रणजीतसिंहांच्या मूर्तीची विटंबना झाल्यामुळे पाकिस्तानचे मंत्री महोदय तापलेत.

पाकिस्तानी धर्मांध लोक नेहमीच हिंदू देवदेवतांची विटंबना करताना दिसतात. अशी एक हि संधी ते सोडत नाहीत ज्यामुळे पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक हिंदूंना कमीपणा वाटेल. आता देवांचा प्रॉब्लेम समजू शकतो पण त्यांना अखंड भारतातल्या महान योध्यांचा पण प्रॉब्लेम होतोय.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात पाकिस्तानात पुन्हा एकदा महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. लाहोरच्या किल्ल्यात बसवलेल्या या  मूर्तीची अनेकदा विटंबना झाली आहे. या मूर्तीभोवती बारसह बॅरिकेडिंग करण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बॅरिकेडवरून उडी मारून मूर्ती तोडताना दिसतो.

त्यानंतर दुसरा व्यक्ती येऊन त्याला घेऊन जातो. व्हिडिओमध्ये, हल्लेखोर रणजीत सिंगच्या विरोधात घोषणा देतोय. या घटनेबद्दल भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो तेहरीक-ए-लब्बैक  पाकिस्तान (TLP) या कट्टरपंथी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले जाते.

२०१९ पासून तोडफोडीची ही तिसरी वेळ आहे. 

२७ जून २०१९ मध्ये लाहोर किल्ल्यातील माई जिंदिया हवेलीच्या बाहेर महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा बसवण्यात आला. हा वाडा महाराजा रणजीत सिंगची सर्वात लहान राणी जिंदा कौरच्या नावाने बांधला गेला आहे. रणजित सिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीला या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ८ फुटांचा हा पुतळा तांब्याचा बनलेला होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट २०१९ नंतर म्हणजेच स्थापनेच्या दोन महिन्यांनी, पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. त्या वेळी पण तहरीक-ए-लब्बैकच्या दोन कार्यकर्त्यांना  अटक करण्यात आली. जम्मू -काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही तोडफोड केली होती.

यानंतर डिसेंबर २०२० मध्ये दुसऱ्यांदा पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तान पोलिसांनी झहीर नावाच्या मुलाला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झहीर आणि त्याचे सहकारी, कलम ३७० हटवल्याबद्दल नाराज होते.

आता मूर्तीची तोडफोड करण्याची ही तिसरी वेळ आहे. 

पाकिस्तानी क्रोनोलॉजर आणि इतिहासकार अली उस्मान कासमी यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी ट्विट केले की,

लाहोरच्या  किल्ल्यातील रणजीत सिंह यांचा पुतळा तहरीक-ए-लब्बैकच्या कार्यकर्त्याने पाडला. तहरीक-ए-लब्बैकच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही किमान दोन वेळा पुतळ्याची तोडफोड केली होती.

या घटनेवर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनीही या घटनेचा निषेध केला. त्यांनी ट्विट करून लिहिले,

“शर्मनाक, अनपढ़ों का यह झुंड दुनिया में पाकिस्तान की छवि के लिए वाकई खतरनाक है.”

चारी बाजूने आलेल्या दडपणानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा तोडल्याप्रकरणी रिझवान नावाच्या व्यक्तीला अटक केली. तो तेहरीक-ए-लब्बैक (टीएलपी) या मूलगामी गटाचा सदस्य असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणात निषेध नोंदवायला भारतही मागे नाही.

भारतातील शीख संघटनांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच निषेध नोंदवला. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले की, अशा प्रकारे द्वेष पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा अल्पसंख्यांकांवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले,

“आम्ही लाहोरमधील महाराजा रणजीत सिंग यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पाहिले आहे. मूर्तीची तोडफोड झाल्याची ही तिसरी घटना आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायांच्या सांस्कृतिक वारशावर असे हल्ले वाढत्या असहिष्णुता आणि समाजातील अल्पसंख्यांक समुदायाबद्दल आदर नसल्याचे स्पष्ट करतात.

ते पुढे म्हणाले की,

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढत आहेत. त्यांची प्रार्थनास्थळे, सांस्कृतिक वारसा आणि खाजगी मालमत्तेवर हल्ले होत आहेत. १२ दिवसांपूर्वी पाकिस्तानातील रहीम यार खान येथील एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. असे हल्ले रोखण्यात पाकिस्तान सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

तहरीक-ए-लब्बैकचा विषय काय ?

तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान हा एक इस्लामिक राजकीय पक्ष आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, TLP ची स्थापना १ ऑगस्ट २०१५ रोजी कराचीमध्ये इस्लामिक चळवळ म्हणून झाली. हळूहळू ही संघटना राजकारणात सक्रिय झाली. त्यांचा उद्देश पाकिस्तानला इस्लामिक राज्य बनवणे आहे, जे शरीयत-ए-मोहम्मदीनुसार चालले पाहिजे. इम्रान खान सरकारने काही काळापूर्वी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत या पार्टीवर बंदी घातली होती.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.