर खेळाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पटनाईक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

ओडिसा सरकारने रविवारी आणि सोमवारी भारतीय टीम विजयी झाल्यानंतर म्हंटले आहे कि, 

‘भारतीय पुरुष हॉकी टीम मोठ्या कालावधीनंतर ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. ओडिसा सरकार भारतीय हॉकी टीमचा गौरव परत मिळवून देण्यासाठी २०१८ पासून देशाच्या राष्ट्रीय हॉकी टीमची प्रत्येक पातळीवर मदत करत आहे.

आम्ही देशातील एकमवे राज्य आहोत, जे राष्ट्रीय हॉकी टीमचे अधिकृत प्रायोजक आहोत. सातत्यानं पाठिंबा मिळाल्यामुळे भारतीय संघाच्या प्रदर्शनात चांगलीच प्रगती आली आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि, हॉकींमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं देशवासियांचं स्वप्न आता लांब राहिलेलं नाही. 

तर मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील ट्विट करून याप्रसंगी भारतीय पुरुष आणि हॉकी टीमच अभिनंदन केलं आहे. सोबतच या दोन्ही संघाना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यामुळेचं एका बाजूला देशाच्या अर्थसंकल्पात खेळाच्या खर्चाची तरतूद कमी होतं असल्याचे आरोप होतं असताना दुसऱ्या बाजूला ओडिसा सरकार करत असलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.