आईने विटा वाहून घर चालवलं होतं. लेकाने सलग दोन वेळा मेडल जिंकून तिचे पांग फेडलेत..

टोकियो ऑलम्पिक २०२१ नंतर आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आपला जलवा दाखवतायेत. ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत ७ मेडल भारताला मिळवून दिले. या नंतर आता टोकियो पॅरालॉम्पिक २०२१ च्या स्पर्धेतही भारतीय खळाडूंनी इतिहास राचलाय. आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात भारताला जवळपास १० मेडल्स मिळालेत. ज्यात २ गोल्ड, ५ सिल्वर आणि  ३ ब्रॉन्झचा समावेश आहे.

या स्पर्धेत मरिअप्पन थंगावेलूने  ३१ ऑगस्टला १० वं मेडल आपल्या देशाच्या नावे केलं. त्याने पॅरालिम्पिकमध्ये हाय जंप या विभागात १.८६ मीटर उंच उडी घेत  पॅरा अॅथलीट सिल्वर मेडल जिंकलं.

महत्वाचं म्हणजे पॅरालॉम्पिक खेळात मरियप्पनचं हे दुसरं मेडल आहे. याआधी त्यानं २०१६ मध्ये गोल्ड मेडलवर बाजी मारली होती.

२०१६ च्या पॅरालॉम्पिक स्पर्धेत  मरिअप्पनने इतिहास घडवला होता. या स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनंतर भारताने गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरल होतं. १.८९ मीटर उडी घेत पुरुषांची T४२ हाय जंप स्पर्धा जिंकून त्यानं ही कामगिरी केली होती.

त्यावेळी मरिअप्पन थंगावेलू पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय हाय जंपर ठरला होता

खरं तर, मरिअप्पनच्या यशाची आणि त्याच्या प्रवासाची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. २६ वर्षीय या पॅरा-अॅथलीटचा जन्म तमिळनाडूच्या पेरियावदगमपट्टी नावाच्या एका छोट्या गावातला. पाच वर्षाचा असताना एका अपघातामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

एक दिवस शाळेत जात असताना एक बस वेगाने त्याच्या दिशेने आली, बस ड्रायव्हर पूर्णपणे नशेच्या धुंदीत होता. ती बस थेट मरियप्पनच्या पायावरून गेली.  या अपघातात त्याच्या जीव तर वाचला पण उजव्या पायाचा गुडघा मात्र पूर्णपणे चिरडला गेला. या दुर्घटनेनंतर मरिअप्पनचा उजवा पाय अजूनही अविकसित आहे, तो अजूनही त्या पाच वर्षांच्या मुलाचा पाय आहे, तो कधीच वाढला नाही.

एवढं होत नाही तर त्याच्या वडिलांनी घरं सोडलं, ज्यांनतर आई विटा वाहायचं काम करायला लागली. पण नंतर छातीत दुखणं वाढल्याने तिनं  ते काम सोडलं. आणि ५०० रुपये उधार घेऊन भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

मरिअप्पनच्या वडिलांनी सोडल्यानंतर कोणी त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी साधं भाड्याचं घर सुद्धा दिल नाही. आई एकटीच राबत होती, मरियप्पनच्या उपचारासाठी तिनं ३ लाखांचे कर्ज घेतले. जे ती बरीच वर्ष फेडत होती.

दरम्यान, मरिअप्पनला खेळाची फार आवड. व्हॉलीबॉल हा त्याचा फार आवडीचा खेळ, आपल्या अपंगत्वाला त्यानं कधीही आपल्या यशाच्या आड येऊ दिल नाही. त्याची खेळाबाबतची हीच आवड पाहून शाळेतल्या ऐकाया शिक्षकानं त्याला शाळेत उंच उडी स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. मरिअप्पनने ते मनावर घेतलं आणि प्रयत्न करणारचं असं ठरवलं.

या स्पर्धेत सक्षम खेळाडू असूनही मरिअप्पननं दुसरा क्रमांक पटकावला. यांनतर त्यानं कधीच माग पाहिलं नाही, त्याच्या वर्गमित्रांनी सुद्धा त्याला प्रत्येक स्पर्धेत पाठिंबा दिला. 

पुढे मरिअप्पनला त्याचे प्रशिक्षक सत्यनारायणा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यांची भेट २०१३ च्या राष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये झालेली. त्यांनतर २०१५ मध्ये सत्यनारायण यांनी त्याला ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आणि बेंगळुरूला आणले. आणि आपल्या कठोर परिश्रमाने त्यानं जागतिक स्तरावर आपलं नाव केलं.

मरिअप्पन थंगावेलूचा असा विश्वास आहे की, त्याच्या पायाचा अंगठा जो विकृत आहे, तो त्याचा लकी चार्म आहे. २०१६ मध्ये मरिअप्पनने ट्यूनीशियाच्या आयपीसी ग्रँड प्रिक्समध्ये पुरुषांच्या है जंप स्पर्धेत १.७८ मीटरचं अंतर कापलं.  यानंतरचं त्याला रिओ स्पर्धेत भाग घेण्याची सांधी मिळाली. 

दरम्यान,मरिअप्पन तिसरा भारतीय पॅराथलीट आहे, ज्याने पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड पटकावलं. या आधी १९७२ मध्ये स्विमिंगमध्ये मुरलीकांत पेटकरने गोल्ड मिळवलं होत. त्यानंतर २००४ मध्ये देवेंद्र झाझडिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये जॅवलिन थ्रो या प्रकारात गोल्ड मेडल मिळवलं होत.

दरम्यान, त्याच्या या यशस्वी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मरिअप्पनचे अभिनंदन केले.

यांनतर आता २०२१ च्या पॅरालॉम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा मेडल जिंकून त्यानं सिद्ध केलं कि, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या पुढे भले मोठे अडथळेही टिकावं धरत नाही. 

हे ही वाच भिडू  :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.